HC On Goa Mining : मये गावातून खनिज माल वाहून नेण्यासाठी अनुमती देतांना बुद्धी वापरली नाही !
उच्च न्यायालयाचे खाण खाते आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याविषयीचे निरीक्षण
पणजी, १७ जानेवारी (वार्ता.) : मये गावातून खनिज माल वाहून नेण्यासाठी अनुमती देतांना खाण खाते आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी स्वत:ची बुद्धी वापरली नसल्याचे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या प्रकरणी वाहतूकदारांनी सोमवार ते शनिवार या कालावधीत सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ या कालावधीत प्रतिदिन ५० फेर्या मारणार असल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. गावातून खनिज माल वाहून नेण्यासाठी वाहतूक यंत्रणेमध्ये सुस्पष्टता नाही. यामुळे गावातून खनिज वाहून नेण्यासाठी वाहतूकदारांना नव्याने अनुमती देऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने राज्याचे खाण खाते आणि गोव राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २० फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.