प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांतून ‘परात्पर गुरु’ या बिरुदावलीचा अर्थ कळल्यावर त्याविषयी अधिक गोडी निर्माण होणे

श्री. अरविंद ठक्कर

१. ‘परात्पर गुरु म्हणजे काय ?’, हे बुद्धीने ठाऊक असणे; परंतु या शब्दांची मनाला गोडी न वाटणे

‘काही मासांपूर्वी भावसत्संग ऐकतांना मला आवडलेले भजन मायाजालावरून (‘इंटरनेट’वरून) ‘डाऊनलोड’ करतांना मला प.पू. भक्तराज महाराज यांचे एक लहानसे चलचित्र मिळाले. या चलचित्रातून मला ‘परात्पर गुरु म्हणजे काय ?’, या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ‘परात्पर गुरु म्हणजे काय ?’, हे मला बुद्धीने ठाऊक होते; पण या शब्दांची मनाला गोडी वाटत नव्हती आणि त्याचे उच्चारण करतांना काही आकर्षणही वाटत नव्हते.

२. गुरु तत्त्वरूपाने एक असल्याने ‘परात्पर गुरु’ या शब्दाविषयी गोडी निर्माण होऊन त्यात वाढ होणे

या चलचित्रामध्ये प.पू. भक्तराज महाराज सांगतात, ‘नाथाचा नाथ माझा, प्रभु साईनाथ माझा’, असे म्हणायला पाहिजे. नाथांचा नाथ परम गुरु आणि परात्पर गुरु; परंतु या ठिकाणी ‘नाथांचा नाथ माझा’, म्हणजे अनेकांचे गुरु वेगवेगळे असतात. त्यांना ‘गुरुनाथ’ म्हणतात. अनेकांचे गुरु जरी वेगळे असले, तरी त्यांचा जो गुरु आहे, तो सर्व अर्थांनी एक असून तो तत्त्वरूपाने एक आहे. तो म्हणजे ‘परात्पर गुरु’, हे ऐकल्यावर माझ्या मनात ‘परात्पर गुरु’ या शब्दाविषयी गोडी निर्माण होऊन ती आता वाढतच आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनीच मला आतून सुचवले, ‘यापुढे ‘परात्पर गुरु’ या प्रकारे संबोधावे.’

आता मी गुरुदेवांना ‘हमारे परम पिता परमात्मा, हे नाथोंके नाथ, हमारे परात्पर गुरु डॉ. आठवले गुरुदेवजी’, याच प्रकारे संबोधतो. या अनुभूतीसाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अरविंद ठक्कर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक