२ सहस्र किलोमीटर सायकलवरून प्रवास करून सनातन संस्थेचे साधक अनिकेत डहाळे अयोध्येला पोचले !

अयोध्या येथे सायकलवरून प्रवास करत पोचलेले श्री. अनिकेत डहाळे

श्रीपूर (जिल्हा सोलापूर) – सनातन संस्थेचे साधक श्री. अनिकेत डहाळे यांनी श्रीराममंदिर उद्घाटन सोहळा पहाण्याचा निश्चय करून २ सहस्र किलोमीटर सायकलवरून प्रवास करून ते अयोध्या येथे पोचले आहेत. अन्य काही लोक त्यांच्यासमवेत अयोध्येच्या प्रवासात सहभागी झाले होते. ५ जानेवारीला त्यांनी प्रवासाला प्रारंभ केला. श्रीपूर-अहिल्यानगर, संभाजीनगर, भोपाळ, चित्रकुट, प्रयागराज मार्गे ते १८ जानेवारीला अयोध्या येथे पोचले आहेत. अयोध्या येथील मंदिरात ३० भाविकांना आरतीसाठी उपस्थित रहाण्याची संधी मिळते, त्यांपैकी श्री. अनिकेत एक होते.

या संदर्भात श्री. अनिकेत डहाळे म्हणाले, ‘‘प्रभु श्रीराम यांचे दर्शन होण्याची दुर्दम्य इच्छा असल्याने सायकलने हा प्रवास करण्याचा निश्चय केला. सायकलच्या वापरामुळे व्यायाम तर होतोच शिवाय वाहतूककोंडी, वाहनतळाची अडचण यांसारख्या समस्या आणि प्रदूषण यांवर हा चांगला पर्याय आहे.’’