रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी श्री. अरविंद ठक्कर यांना आलेल्या अनुभूती
‘१५ ते २४.११.२०२३ या नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘दशमहाविद्या याग’ करण्यात आले. मला १६.१०.२०२३ या दिवशी झालेल्या यज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. यज्ञस्थळी पोचल्यावर मला यज्ञवेदीच्या समोरच्या जागेत बसायची संधी मिळाली. परात्पर गुरुदेवांनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) माझ्यासाठी हे दैवी नियोजन केले होते. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी आलेल्या अनुभूती
अ. मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे पाहिले अन् माझे हृदय अपार कृतज्ञतेने भरून आले.
आ. हळूहळू मी माझे अस्तित्व विसरलो. माझे मन निर्विचार झाले होते. मला केवळ मंत्रोच्चार ऐकू येत होते.
इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना यज्ञस्थळी उपस्थित पाहून वाटले, ‘जणू प्रत्यक्ष दोन देवींच्या कृपेने मानवजात आणि सर्व साधक यांच्या कल्याणासाठी यज्ञ होत आहेत.’
ई. आपोआपच माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले.
उ. जेव्हा दोन देवी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आदिमाता अंबाबाईला प्रार्थना करत होत्या. तेव्हा ‘त्यांची प्रार्थना जणू अंबामाता प्रत्यक्ष ऐकत आहे’, असे मला वाटले.
ऊ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ देवीची आरती करत असतांना ‘एक देवी दुसर्या देवीची आरती करत आहे’, असे मला जाणवले.
ए. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या दोन देवींना मी आर्ततेने प्रार्थना केली, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आतापर्यंत जसे आम्हा साधकांना हात धरून साधनेत पुढे नेले, अखिल मानवजात आणि सर्व साधक यांच्या परम कल्याणासाठी अखंड मार्गदर्शन केले, तसेच तुम्हीही आम्हाला आमचा हात धरून साधनेत पुढे घेऊन चला.
२. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे सेवक असलेल्या साधकांप्रती कृतज्ञता वाटणे
अ. तेथील प्रत्येक साधक मला दैवी वाटत होता.
आ. जेव्हा यज्ञाचे चित्रीकरण करण्याची सेवा करणार्या साधकांकडे माझी दृष्टी गेली, तेव्हा मला जाणवले, ‘हे सर्व सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे सेवक असून यज्ञाच्या सर्व कार्यात साहाय्य करत आहेत.’
इ. साधक करत असलेल्या या सर्व सेवा सामान्य नसून ‘दैवी’ आहेत, तसेच पुढील सहस्रो वर्षे उपयुक्त ठरणार्या ज्ञानशक्तीचा हा अनमोल ठेवा आहे.
ई. श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यज्ञाविषयी माहिती सांगत होते. तेव्हा ‘हे दोघे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ध्येय सर्व मानवजातीपर्यंत पोचवणारे नारदमुनीच आहेत’, असे मला जाणवले.
उ. ते सांगत असलेली प्रत्येक माहिती अर्थपूर्ण असून ती अंतर्मनात खोलवर जात होती.
ऊ. त्या वेळी मला माझ्या अस्तित्वाची जाणीव नव्हती.
३. रामनाथी येथील सनातनचा आश्रम म्हणजे साक्षात् विष्णुलोकच असल्याची आलेली अनुभूती !
अ. ‘रामनाथी येथील सनातनचा आश्रम म्हणजे साक्षात् विष्णुलोकच आहे’, असे आम्ही केवळ म्हणत आलो आहोत; परंतु आज मी ते प्रत्यक्ष अनुभवले.
आ. हा आनंद अवर्णनीय होता, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी या जन्मात सर्व साधकांना एकत्र आणून सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल मला अपार कृतज्ञताही वाटत होती.
इ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आपल्याला दिलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ आपण घ्यायला हवा; कारण पुन्हा अशी संधी मिळण्यासाठी आपल्याला किती सहस्र जन्म घ्यावे लागतील, हे ठाऊक नाही.’
४. यज्ञ म्हणजे साधकांना मिळालेल्या जन्माचा मूळ उद्देश ओळखण्याची अनेक जन्मांत एकदाच मिळालेली सुवर्णसंधी !
‘हा केवळ यज्ञ नसून आपल्या जन्माचा मूळ उद्देश ओळखण्याची अनेक जन्मांत एकदाच मिळालेली सुवर्णसंधी आहे,’ असे मला वाटले. ‘मला माझी स्वकेंद्रित वृत्ती सोडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण जायला हवे, त्यांची सेवा करायला हवी आणि त्यांच्यावर अन् त्यांच्या साधकांवर प्रेम करायला हवे’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना केलेली आर्त याचना
अ. ‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, आम्हाला आत्मस्तुती, आदर किंवा प्रतिष्ठा या इच्छांपासून दूर रहाता येऊ दे. तुम्हीच आम्हाला जन्म दिला आहे. आम्हा साधकांना एकत्र आणले आहे. ‘तुम्ही दिलेला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास अमूल्य आहे अन् तो जराही वाया जाऊ द्यायचा नाही’, हे ध्यानात ठेवून आम्हाला तुम्हाला सदैव स्मरणात ठेवता येऊ दे. आम्ही क्षुल्लक आहोत आणि केवळ तुम्हीच महत्त्वाचे आहात’, याची आम्हाला जाणीव सतत असू दे.
आ. ‘तुमच्या कृपाशीर्वादामुळेच आम्ही ईश्वरप्राप्तीचे ध्येय साध्य करू शकणार आहोत’, यावर आमची अखंड श्रद्धा असू दे. आमचे मन सदैव निःशंक राहू दे. तुम्ही दीनबंधू, दीनानाथ, पतित पावन आहात. आम्हाला सतत कृतज्ञताभावात रहाता येऊ दे.
इ. हे गुरुदेवा, ‘तुमच्या चरणप्राप्तीची माझी तळमळ अशीच वाढू दे. तुमच्या कृपेस मला पात्र होता येऊ दे.’
ई. हे परमेश्वरा, ‘तुमच्या पावन चरणी शरण येण्याची आमची क्षमता नाही. तुम्हीच आम्हाला साहाय्य करा’, हीच आमची तुमच्या पावन चरणी प्रार्थना आहे. तुमची प्रीती आणि कृपा यांमुळेच हे शक्य होणार आहे.’
‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, हे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साधनेच्या मार्गावरून आम्ही कधीही भरकटू नये, आमचा भक्तीभाव सतत वृद्धींगत होऊ दे आणि आम्हाला सतत तुमच्या पावन चरणांचा ध्यास लागू दे’, हीच आपल्या परम पावन चरणी प्रार्थना !’
– श्री. अरविंद ठक्कर, फोंडा, गोवा. (२०.१०.२०२३)
|