गोरक्षण आणि धर्मरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन किमान १ घंटा वेळ देणे आवश्यक ! – अधिवक्ता देवदास शिंदे
पाथर्डी (अहिल्यानगर) येथील गोवत्स संमेलन !
पाथर्डी (जिल्हा अहिल्यानगर) – गोशाळेत गोमातेच्या सहवासात राहिले असता मन प्रसन्न रहाते. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून गोमातेची सेवा करावी. छत्रपती शिवरायांनी बालवयात गायीला कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार्या कसायाचा हात धडा वेगळा केला होता, हा इतिहास आपण विसरलो नाही. गोरक्षण आणि धर्मरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन किमान १ घंटा तरी वेळ देणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन अधिवक्ता देवदास शिंदे यांनी केले. ते १४ जानेवारी या दिवशी करडवाडी येथील ‘श्रीकृष्ण गोशाळा भक्त परिवारा’च्या वतीने आयोजित गोवत्स संमेलनात ‘गोसंरक्षण आणि गोसंवर्धन’ या विषयावर बोलत होते. या वेळी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना समितीच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२४’ भेट देण्यात आले.
या वेळी छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी दिलेले योगदान त्याचसह शिवरायांची यद्धनीती, चातुर्य, एकनिष्ठता, त्यांना मिळालेले संतांचे आशीर्वाद, श्री तुळजाभवानीदेवीचे आशीर्वाद ही उदाहरणे त्यांनी दिली. गोभक्त महंत आदिनाथ महाराजशास्त्री, गोसेवक भुतेकर महाराज शास्त्री, रामेश्वर महाराज जरे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, गोसेवक सोपान धामने मेजर, घनश्याम महाराज शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे रामेश्वर भुकन, गोरक्षक रवि गायकवाड, विठ्ठल मरकड, शिवनाथ दगडखैर आदींसह इतर गोसेवक या वेळी उपस्थित होते. या वेळी गोसेवक दीपक महाराज काळे यांनी सर्व गोभक्तांचा सन्मान केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले, तसेच देव, देश आणि धर्म या विषयांवरही चर्चा झाली. ‘वर्षातून एक दिवस गोशाळेला सर्वांनी चारा द्यावा’, असे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी सांगितले. कार्यक्रमात शेवटी गोशाळा संस्थापक दीपक महाराज काळे यांनी सर्वांचे आभार मानले.
या गोशाळेत ३५० हून अधिक गोमाता या पशूवधगृहातून सोडवलेल्या आहेत. १० वर्षांपासून काळे महाराज आणि त्यांचा परिवार शासनाकडून कुठलाही निधी न घेता गोशाळा चालवत आहेत.