Bihar RJD Crime : बिहारमध्ये सत्ताधारी राजदच्या नेत्याच्या मुलांकडून सरकारी अधिकार्याला मारहाण !
पाटलीपुत्र (बिहार) – डोभीनगर पंचायतीचे कार्यकारी अधिकारी अरविंद कुमार सिंह यांना रूपसपूर परिसरातील गोला रोडवर बेदम मारहाण करण्यात आली. ‘सत्ताधारी राजदचे नेते नागेंद्र यादव यांचे मुलगे तनुज यादव आणि नयन यादव यांनी सिंह यांना मारहाण केली’, अशी माहिती पीडित व्यक्तीचे चुलत भाऊ विजय कुमार सिंह यांनी दिली. अरविंद कुमार सिंह हे गंभीर घायाळ झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. तनुज यादव आणि नयन यादव हे राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे नातेवाईक आहेत. सिंह यांना मारहाण करण्यामागील कारण समजू शकलेले नाही.
१. अरविंद कुमार सिंह हे त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीने गोला मार्गावरून प्रवास करत होते. तेव्हा तनुज यादव आणि नयन यादव यांनी त्यांची स्कॉर्पिओ गाडी थांबवली आणि सिंह यांच्यावर लोखंडी सळीने आक्रमण केले. यामध्ये त्यांच्या डोळे आणि डोके यांना गंभीर दुखापत झाली.
२. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली; मात्र पोलीस विलंबाने आले. (गुंडगिरीकडे डोळेझाक करणारे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? – संपादक) या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकासत्ताधारी राजदचे नेते उन्मत्त झाल्याने त्यांची मुलेही कायदा हातात घेऊन सरकारी अधिकार्यांवर आक्रमण करत आहेत. अशा घटना ‘बिहारमध्ये जंगलराज आहे’, हेच दर्शवते ! |