खारीच्या वाट्याचा सहभाग !
श्रीराम सप्ताह विशेष ! (भाग ३)
२२ जानेवारीला अयोध्यापुरीत होणार्या भव्य दिव्य सोहळ्याची आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ! त्या निमित्ताने आता देशभरच काय, तर विश्वभर सर्वत्र श्रीरामनामाचा गजर चालू आहे. श्रीरामावरील भक्तीगीते लावली जात आहेत… भ्रमणभाषची ‘कॉलर ट्यून’, ‘रिंगटोन’वर ही भक्तीगीते ऐकायला मिळत आहेत… व्हॉट्सॲप स्टेटस, इन्स्टाग्राम, फेसबूक इत्यादी सामाजिक माध्यमांतून श्रीरामाशी संबंधित चलचित्रांचा प्रसार होत आहे. श्रीरामनामाचा गजर सर्वत्र दुमदुमत आहे…! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भक्तीमय वातावरण होण्यासाठी श्रीरामांच्या भक्तीगीतांचा प्रसार करण्याचे, तसेच मंदिरांच्या स्वच्छतेचे आवाहन केले आहे. त्यानंतर यात अजूनच वाढ होत आहे. जसजसा हा सोहळा जवळ येत आहे, तसतशी देशात सर्वांमध्ये प्रचंड उत्साहाची अन् चैतन्याची लहर पसरत आहे. श्रीरामचरित्राची पारायणे केली जात आहेत. श्रीरामकथांच्या माध्यमातून श्रीरामांचे दैवी चरित्र उलगडले जात आहे. देशभर सार्वत्रिक हिंदूंच्या एकोप्याचे हे वातावरण निर्माण होणे, हीसुद्धा एक अलौकिक गोष्ट आहे ! त्यायोगे देशभरातील हिंदू जागा होत आहे. जनसामान्यांचा हा श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यातील सहभाग देशात नवचैतन्य पसरवत आहे ! सामान्यांपासून साधू-संतांपर्यंत आणि कर्मचार्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वजण या सोहळ्यासाठी काही ना काही कृती वा सिद्धता करत स्वतःचे योगदान देत आहेत. काही जण त्यांचा वेळ, तन आणि मन अर्पण करत आहेत, तर काही जण त्यांच्या परीने या सोहळ्यासाठी विविध स्वरूपाचे दान देऊन त्यांचा खारीचा वाटा उचलत आहेत !
श्रीरामराया सीतामातेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यास लंकागमनासाठी जाण्यास निघाले, तेव्हा रामसेतूच्या उभारणीच्या कार्यात इवल्याशा खारीने जमेल तसे छोटे दगड, वाळू, माती नेऊन श्रीरामांची मनोभावे सेवा केली आणि धर्मकार्यातील तिचा सहभाग नोंदवला ! भगवान श्रीरामांप्रती असलेली खारूताईची श्रद्धा आणि तिची सेवेची तळमळ पाहून श्रीरामांनी तिला जवळ घेतले. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि तिचा उद्धार केला ! श्रीराममंदिराच्या सोहळ्यात सहभागी होऊन हिंदू आता वरीलप्रमाणे त्यांचा ‘खारीचा वाटा’ उचलत आहेत, तसाच येत्या काळातही भगवान श्रीरामाच्या दैवी धर्मकार्यातही सर्वांनी त्यांच्या परीने योगदान द्यायचे आहे ! हिंदूंनी त्यांच्या परीने; पण संघटित भावाने दिलेले योगदान त्यांना श्रीरामाचा कृपाशीर्वाद प्राप्त करून देईल !
श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणे, हेच केवळ आपले ध्येय नसून त्या रामरायाची प्रथम आपल्या हृदयात आणि नंतर देशभरात रामराज्याची स्थापना होणे, हे आपले ध्येय आहे ! सध्या देशभरात भ्रष्टाचारापासून आतंकवादापर्यंत आणि महिलांवरील अत्याचारांपासून दंगलींपर्यत सर्वत्र वाढलेल्या अराजकतेने जनता ग्रासली आहे. आधुनिकतेच्या नावाखाली अधर्माचरण वाढून मानव स्वत:च स्वत:चा विनाश ओढावून घेत आहे. विविध नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमांतून हे लक्षात येत आहे. असे असले, तरी भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील हिंदू जागे होत असल्याने मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे संघटनही होत आहे.
जनहो, भारतातील सध्याची परिस्थिती पालटण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे राष्ट्र आणि धर्म यांविषयी इतरांना जागृत करण्याची छोटीशी कृती जरी केली, तरी तो धर्मकार्यातील सहभाग होणार आहे. दैनंदिन जीवनात धर्माचरण करणे, तसेच हातातील भ्रमणभाषचा आणि समाजमाध्यमांचा उपयोग करून अधर्माला, धर्मद्रोही विचार पसरवणार्यांचा वैध मार्गाने निषेध करणे, देवतांची विटंबना टाळण्यासाठी प्रबोधन करणे, देव-धर्माविषयी अपप्रचार करणार्यांच्या विचारांचे खंडण करणे, स्वदेशीचा पुरस्कार करणे, लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांविषयी जागृती करणे, धर्माचे कार्य करणार्यांना साथ देणे इत्यादी माध्यमांतून आपण राष्ट्र अन् धर्म कार्यात सहभागी होऊ शकतो. स्वधर्माचा इतिहास जाणून घेतल्यास आणि स्वतः धर्माचरण केल्यास आपल्याला हे धर्मकार्य करण्यास निश्चित बळ मिळेल. चला तर मग श्रीरामरायाचा आशीर्वाद घेऊन यासाठी तळमळीने आणि श्रद्धेने प्रयत्न करूया अन् ‘खारीचा वाटा’ उचलून राममय होऊन जाऊया !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.