North Korea Nuclear Drone:उत्तर कोरियाने पाण्याखाली घेतली आण्विक ड्रोनची चाचणी !
प्योंगयांग (उत्तर कोरिया) – अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांनी चिथावणी दिल्याचा आरोप करत उत्तर कोरियाने पुन्हा एकदा पाण्याखाली आण्विक ड्रोनची चाचणी घेतली आहे. त्याने या ड्रोनला ‘हाइल-५-२३’ असे नाव दिले आहे. कोरियन भाषेत याचा अर्थ ‘सुनामी’ असा होतो. हे ड्रोन समुद्रात शांतपणे शत्रूवर आक्रमण करण्यात निष्णात आहे. ते अनेक तास पाण्यात राहून शत्रूवर आक्रमण करू शकते.
अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त सैनिकी कवायतीला प्रत्युत्तर म्हणून ही चाचणी करण्यात आल्याचे उत्तर कोरियाने सांगितले. ‘अशा प्रकारच्या कवायती उत्तर कोरियासाठी धोकादायक असून आम्हाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे’, असे त्याने म्हटले. याआधीही त्याने ७ एप्रिल २०२३ या दिवशी ‘अंडरवॉटर न्यूक्लियर ड्रोन हाइल-२’ची चाचणी केली होती. त्यावेळीही त्याने अमेरिका आणि जपान यांच्या युद्ध सरावाला यासाठी उत्तरदायी धरले होते.