सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात सौ. शुभांगी शेळके यांना आलेल्या अनुभूती !
‘एके दिवशी आम्हाला (मी आणि यजमान श्री. रामचंद्र शेळके यांना) गुरुमाऊलींचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. तेव्हा मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. अनुभूती सांगतांना कृतज्ञताभाव जागृत होणे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘कुणाला सुगंध आला का ?’, असे विचारण्यापूर्वीच सनातनच्या चंदनधुपाचा सुगंध येणे
गुरुमाऊलींच्या सत्संगामध्ये मी ‘संकट काळात गुरुमाऊलींनी माझ्या यजमानांना मृत्यूच्या दाढेतून सोडवून आमच्यावर कशी अपार कृपा केली’, ही अनुभूती सांगत होते. ही अनुभूती सांगतांना माझा कृतज्ञताभाव पुष्कळ जागृत झाला होता. तेव्हा गुरुमाऊलींनी मला मध्येच थांबवले आणि काही क्षण डोळे मिटून ‘सुगंध येतो का ?’, हे अनुभवण्यास सांगितले. त्यांनी आमच्या समवेतच्या साधकांना ‘कुणाला सुगंध आला का ?’, असे विचारल्यावर सर्वांनीच हात वर केले. मी गुरुमाऊलींना म्हणाले, ‘‘तुम्ही विचारण्याच्या आधीपासूनच मला सनातनच्या चंदनधुपाचा सुगंध येत होता.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘आधीच सुगंध येणे’, असे हे पहिल्यांदाच घडले आहे आणि हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.’’
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी डोळे मिटण्यास सांगितल्यावर ‘सर्व साधक क्षीरसागरातील महाविष्णुसमोर आहेत’, असे जाणवून सुगंध येणे
गुरुमाऊलींनी आम्हाला डोळे मिटण्यास सांगितले, तेव्हा मला क्षणभर ‘आम्ही सर्व साधक क्षीरसागरातील महाविष्णुसमोर आहोत’, असे दिसले आणि सुगंध जाणवला. पुढच्या क्षणाला मला रुग्णालयात येतो तसा दुर्गंध येत असे, तो आला आणि नंतर पुन्हा सुगंध आला.
३. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच अंतिम सत्य आहेत’, याची प्रचीती येणे
या अनुभूतीवरून मला जाणवले, ‘ही सर्व विष्णुस्वरूप गुरुमाऊलींचीच कृपा आहे. तेच साधनेचा सुगंधरूपी आनंद देतात आणि दुर्गंधरूपी प्रारब्धातील प्रसंगाच्या वेळी आपल्यावर कृपाछत्र धरतात. ‘कुठल्याही स्थितीत अंतिम सत्य तेच आहेत’, याचीच मला प्रचीती आली.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात माझ्या हातांच्या बोटांची नखे गडद गुलाबी होणे
या भेटीमध्ये माझ्या हातांच्या बोटांची सर्व नखे गडद गुलाबी झाली होती. माझे यजमान श्री. रामचंद्र शेळके यांच्या हातांच्या बोटांची सर्व नखे पुष्कळ गडद गुलाबी झाली होती. यावरून ‘विष्णुस्वरूप गुरुमाऊलींच्या सत्संगात आम्हाला चैतन्य मिळाल्यामुळे आम्ही आणि इतर अनेक साधक यांच्यामध्ये हा दैवी पालट झाला’, असे मला वाटले.
५. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘देवाने अनुभूती देऊन आमच्यावर केवढी कृपा केली !’, याची आमच्या अल्पमतीने कल्पनाही करणे अवघड आहे; पण ‘त्यांचे हे नित्यनूतन; पण चिरंतन रूप हृदयात अखंड राहून आम्हाला साधनेची प्रेरणा मिळत राहो’, हीच त्यांच्या कोमल चरणकमली प्रार्थना आहे. ‘देवाने (गुरुमाऊलींनी) आम्हाला केवळ सत्संग दिला नाही, तर अमूल्य मार्गदर्शन केले आणि दैवी अनुभूतीही दिल्या’, त्याबद्दल आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी अखंड कृतज्ञ आहोत.’
– सौ. शुभांगी शेळके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |