Ramlala Pran Pratishtha : श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधी होत आहेत भावपूर्ण !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येत १६ जानेवारीपासून श्री रामलला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधीला प्रारंभ झाला आहे. १८ जानेवारीला श्री रामललाची मूर्ती श्रीराममंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात आली. १९ जानेवारीला सकाळी अरणी मंथन करण्यात आले. यानंतर श्रीगणेशाची पूजा झाली. सर्व द्वारपालांचे पूजन करण्यात आले. अरणी मंथनातून प्रकट झालेला अग्नि कुंडांमध्ये प्रस्थापित केला जात आहे. यानंतर ग्रहांची स्थापना, भगवान शंकराच्या आसनाची स्थापना आणि अयोध्येच्या मुख्य देवतेची स्थापना होईल. श्रीराम यंत्र, योगिनी, मंडळ क्षेत्रपाल, अधिकारी यांची आराधना केली जात आहे. ‘हे विधी भावपूर्ण केले जात आहेत’, असे सांगितले जात आहे.
श्री रामललाची जुनी मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार ! – रामभद्राचार्य
जगद्गुरु रामभद्राचार्य म्हणाले की, श्री रामललाची जुनी मूर्ती गर्भगृहात ठेवली नसती, तर ते चुकीचे झाले असते; पण जुनी मूर्तीही गर्भगृहातच राहील. लोकांना चांगल्या प्रकारे दर्शन घेता यावे, यासाठी नवीन मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. दुसर्या मूर्तीची अडचण नाही.
तात्पुरते श्रीराममंदिर भाविकांसाठी बंद
१९ जानेवारीच्या संध्याकाळी ७ वाजल्यापासून श्रीरामजन्मभूमीवरील तात्पुरत्या स्वरूपात असणार्या श्रीराममंदिरात दर्शन घेता येणार नाही. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या सिद्धतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीराममूर्तीच्या शेजारील कडेवर दशावतारांची चित्रे !
श्रीराममूर्तीच्या शेजारी असणार्या अर्धवर्तुळाकार असणार्या कडेवर दशावतारांची चित्रे कोरण्यात आली आहेत. तसेच वरच्या बाजूला सूर्यदेवाचे चित्र, ॐ, स्वस्तिक, सुदर्शन चक्र आणि गदा कोरण्यात आली आहे. या कडेच्या खालच्या बाजूला गरुड कोरण्यात आले आहे. ही मूर्ती कमळावर उभी आहे.