ठाणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांद्वारे ‘श्रीराम’ नामाचा जयघोष
ठाणे, १८ जानेवारी (वार्ता.) – अयोध्येत २२ जानेवारीला रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शिवसेना, भाजप आणि विविध संस्था यांच्या माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात रामकथा, पालखी मिरवणुका, रामायण महोत्सव, तसेच तलावाच्या परिसरात महाआरती, व्याख्यान, श्रीरामाच्या जीवनप्रवासावर आधारित ‘लेझर शो’ आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यात आठवडाभर श्रीराम नामाचा जयघोष होणार आहे. तसेच विविध संस्थांकडून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
ठाणे शहरात श्रीराम मंदिराची प्रतिकृती असलेला रथ नेऊन गृहसंकुले आणि परिसर येथे नागरिकांना अक्षतांचे वाटप करण्यात येत आहे. ठाणे येथे २० ते २२ जानेवारी या कालावधीत ‘रामायण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा (‘एआय’चा) वापर करून ‘रामाच्या जीवनप्रवासावर आधारित रांगोळी’ हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे. या महोत्सवात ५०० वर्षांचा मंदिराचा प्रवास चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. येथे कारसेवक हुतात्मा स्तंभ उभारला जाणार आहे.