Goa Police : पोलिसांनी जनतेचे भक्षक नव्हे, तर रक्षक बनावे ! – जसपाल सिंह, पोलीस महासंचालक
वाळपई, १७ जानेवारी (वार्ता.) : पोलिसांनी जनतेचे रक्षक बनावे आणि भक्षक बनू नये, अन्यथा पोलीस दल मोठ्या प्रमाणावर अपकीर्त होऊ शकते. पोलिसांनी समाजातील वाईट प्रवृत्तींवर प्रहार करत जनतेला चांगली सेवा द्यावी आणि पोलीस दलाची शान वाढवावी, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी केले. वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रात ‘होमगार्ड’ यांना ३ मासांचे प्रशिक्षण देऊन पोलीस दलाच्या सेवेत रूजू करण्यात आले आहे. या वेळी दिक्षांत समारंभात पोलीस महासंचालक जसपाल सिंह बोलत होते. या प्रसंगी पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई, पोलीस उपमहानिरीक्षक असलम खान, वाळपई प्रशिक्षण केंद्राच्या उपप्राचार्य सुचिता देसाई आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.
पोलीस महासंचालक जसपाल सिंह पुढे म्हणाले, ‘‘कायद्यापुढे सर्वच घटक समान असतात आणि अशा विचारधारेतून काम केल्यास समाजामध्ये पोलिसांची एक निराळी प्रतिमा निर्माण होईल. गोव्यात प्रतिदिन अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी जनतेशी सुसंवाद साधला पाहिजे. कायद्याचे पालन करणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे. कायद्याची पायमल्ली करणार्यांवर पोलिसांनी लगेच कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे.’’ पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी या वेळी पोलीस कशा प्रकारे योग्य कामगिरी बजावत आहेत, याविषयी माहिती दिली. प्रारंभी पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी परेडची पहाणी केली. प्रशिक्षणाच्या वेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रशिक्षणार्थींना स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आली.
संपादकीय भूमिका
पोलीस महासंचालकांनी यातून वस्तूस्थिती मांडली असून पोलिसांसाठी हे लज्जास्पद आहे ! |