११ महिने १४ राज्यांतून दंडवत घालत लेकाराम सैनी पोचले अयोध्येत !
अयोध्या, १९ जानेवारी (वार्ता.) – लेकाराम सैनी यांनी भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी येथून ११ महिन्यांपूर्वी दंडवत यात्रा चालू केली होती. १४ राज्यांतून दंडवत घालत लेकाराम सैनी हे अयोध्या येथे प्रभु श्रीरामाच्या दर्शनासाठी पोचले आहेत. २२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमीत होणार्या श्रीरामामूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला लेकाराम सैनी उपस्थित रहाणार आहेत.
लेकाराम सैनी हे मूळचे हरियाणा राज्यातील आहेत. १५ फेबु्रवारी २०२३ या दिवशी ते हरियाणातून तमिळनाडूतील कन्याकुमारी येथे जाण्यास निघाले. १८ फेब्रुवारी या दिवशी ते कन्याकुमारी येथे पोचले. कन्याकुमारी येथून २२ फेब्रुवारी २०२३ या दिवशी त्यांनी दंडवत यात्रेला प्रारंभ केला. दंडवत घालत १९ जानेवारी या दिवशी ते अयोध्या येथे पोचले आहेत. यात्रा चालू झाल्यापासून ते केवळ फळाहार ग्रहण करत आहेत. त्यांच्यासमवेत त्यांचे २ सहकारीही आहेत. हिंदु संस्कृतीची पूर्नस्थापना आणि विश्वकल्याण यांसाठी प्रभु श्रीरामाचा आशीर्वाद मिळावा, यासाठी त्यांनी आयोध्येपर्यंत ही दंडवत यात्रा केली असल्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.