विश्व हिंदु परिषद, संस्कार भारती यांच्या वतीने ‘श्रीराम रंगी रंगले’ उत्सवाचे आयोजन !
आयोजक आणि पूर्व संघप्रचारक सुनील देवधर यांची पुणे येथील पत्रकार परिषदेत माहिती !
पुणे – प्रभु श्रीरामाची १०० फूट भव्य रंगावली, रामचरित्रावर अखंड गायन-भजन-नृत्य सादरीकरण, श्री रामायणावरील १२५ चित्रांचे प्रदर्शन, श्रीराम खिचडी प्रसादवाटप, प्राचीन शस्त्र आणि श्रीराममंदिर प्रतिकृती, पुस्तके, गौ साहित्य आदींची प्रदर्शने अशा नानाविध उपक्रमांनी ‘श्रीराम रंगी रंगले’ उत्सवात स्वप्नपूर्तीचा जल्लोष होणार आहे. २० आणि २१ जानेवारीला सकाळी १० ते रात्री १० या वेळेत नारायण पेठेतील रमणबाग प्रशालेत या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक आणि पूर्व संघप्रचारक श्री. सुनील देवधर यांनी १७ जानेवारी या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. उत्सवात प्रवेश विनामूल्य असून श्रीरामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार-प्रसार प्रमुख तुषार कुलकर्णी, संस्कार भारतीचे प्रांत सहमंत्री सतीश कुलकर्णी, रंगावली संयोजक अभय दाते, श्री रामराज्य फाऊंडेशनचे संस्थापक आशिष काटे आदी उपस्थित होते.
तुषार कुलकर्णी म्हणाले की, विश्व हिंदु परिषद आणि संस्कार भारती पुणे महानगर यांनी उत्सवाचे संयोजन केले आहे. श्रीराम मंदिर, अयोध्या येथे होत असलेल्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव पुण्ो येते भव्य स्वरूपात होणार आहे. प्रभु श्रीरामाची ७ सहस्र स्क्वेअर फूट भव्य रंगावली, संस्कार भारती आणि श्रीरंग कलादर्पणचे कलाकार ७ सहस्र चौरस फूट आकारात साकारणार आहेत. यामध्ये रामायणातील ७ प्रसंग रेखाटण्यात येणार असून त्यासाठी २५० किलो रंग आणि रांगोळी लागणार आहे आणि ही भव्य रंगावली साकारण्यासाठी ४० घंट्यांचा कालावधी लागणार आहे.
सतीश कुलकर्णी म्हणाले की, आर्ट इंडिया फाऊंडेशनच्या वतीने श्री रामायणावर आधारित १२५ चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातून काढलेल्या २ सहस्र चित्रांमधील १२५ सर्वोत्कृष्ट चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचाच्या वतीने प्राचीन ७०० शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, तसेच रामचरित्रावर अखंड गायन-भजन-नृत्य सादरीकरण दिग्गज कलाकार करणार आहेत.