परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील गुणांमुळे त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले अधिवक्ता रामदास केसरकर (वय ७० वर्षे) !
‘अधिवक्ता रामदास केसरकर यांच्या या लेखमालेचा सर्वांत अधिक लाभ मलाच झाला आहे. त्याचे कारण हे की, त्यांनी लिहिलेले माझ्या जीवनातील अनेक वर्षांतील अनेक प्रसंग मला आठवत नव्हते, ते या लेखमालेमुळे मला आठवले. त्यामुळे आता माझे जीवनचरित्र लिहिण्याची तळमळ असलेले साधक मला जेव्हा जीवनातील प्रसंग विचारतात, तेव्हा मला या लेखमालेमुळे अनेक प्रसंग सांगता येतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.१०.२०२२) |
१९.१.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील गुणांमुळे अधिवक्ता केसरकर त्यांच्याकडे कसे आकर्षित झाले ?’, ते पाहिले. आजच्या भागात आपण ‘अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना अधिवक्ता केसरकर यांना झालेला आध्यात्मिक त्रास आणि त्यावर नामजपादी उपाय केल्यामुळे त्रास न्यून होणे, नंतर त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होणे’ इत्यादी पहाणार आहोत. (भाग ५)
१३. आध्यात्मिक त्रास चालू होणे
१३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी पूर्वजांचा त्रास असल्याचे सांगितल्यावर त्याच्या निवारणार्थ आवश्यक ते विधी आणि दत्ताचा नामजप करणे : मी साधना करायला लागल्यानंतर प्रथमच मला ‘जीवनात आध्यात्मिक त्रास असतात’, हे कळले. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘तुम्हा कुटुंबियांना पूर्वजांचा तीव्र त्रास आहे’, असे मला सांगितले. त्याच्या निवारणार्थ आम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन आवश्यक ते विधी केले, तसेच ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे आरंभ केले.
१३ आ. ‘आध्यात्मिक त्रास कसे असतात ?’, हे प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे त्या त्रासांची तीव्रता कळणे : ‘मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक त्रास होतात’, हे मी साधनेत आल्यानंतर मला केवळ समजले नाही, तर त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आला. ‘आध्यात्मिक त्रासांची तीव्रता किती असते !’, हे मला ग्रंथांमध्ये वाचून समजले नसते; मात्र ते मी स्वतः अनुभवल्यामुळे मला कळले. ‘असे त्रास समाजातील पुष्कळ लोकांना असल्याने त्यांचे जीवन किती असह्य झाले असेल !’, हे मला श्री गुरूंच्या कृपेने समजले. त्यामुळे ‘मानवी जीवनात साधनेला पर्याय नाही’, याविषयी माझी निश्चिती झाली. वर्ष १९९४ ते वर्ष २०१५ या कालावधीत मी न्यूनतम ५ वेळा तीव्र आध्यात्मिक त्रास अनुभवला आहे. ‘हा त्रास टिकण्याचा कालावधीही वेगवेगळा असतो’, हेही मी अनुभवले आहे. माझा आध्यत्मिक त्रास कधी ६ मास, तर कधी १ वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी रहात असे. वर्ष २०१२ ते वर्ष २०१४ या सलग ३ वर्षांत मी तीव्र आध्यात्मिक त्रास अनुभवला आहे.
१३ इ. आध्यात्मिक त्रासांमुळे होत असलेली शारीरिक स्थिती ! : आध्यात्मिक त्रासांमुळे माझी प्राणशक्ती एवढी न्यून व्हायची की, मी साधी २ वाक्ये बोललो, तरी मला धाप लागायची. तेव्हा मला जेवण नकोसे झाले होते. जेवायचे म्हटले, तरी माझ्या अंगावर काटा उभा रहात असे. मला रात्रभर आणि दिवसभरातही ४ – ५ वेळा झोपावे लागे. मला अंघोळ करणे, म्हणजे मोठे संकट वाटायचे. मला एकसारखी ग्लानी येत असे आणि डोळ्यांची जळजळ होत असे. माझ्या घशाला सतत कोरड पडत असे. पायर्या चढून जाणे किंवा उतरणेही मला शक्य नव्हते. खोलीतून कुठे बाहेर जायचे असल्यास माझ्या मनावर प्रचंड ताण येत असे. त्यामुळे माझे खोलीतून बाहेर जाणे होत नसे. ‘खोलीत झोपणे आणि नामजपादी उपाय करणे’, एवढेच दिवसभरात माझ्याकडून होत असे. तेव्हा ‘एक एक दिवस कसातरी ढकलणे’, असे माझे जीवन झाले होते. मला वाचन करणे किंवा संगणक हाताळणेही अशक्य झाले होते. त्यामुळे त्या कालावधीत मला कोणतीही सेवा करता आली नाही.
