श्रीरामजन्मभूमीचा निर्णय : निर्भय न्यायाचा जागतिक संदेश !

२२ जानेवारी या दिवशी होणार्‍या श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विशेष…

भक्तांच्या उद्धारासाठी आणि दुष्प्रवृत्तींचे निर्दालन करण्यासाठी भगवान प्रभु श्रीरामाचे आगमन होत आहे !

‘सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः ।
येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम् ।।

– मुण्डकोपनिषद्, मुण्डक ३, खण्ड १, वाक्य ६

अर्थ : सत्याचाच विजय होतो, असत्याचा नाही. सत्यामुळे देवयानमार्गाचा विस्तार होतो, ज्याच्यामुळे सर्व कामना पूर्ण झालेले ऋषीजन सत्याचे परमधाम असलेल्या श्रेष्ठ पदाला प्राप्त होतात.

हिंदुस्थानच्या लाखो वर्षांच्या वैभवशाली इतिहासाचा मुकुटमणी असलेले रामराज्य आणि आधुनिक वैशिष्ट्यपूर्ण भारतीय लोकशाही यांचा समांतर चालणारा संघर्षाचा सांधा सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने पुन्हा जोडला गेला ! ‘सत्यमेव जयते’ची अधिकृत घोषणा करणार्‍या भारतीय राज्यघटना प्रणित सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१९ मध्ये एकमुखाने श्रीरामजन्मभूमी ही केवळ श्रीरामांची जन्मभूमी असल्याचा निर्भेळ निर्णय दिला. सहस्र वर्षांच्या पारतंत्र्याच्या जखमा, ५०० वर्षांच्या अयोध्येतील उद्ध्वस्त श्रीरामजन्मभूमी आणि गेल्या ५० वर्षांत राज्यघटनेचे मानगुटीवर बसलेले निधर्मी सर्वधर्मसमभावाचे सावट, ‘सनातन’च्या (हिंदु धर्माच्या) खच्चीकरणाचा डाव, हे घोर वास्तव आणि सनातन हिंदु राष्ट्र संपुष्टात आणण्याचे षड्यंत्र होत होते. याने भारतीय हिंदू विभाजित रहावा, असे काँग्रेस आणि साम्यवादी शासनकर्ते राज्यघटना राबवत होते. हिंदू संभ्रमित होते.

विवेक सिन्नरकर

१. श्रीरामाला ५०० वर्षे विजनवासात रहावे लागणे

‘निधर्मी भारतीय राज्यघटना’, असे नकली बिरूद आमच्या माथी मारल्याने बधीर झालेल्या हिंदूंची अस्मिता थेट अयोध्या आंदोलनाने जागृत झाली. न्यायालयात श्रीरामजन्मभूमीचे प्रकरण ३० वर्षे चालले. न्यायाचे आद्य प्रतीक असलेल्या श्रीरामालाच निर्वासित होऊन ५०० वर्षे विजनवासात काढावी लागली. न्यायासाठी श्रीरामाला न्यायालयात वादी म्हणून उभे रहावे लागले. भारतीय संस्कृती, हिंदु वैदिक संस्कृती, भारतीय इतिहास, वेद प्रामाण्यपासून ‘रामायण’ ग्रंथापर्यंत सर्वांची चिरफाड केली गेली. नकली सर्वधर्मसमभाव आणि रामराज्य यांची बरोबरी करण्याचे दुःसाहस केले गेले. ‘श्रीराम आणि रामायण या काल्पनिक कथा आहेत’, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून रामसेतू उद्ध्वस्त करण्यास काँग्रेस सरकारला लाज वाटली नाही.

२. श्रीराममंदिराच्या विरोधात हिंदुद्वेषी शक्तींकडून सरकार आणि न्यायव्यवस्था यांना आव्हान !

‘सनातन हिंदु संस्कृती हा रोग आहे’, ही अभद्र टिपणी करणारे भारतात पुरोगामी म्हणून मिरवतांना आजही दिसू लागले आहेत. ते हिंदुद्वेषापायी; पण वर्ष १९७५ च्या काळात त्याच वेळी संघ परिवार, हिंदु साधू-संत यांनी सहिष्णू राहून नेमस्त मार्गाने कायदेशीर पुरावे गोळा केले. ते न्यायालयाच्या व्यासपिठावर वस्तूनिष्ठ पुरावे देऊन नैसर्गिक न्यायासाठी अखंड लढा देत होते. त्याच वेळी देशातील आणि आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना, अनेक इस्लामी राष्ट्रे भारतीय न्यायसंस्था अन् सरकार यांना अयोध्येत श्रीराममंदिर होऊ नये; म्हणून गर्भित धमक्या देत होते. त्यातून खरे तर स्वतंत्र भारताच्या सार्वभौम न्यायव्यवस्थेला आणि सरकार यांना देशी-विदेशी हिंदूविरोधी शक्ती आव्हान देत असल्याचे भयावह दृश्य दिसत होते.

३. श्रीरामजन्मभूमीच्या निकालाने भारत हे ‘सनातन हिंदु राष्ट्र’ असल्याचे शिक्कामोर्तब !

अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने प्रदीर्घ अन्वेषण करून सहस्रो पुरावे, इतिहास, साक्षीदार आणि उत्खनन या सर्वांद्वारे बाबर अन् मोगल राज्यकर्त्यांची पापे वेशीवर निर्भयपणे टांगली. मूळ हिंदु जनतेचा प्राण असलेल्या श्रीरामजन्मभूमीवरील भव्य, पुरातन मंदिराचा विध्वंस झाल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. हिंदु देवीदेवतांची विटंबना झाल्याचे आणि हिंदु मंदिरांवर इस्लामी अतिक्रमण झाल्याचे न्यायालयांनी घोषित केले. यासमवेत संपूर्ण जन्मभूमीवर श्रीरामाचा नैसर्गिक अधिकार असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आणि हिंदूंना एकमुखी न्याय दिला. राज्यघटना आणि हिंदु संस्कृती यांचा दृश्य संगम राज्यघटनेने आणि न्यायपालिकेने प्रत्यक्ष घडवून आणला ! यातून हेच अधोरेखित केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारलेले आपल्या स्वतंत्र भारताच्या आधुनिक राज्यघटनेचे बीज हे ‘हिंदु संस्कृतीच’ आहे ! राज्यघटनेचा गाभा सनातन हिंदु संस्कृती आहे. ‘भारत हे सनातन हिंदु राष्ट्र आहे’, हे राज्यघटनेने श्रीरामजन्मभूमीच्या निकालाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केले आणि ‘सत्यमेव जयते’, हे राष्ट्राचे ब्रीद जगासमोर निर्भयपणे घोषित केले. सहस्रो मशिदींच्या खाली दबलेली हिंदु मंदिरे याच न्यायाची मूकपणे वाट पहात आहेत. अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या निर्णयाचा दीपस्तंभ भारतातील या उपेक्षित सहस्रो मंदिरांना न्याय देणे अपेक्षित आहे. ‘हिंदू तेजा जाग रे…एक एक उद्ध्वस्त मंदिर माग रे !’, अशी घोषणा आज दिली जात आहे.

४. प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा म्हणजे हितशत्रू आणि जागतिक शक्ती यांना तडाखा !

संपूर्ण श्रीरामजन्मभूमी श्रीरामाच्या चरणी अर्पण करून न्यायसंस्थेने श्रीरामालाच नमस्कार केला आहे. त्यातून श्रीराममंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. ‘त्याच वेळी राज्यघटनेमध्ये असलेले श्रीराम-सीता यांची आणि सर्वच भारतीय महापुरुषांची चित्रे सन्मानित झाली’, असे आम्हाला वाटते. स्वतंत्र भारताचे सार्वभौमत्व या ऐतिहासिक निकालाने अधिकच बळकट केले, असे आमचे दृढ मत आहे. त्यातून गेल्या साडेतीन वर्षांमध्ये ‘अयोध्या शापमुक्त’ झाली. प्रभु श्रीरामाच्या जन्मस्थळी भव्य श्रीराममंदिर उभारले जात आहे आणि २२ जानेवारी २०२४ या दिवशी मंदिराचे भव्य स्वरूप जगाला दीपवून टाकेल, यात संशय नाही. बालक रूपातील श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. हा हितशत्रू आणि जागतिक शक्ती यांना ‘सार्वभौम हिंदु राज्यघटने’चा पहिला कायदेशीर तडाखा आहे. पुढील काळात हिंदूंच्या हितरक्षणासाठी राज्यघटना सिद्ध असेल, हा विश्वास ठेवावा. ‘हिंदुत्व हे राज्यघटनेला पूरक आहे, विरोधी नाही’, हे हिंदूंना धीरोदात्त आचरणातून दाखवावे लागेल.

५. श्रीराममंदिराचा लढा हा हिंदूंची श्रद्धा आणि सत्याचा आग्रह धरण्याचे वेधक उदाहरण !

श्रीराममंदिराच्या निमित्ताने संपूर्ण अयोध्येचा कायापालट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांच्या समर्थ हातांनी होत आहे. ‘विकास आणि धार्मिक श्रद्धा हे परस्परपूरक असू शकतात, हे त्यांनी राज्यकारभार करतांना सप्रमाण दाखवून दिले आहे’, असे निश्चित म्हणता येते. श्रीरामजन्मभूमीवरील आपले नूतन मंदिर हे हिंदूंची प्रगाढ श्रद्धा, चिवट लढा, सत्याचा आग्रह आणि वैभवशाली परंपरा जतन करणे यांचे वेधक उदाहरण आहे. जगामध्ये आतापर्यंत एकही असे उदाहरण नाही.

६. सर्वाेच्च न्यायालयाचा श्रीरामजन्मभूमीविषयीचा निर्णय इस्लामी राजवटीची पाळेमुळे धुडकावण्याचा भाग !

मध्ययुगीन इस्लामी राजवटीतील अत्याचारांचा जाहीर निषेध करत राज्यघटनाप्रणित आधुनिक भारतीय न्यायालयाने श्रीराममंदिराच्या बाजूने निर्णय देणे, ही भारताची जगाला राज्यघटनात्मक चेतावणी आहे. ‘भारत हे कायमच ‘हिंदु राष्ट्र’ आहे आणि हे आपल्या राज्यघटनेत हिंदुत्व अध्यारूढ आहे’, हेच आपले सार्वभौम राज्यघटना अन् न्यायालये यांतून घोषणा करत आहेत ! मंदिर निर्मितीचा आदेश देऊन शतकांची असलेली इस्लामी राजवटीची उरलीसुरली पाळेमुळे आणि दहशत माननीय सर्वाेच्च न्यायालयाने या एका निर्णयाने धुडकावून लावली. ‘हा गर्भित न्याय जागतिक परिमाणे पालटू शकतो, याचा आपण सशक्त होऊन विचार करावा, तसेच नवभारताचे निर्भयतेचे युग चालू झाल्याचे हे प्रतीक आहे’, असे आम्हाला वाटते.’

जय श्रीराम । जयतु जयतु हिन्दु राष्ट्रम् ।

– श्री. विवेक प्रभाकर सिन्नरकर, आर्किटेक्ट आणि स्तंभलेखक, ‘हिंदुबोध’ मासिकाचे पूर्व संपादक, पुणे.