‘प्रभु आले मंदिरी’ : अनुभवू त्रेतायुगातील श्रीराममहिमा अंतरी !
२२ जानेवारी या दिवशी होणार्या श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विशेष…
भयमुक्त आणि जनहित असलेले रामराज्य भारतात आणण्यासाठी भगवान प्रभु श्रीरामाचे आगमन होत आहे !
‘रामायण’ उलगडण्यासाठी मॅसेच्युसेट्स, अमेरिका येथील श्री. नीलेश ओक यांनी केलेले अभूतपूर्व संशोधन !
स्वतंत्र भारताच्या इतिहासात इतके प्रदीर्घ, इतके तणावपूर्ण, इतके हिंसात्मक आंदोलन झाले; पण न्यायालयाच्या माध्यमातून लढा देऊन आता त्यावर प्रचंड मोठा विजय मिळवण्यात आला. त्यानंतरसुद्धा अतिशय शांतपणे आणि सुजाणपणे याचा आनंद साजरा केला गेला. असे हे रामजन्मभूमीचे आंदोलन ! त्या काळात या आंदोलनाची वादळी हवा अत्यंत उष्ण, अगदी अग्नीकुंडासारखी धगधगती होती. भारताच्या कानाकोपर्यांतून सहस्रो नव्हे, तर लाखो तरुण-तरुणींनी कारसेवेत भाग घेतला. अनेकांचे व्यावसायिक, शैक्षणिक, कौटुंबिक आयुष्य उलथापालथींनी भरून गेले. नेत्यांची नावे सर्वतोमुखी झाली; पण शिलेदारांची नावे ‘अनाम’ अशीच राहिली. खरेतर त्यांच्या योगदानाविना हा लढा यशस्वी होऊ शकला नसता. अशा अनेक अनामविरांचे स्वप्न आपणा सर्वांनाच रोमांचित करणार्या श्रीराममंदिर उद्घाटनामुळे यशस्वी होत आहे. त्यांच्या त्या लढवय्यांच्या वेदनांना ‘अश्रूंची झाली फुले’ असेच म्हणायला हवे. १७ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘रामायणाच्या रचनेस असा झाला प्रारंभ, श्रीरामकथा सर्वांच्या परिचयाची आणि रामायणाचा शोध घेण्यासाठी श्री. नीलेश ओक यांनी घेतलेले परिश्रम’, याविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/755676.html
६. रामायणातील निवडक घटना !
६ अ. समुद्राने सांगितल्यानुसार श्रीरामाकडून सेतू बांधण्याची वानरसेनेला आज्ञा ! : ‘किष्किंधा सोडल्यावर राम आणि वानरसेना समुद्रकिनार्याच्या वाटेवर न्यूनतम १ मास होती’, असे श्री. ओक खगोलशास्त्रीय निरीक्षणांच्या आधारे म्हणू शकले. सह्य (सह्याद्री), मलय आणि शेवरी मलय पर्वतरांगा ओलांडत ते दक्षिणसमुद्र तटावर आले. श्रीरामासह त्याच्या साहाय्यकांसमोर महासागर ओलांडण्याची समस्या होती. श्रीराम तीन रात्री अत्यंत नीतीपूर्वक समुद्राची उपासना करत राहिले; परंतु सागराने त्यांना दर्शन दिले नाही. श्रीराम संतापून लक्ष्मणाला म्हणाले, ‘हा समुद्र माझ्या क्षमाशीलतेला असमर्थ समजू लागला आहे. अशा मूर्खाविषयी दाखवलेली क्षमा व्यर्थ आहे.’ त्यानंतर ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित करून बाण धनुष्यावर चढवून खेचताच सागर मूर्तीमान प्रकटला आणि म्हणाला, ‘सौम्य रघुनंदना, पृथ्वी, वायू, आकाश, जल आणि तेज हे सर्व आपापल्या स्वभावानुसार वागतात. अगाध आणि अभंग रहाणे, हा माझा स्वभावच आहे; पण मी तुम्हाला यातून पार होण्याचा उपाय सांगतो. तो मार्ग म्हणजे तुम्ही सेतूबंधन करावे. मीही त्यांना (वानरांना) साहाय्य करीन. तुमच्या सेनेत ‘नल’ नामक वानर हा साक्षात् विश्वकर्माचा पुत्र आहे. तो शिल्पकलेत निपुण आहे. त्याने माझ्यावर पूल बांधावा, मी तो धारण करीन.’ रामाने वानरसेनेला आज्ञा दिली आणि सेतूबंधनाचे काम चालू झाले.
