परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील गुणांमुळे त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले अधिवक्ता रामदास केसरकर (वय ७० वर्षे) !
‘अधिवक्ता रामदास केसरकर यांच्या या लेखमालेचा सर्वांत अधिक लाभ मलाच झाला आहे. त्याचे कारण हे की, त्यांनी लिहिलेले माझ्या जीवनातील अनेक वर्षांतील अनेक प्रसंग मला आठवत नव्हते, ते या लेखमालेमुळे मला आठवले. त्यामुळे आता माझे जीवनचरित्र लिहिण्याची तळमळ असलेले साधक मला जेव्हा जीवनातील प्रसंग विचारतात, तेव्हा मला या लेखमालेमुळे अनेक प्रसंग सांगता येतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.१०.२०२२) |
१८.१.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील गुणांमुळे अधिवक्ता केसरकर त्यांच्याकडे कसे आकर्षित झाले ?’, ते पाहिले. आजच्या भागात आपण ‘अधिवक्ता केसरकर यांनी केलेली अध्यात्मप्रसाराची सेवा, त्यांना झालेला आध्यात्मिक त्रास आणि त्यावर नामजपादी उपाय केल्यामुळे त्रास न्यून होणे, नंतर त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होणे’ इत्यादी पहाणार आहोत. (भाग ४)
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर अनुभूती येऊन अध्यात्मशास्त्रावर विश्वास बसणे
९ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील गुण किंवा एकूणच त्यांचे व्यक्तीमत्त्व यांमुळे प्रभावित होऊन ‘ते महान आहेत’, असे वाटणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत केलेल्या गोव्याच्या दौर्यानंतरही माझा साधनेवर विश्वास बसला नाही. ‘साधना करण्याची आवश्यकताच काय ?’, असा प्रश्न माझ्या मनात येत असे; परंतु या दौर्यानंतर माझी एका गोष्टीविषयी निश्चिती झाली, ‘परात्पर गुरु डॉक्टर हे सर्वतोपरी महान आहेत.’ ‘माझ्या ऐकिवात असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ।’ या अभंगाप्रमाणे ते प्रत्यक्ष जगत आहेत’, याचा अनुभव मी त्यांच्या समवेत केलेल्या दौर्यात प्रत्यक्ष घेतला होता, तरीही ‘आपण साधना का करावी ?’, हे मला उमगत नव्हते, तसेच अध्यात्म हे सत्य शास्त्र असल्याचे माझे मन स्वीकारत नव्हते; परंतु ‘या दौर्यात परात्पर गुरु डॉक्टरांच्या सहवासात राहिल्याने मी भारावून गेलो होतो’, हेही तितकेच खरे होते.
९ आ. ‘नामजप करून काय जाणवते ?’, ते पाहूया’, या विचाराने नामजप करायला आरंभ करणे : मला कळेना, ‘नेमके काय करायचे ? परात्पर गुरु डॉक्टर सांगतात, त्याप्रमाणे साधना करायची कि नाही ?’ माझा कुणावरही विश्वास नव्हता; म्हणून मी या संदर्भात स्वतःवरच प्रयोग करायचे ठरवले. ‘परात्पर गुरु डॉक्टर सांगतात, त्याप्रमाणे ‘कुलदेवता’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हे नामजप करून स्वतःवर काय परिणाम होतो ?’, ते पहावे; म्हणून मी जमेल तसा नामजप करायला आरंभ केला.
९ इ. कुलदेवतेचा नामजप करतांना गुलाबाच्या फुलाच्या सुगंधाची अनुभूती येणे आणि त्यानंतर ‘अध्यात्मशास्त्र सत्य आहे’, याची निश्चिती होणे : मी कुलदेवतेचा नामजप करायला आरंभ केला. काही कालावधीनंतर मला गुलाबाच्या फुलाच्या सुगंधाची अनुभूती आली, तरीही प्रथम माझा त्या अनुभूतीवर विश्वास बसेना. त्याच क्षणी मला परात्पर गुरु डॉक्टरांनी ठाण्याच्या पहिल्या अभ्यासवर्गात शिकवलेले एक सूत्र आठवले, ‘कुलदेवता पृथ्वीतत्त्वाची देवता असून त्या देवतेचा नामजप केल्याने प्राथमिक अवस्थेतील साधकाला पृथ्वीतत्त्वाची, म्हणजे सुगंधाची अनुभूती येते, उदा. एखाद्या ठिकाणी सुगंध देणारी कुठलीही वस्तू नसतांना सुगंध येणे, म्हणजे सुगंधाची अनुभूती येणे.’ या अनुभूतीनंतर ‘अध्यात्मशास्त्र सत्य आहे’, अशी माझ्या मनाची निश्चिती झाली.
