नागपूर येथे बस अपघातातील पैसै मिळण्यासाठी मृतकांच्या नातेवाइकांचे रामनामाचा जप करत आंदोलन !
नागपूर – समृद्धी महामार्गावरील बस अपघातातील घोषित केलेले पैसे मिळावेत आणि बस मालकावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मृतकांच्या नातेवाइकांनी संविधान चौक येथे १९ जानेवारी या दिवशी रामनामाचा जप करत आंदोलन केले आहे.
समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ या दिवशी खासगी बसचा अपघात होऊन भीषण आग लागली होती. या दुर्दैवी घटनेत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना २० मृतांच्या नातेवाइकांना २५ लाख रुपये साहाय्य देण्याची घोषणा केली होती; मात्र ६ मास उलटूनही कोणतेही साहाय्य देण्यात न आल्यामुळे नातेवाइकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
मृतकांच्या कुटुंबियांनी वर्धा जिल्हा कार्यालयासमोर मागील ४२ दिवसांपासून साखळी आंदोलन चालू केले आहे; मात्र या कालावधीत सरकारने आश्वासनाची पूर्तता केली नाही. कुणीही या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली नसल्याने संपूर्ण कुटुंबाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
‘मृतकांच्या पीडित कुटुंबियांनी फडणवीस यांच्या येथील जनसंपर्क कार्यालयासमोर ‘रामनामाचा जप’ करणार असल्याची चेतावणी दिली होती; मात्र पोलिसांनी त्यांना बंदी केल्यामुळे संविधान चौक येथे आंदोलन करण्यात आले आहे’, असे चंद्रशेखर मडावी आणि अजय जानवे यांनी सांगितले. मृतकाच्या कुटुंबियांना केंद्र आणि राज्य सरकार यांनी घोषित केलेले ५ लाख रुपये आणि २ लाख रुपये असे ७ लाख रुपयांचे साहाय्य देण्यात आले आहे; पण कुटुंबियांकडून २५ लाख रुपयांची मागणी केली जात आहे.