पुढे आवश्यक ते नामजपादी उपाय केल्यानंतर श्री गुरुकृपेने माझा हा प्रदीर्घ आध्यात्मिक त्रास ३ वर्षांनंतर वर्ष २०१५ मध्ये थांबला. मग माझे जीवन पूर्ववत् चालू झाले.
१४. प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमांचा लाभ घेता येणे
प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे शिष्य डॉ. आठवले यांनी सनातन भारतीय संस्कृती संस्थेची स्थापना केली. सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा प्रत्येक वर्षी साजरी केली जात असे. या गुरुपौर्णिमेला प.पू. भक्तराज महाराज यांचे सर्वत्रचे भक्त आणि सनातन भारतीय संस्कृती संस्थेचे भारतभरातील सर्व साधक सहभागी होत असत. प.पू. भक्तराज महाराज सांगतील, त्या जिल्ह्यात प्रत्येक वर्षी एकच गुरुपौर्णिमा साजरी केली जायची. परात्पर गुरु डॉक्टर साधकांच्या साहाय्याने गुरुपौर्णिमांची संपूर्ण सिद्धता करत असत. गुरुपूजनानंतर भंडारा आणि रात्री प.पू. भक्तराज महाराज यांची परावाणीतील भजने होत असत. आम्ही कुटुंबीय प्रत्येक गुरुपौर्णिमेला जात होतो. त्यामुळे श्री गुरुकृपेने आम्हाला अशा वैशिष्ट्यपूर्ण गुरुपौर्णिमांचा लाभ घेता आला.
१५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साजर्या केलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या भव्य आणि दिव्य, अशा अमृत महोत्सवात सहभागी होऊन त्याचा लाभ घेता येणे
फेबु्रवारी १९९५ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव साजरा केला. हा अमृत महोत्सव इंदूरमध्ये अन्नपूर्णा रोडवर असलेल्या ‘भक्तवात्सल्याश्रम’ या प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमाच्या समोरील मोकळ्या मैदानात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सिद्धतेच्या सेवेनिमित्त आम्ही कुटुंबीय १५ दिवस इंदूरला गेलो होतो. आम्ही सर्व जण त्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. या कार्यक्रमाची भव्यता आणि दिव्यता काही वेगळीच होती. साधकांच्या साहाय्याने परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यक्रमाची संपूर्ण सिद्धता केली होती. हा सोहळा इतका भव्य आणि दिव्य झाला की, या सोहळ्यानंतर प.पू. भक्तराज महाराज परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाले, ‘‘असा सोहळा कधी झाला नाही आणि कधी होणार नाही.’’ अशा या कार्यक्रमाचा श्री गुरुकृपेने आम्हाला लाभ घेता आला.
‘अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यावर अनंत कृपा करून मला अध्यात्माकडे वळवून माझ्या जीवनाचे कल्याण केले. वर्ष २०२१ मध्ये त्यांनी माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित करून मला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले’, त्याबद्दल मी त्यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– अधिवक्ता रामदास केसरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७० वर्षे), सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२) (समाप्त)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |
हे पण वाचा :सनातन प्रभात
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
https://sanatanprabhat.org/marathi/755443.html (भाग १)
https://sanatanprabhat.org/marathi/755775.html (भाग २)
https://sanatanprabhat.org/marathi/755950.html (भाग ३)
https://sanatanprabhat.org/marathi/wp-admin/post.php?post=756336&action=edit&classic-editor (भाग ४)