१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले निर्णय सहजतेने स्वीकारणे
१० अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सध्या ठाण्यातच राहून वकिली व्यवसाय चालू ठेवा, योग्य वेळ आल्यावर मी तुम्हाला ते सोडायला सांगीन’, असे सांगणे : मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या मुंबई येथील निवासस्थानी ते साधकांसाठी घेत असलेल्या बुधवारच्या साप्ताहिक सत्संगाला नियमित जाऊ लागलो. तेव्हा एक दिवस मी त्यांना सांगितले, ‘‘माझा वकिलीचा व्यवसाय बंद करून मी मे १९९४ च्या शेवटच्या आठवड्यात रत्नागिरीला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. तिकडे आपले अध्यात्मप्रचाराचे कार्य आहेच. त्यात मी सहभाग घेईन; पण त्या आधी मला आपल्याकडून ‘संमोहनशास्त्र’ शिकायचे आहे.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘केसरकर, आपल्या जीवनात काही निर्णय काळाप्रमाणे घ्यावे लागतात. तुम्ही आताच ठाणे सोडून जाणे योग्य होणार नाही. सध्या तुम्ही ठाण्यातच रहा. तुमचा वकिली व्यवसाय चालू ठेवा. योग्य वेळ आल्यावर मी तुम्हाला ठाणे सोडण्याविषयी सांगीन.’’
१० आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संमोहनशास्त्र शिकण्यात वेळ न घालवता सत्संग घेण्यास सांगणे आणि ते त्वरित स्वीकारता येणे : वरील प्रसंगानंतर मी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही ठाण्यातील साधकांसाठी साप्ताहिक सत्संग चालू करा आणि तो तुम्हीच घ्या.
मी : मला अध्यात्मातील काहीच येत नाही, तर मी सत्संग कसा काय घेणार ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : त्यात काय आहे ? तुम्ही वकील आहात. आपला ‘अध्यात्मशास्त्र’ हा ग्रंथ वाचून त्यातील विषय सत्संगात सांगा.
मी : ठीक आहे; पण मला आपल्याकडून संमोहनशास्त्र शिकायचे आहे. त्याचे कसे करायचे ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : अहो केसरकर, मी जागतिक ख्यातीचा संमोहन उपचार तज्ञ असूनही त्या शास्त्राच्या मर्यादा लक्षात आल्यावर ते सोडून दिले. आता ते शास्त्र शिकण्यासाठी तुम्ही वेळ कशाला घालवता ?
मी कधीही कुणाचे ऐकत नाही; पण मी त्यांचे ऐकले आणि लगेच ‘हो’ म्हणालो.’
११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सांगण्यानुसार केलेली अध्यात्मप्रसाराची सेवा !
११ अ. सत्संग घ्यायला आरंभ करणे : ‘मार्च १९९४ मध्ये पहिल्या शनिवारी सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत मी ठाण्यातील साधकांसाठी माझ्या कार्यालयामध्ये पहिला साप्ताहिक सत्संग घेतला. मी ठाण्यात घेतलेल्या या पहिल्या सत्संगाविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘आता सत्संगातील उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी आणि सत्संगातील साधकांच्या उपस्थितीत वाढ होण्यासाठी तुम्ही ठाण्यात नियमितपणे ठिकठिकाणी ‘साधना आणि शंकानिरसन’ या विषयावर प्रवचने करा.’’ त्याप्रमाणे मी ठाणे शहरात ठिकठिकाणी प्रवचने करण्यास आरंभ केला.
११ आ. कोकणात जाऊन केलेली अध्यात्मप्रसाराची सेवा : त्यानंतर काही कालावधीने परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘ठाण्यातील सगळे सत्संग आता सौ. केसरकरांना (पू. (कै.) सौ. प्रमिला केसरकर (सनातनच्या १२१ व्या संत) यांना) घ्यायला सांगा आणि प्रत्येक शनिवार-रविवारी तुम्ही रत्नागिरीतील चिपळूण, अलोरे, घरडा कॉलनी आणि दाभोळ या ठिकाणी जाऊन तिथल्या साधकांसाठी साप्ताहिक सत्संग घ्या.’’ त्याप्रमाणे सौ. केसरकर ठाण्यातील सत्संग घेऊ लागल्या. तेव्हा कोकणात जाण्यासाठी आगगाडी नसल्याने मी प्रत्येक शुक्रवारी रात्री ठाण्याहून बसने निघून पहाटे चिपळूणला पोचत असे. मी शनिवार आणि रविवार या २ दिवसांत चिपळूण, अलोरे, घरडा कॉलनी अन् दाभोळ या ठिकाणी जाऊन तिथल्या साधकांसाठी साप्ताहिक सत्संग घेत असे. रविवारी रात्री चिपळूणहून बसने निघून सोमवारी पहाटे ५.३० वाजता मी ठाण्याला घरी परत येत असे. परत आल्यावर लगेच माझे वैयक्तिक आवरून मी सकाळी ७ वाजता विधी महाविद्यालयातील माझ्या नोकरीसाठी जात असे.
११ इ. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत जाऊन अध्यात्मप्रसाराची सेवा करणे : त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सांगितल्याप्रमाणे मी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे, जळगाव आणि संभाजीनगर, या ठिकाणी जाऊन साप्ताहिक सत्संग घेतले आणि प्रवचने केली. त्यानंतर मी विदर्भातील अकोला, अमरावती इत्यादी जिल्ह्यांमध्ये राहून प्रचाराची सेवा केली. ‘हे सर्व नोकरी आणि व्यवसाय सांभाळून कसे काय शक्य व्हायचे ?’, हे मलाच कळत नव्हते. ‘गुरु आवश्यक ती शक्ती देऊन आपल्याकडून साधना आणि सेवा करून घेतात’, हे काही वर्षांनंतर मला कळले.
११ ई. परात्पर गुरु डॉक्टरांनी गोव्याला पूर्णवेळ अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी येण्यास सांगितल्यावर नोकरीचे त्यागपत्र देऊन वकिली व्यवसायही बंद करणे : वर्ष १९९८ मध्ये साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले. त्यानंतर वर्ष १९९९ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘गोव्याहूनही दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रसिद्ध करायचे’, असे ठरवले. त्यासाठी त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आता आपण मुंबई सोडत आहोत. तुम्हीही पूर्णवेळ प्रचाराच्या सेवेसाठी गोव्याला या.’’ त्याप्रमाणे मी वकिली व्यवसाय बंद केला आणि विधी महाविद्यालयातील माझ्या नोकरीचे त्यागपत्र दिले.
११ उ. ठाणे सोडल्यावर कुटुंबियांना कुडाळ येथे सासुरवाडीला ठेवून गोवा राज्यात अध्यात्मप्रसार करण्यासाठी येणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या आज्ञेप्रमाणे माझ्या मुलींच्या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा होईपर्यंत कुटुंबियांना ठाणे येथे ठेवून मी गोव्याला आलो आणि गोवा राज्यात अध्यात्मप्रसाराची सेवा करू लागलो. मुलींच्या परीक्षा झाल्यानंतर मी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले, ‘‘आता मुलींच्या परीक्षा झाल्या आहेत. ठाणे सोडायचे, तर कुटुंबियांना कुठे ठेवायचे ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘त्यांना कुडाळ येथे तुमच्या सासुरवाडीच्या घरी ठेवा. मुलींचे पुढचे शिक्षण तिकडेच पूर्ण करा.
सौ. केसरकर यांना मुलींच्या समवेत कुडाळ येथेच थांबू दे.’’ त्याप्रमाणे मी साहित्यासह कुटुंबियांचे कुडाळ येथे स्थलांतर केले आणि गोवा राज्यात अध्यात्मप्रसार करण्यासाठी आलो. कुडाळला गेल्यानंतर सौ. प्रमिला केसरकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’साठी वार्ताहराची सेवा आणि जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा करायला आरंभ केला.
११ ऊ. गोवा आणि सिंधुदुर्ग येथे अध्यात्मप्रसाराची सेवा करणे : मी गोव्यात अनुमाने वर्ष-दीड वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी राहून अध्यात्मप्रसाराची सेवा केली. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन अध्यात्मप्रसाराची सेवा करा’, असे सांगितले. त्याप्रमाणे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा करू लागलो.
११ ए. सनातन संस्थेच्या वतीने न्यायालयीन लढा देणे : वर्ष २००० मध्ये मी सनातन संस्थेच्या वतीने हुसेन दलवाई यांच्या विरोधात दिवाणी आणि फौजदारी दावा दाखल केला. तेव्हापासून सनातनच्या न्यायालयीन लढ्याची सेवा चालू झाली. हळूहळू त्या सेवेची व्याप्ती वाढत गेली. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘आपल्याकडे तुम्ही एकटे साधक वकील आहात. तेव्हा यापुढे तुम्ही अध्यात्मप्रसाराची सेवा न करता सनातनच्या न्यायालयीन लढ्याची सेवा पूर्णवेळ करा.’’ त्या वेळी समाजातील धर्मद्रोही लोक आणि प्रसारमाध्यमे यांचा सनातन संस्थेच्या कार्याला होणारा विरोध पुष्कळ वाढला होता; परिणामी सनातनच्या न्यायालयीन लढ्याच्या सेवेची व्याप्ती वाढली. मी गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथे सनातन संस्थेच्या वतीने दिवाणी अन् फौजदारी खटले दाखल करून ते न्यायालयात चालवण्याची सेवा करू लागलो.
१२. रामनाथी आश्रमात रहायला मिळणे आणि तेव्हापासून रामनाथी आश्रमात राहून साधना अन् सेवा करणे
त्यानंतर वर्ष २००६ पासून मला होणार्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातच रहाण्यास सुचवले. तेव्हापासून मी रामनाथी आश्रमात राहून न्यायालयीन सेवा आणि साधना करू लागलो. त्यानंतर वर्ष २००७ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सांगितले, ‘‘सौ. केसरकर यांनाही कुडाळहून रामनाथी आश्रमात बोलावून घ्या.’’ त्याप्रमाणे मी सौ. केसरकर यांना आश्रमात रहाण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर वर्ष २०१० पासून मी न्यायालयीन लढ्यासह धर्मप्रेमी अन् राष्ट्रप्रेमी अधिवक्ते यांना संपर्क करण्याची सेवा करू लागलो.
– अधिवक्ता रामदास केसरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७० वर्षे), (सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२) (क्रमश:)
हे पण वाचा :सनातन प्रभात
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/755443.html (भाग १) |