६ आ. श्रीरामाचा कृपाशीर्वाद आणि नलाचे मार्गदर्शन यांमुळे ५ दिवसांत सेतू बांधून पूर्ण ! : माल, अश्वकर्ण, बांबू, कुटज, अर्जुन, ताल आणि इतरही अनेक वृक्ष हे वानरांनी समुद्रात लोटले. महाकाय, महाबली वानरांनी मोठमोठ्या शिळा आणि पर्वत उखडून यंत्रांच्या साहाय्याने समुद्रात फेकले. काही वानर गवत आणि लाकूड यांच्या साहाय्याने भिन्न भिन्न जागी तरंगते पूल बांधत होते. खडक, झुडुपे आणि झाडांची घातलेली भर स्थिरावण्यासाठी काही वानरांनी दोरखंड खेचले. सेतू उभारणीच्या पहिल्या दिवशी वानर सेनेने १४ योजने पूर्ण केला, तर दुसर्या दिवशी २० योजने, तिसर्या दिवशी २१ योजने, चौथ्या दिवशी २२ योजने आणि पाचव्या दिवशी २३ योजने बांधून १०० योजने लांब आणि १० योजने रुंद एवढा विस्तीर्ण सेतू नलाच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या ५ दिवसांत बांधून पूर्ण झाला.
दशयोजनविस्तीर्णं शतयोजनमायतम् ।
ददृशुर्देवगंधर्वा नलसेतुं सुदुष्करम् ।।
– वाल्मीकि रामायण, युद्धकांड, सर्ग २२, श्लोक ७६
अर्थ : नलाने बनविलेल्या १०० योजने लांब आणि १० योजने रूंद पुलाला देवता अन् गंधर्वांनी पाहिले, ज्याला बनवणे फारच कठीण काम होते.
६ इ. सुंदर घडणीचा सेतू बांधणे दुष्कर कर्म आणि सेतूची सद्यःस्थिती ! : हा विशाल सेतू सुंदर घडणीचा, शोभिवंत, समतल आणि सुसंबद्ध होता. तो बांधणे हे खरोखर दुष्कर (अवघड) कर्म होते. आज तमिळनाडूमध्ये सापडलेले अवशेष याच सेतूचे आहेत. भारताच्या दक्षिणेकडील धनुषकोडी आणि श्रीलंकेच्या वायव्येकडील पांबन यांच्यामधील भूमीच्या वस्तूमानाची उपग्रह प्रतिमा ! ‘सेतुसमुद्रम् परियोजने’च्या अंतर्गत या सेतूची पुष्कळ हानी झाली आहे. तमिळनाडूतील रामेश्वरम्मध्ये असलेल्या या जागेचे नाव रामाच्या धनुष्याच्या आकाराच्या या सेतूमुळे ‘धून धनुष्कोटी’ असे झाले आहे.
६ ई. श्रीरामाने रावणवध केल्याचा दिवस ! : या सेतूच्या साहाय्याने समुद्र पार करत वानरसेनेच्या सुरक्षिततेची काळजी घेत राम आणि वानरसेना लंकेत पोचले. रावणाला शेवटची संधी म्हणून श्रीरामाने अंगदाला रावणाकडे पाठवले; पण अहंकारी रावणाने तीही संधी गमावली. घनघोर युद्ध चालू झाले. रावणाकडील अकंपन, प्रहस्त, कुंभकर्ण, नारांतक, महापार्ष, त्रिशिरा असे अनेक शूर लढवय्ये मारले गेले. अकराव्या दिवशी लक्ष्मणाने इंद्रजितालाही ठार केले. हा दिवस होता सर्वमान्य कालखंड पूर्व (इ.स.पूर्व) ४ जानेवारी १२२०८ .तेराव्या दिवशी स्वत: रावण सेनापतींसह रणांगणावर आला. इंद्राचा सारथी मातली इंद्राचा रथ घेऊन रामाला साहाय्य करायला आला. त्यांच्यात निकराची लढाई झाली. अगस्त्य ऋषी रामाजवळ आले आणि त्यांनी रामाला ‘आदित्य हृदय’ मंत्र म्हणण्यास सांगितले. रामाने दैवी मंत्रांनी अभिमंत्रित करून अस्त्र रावणावर फेकले. त्याने रावणाच्या हृदयाचा वेध घेतला आणि रावण भूमीवर कोसळला. हा दिवस होता सर्वमान्य कालखंड पूर्व ६ जानेवारी १२२०८ !
६ उ. बिभीषणाकडून रावणावर अंत्यसंस्कार ! : विलाप करणार्या बिभीषणाचे सांत्वन करत रामाने त्याला रावणावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. त्यानंतर अग्नीपरीक्षा देऊन सीतेने सतीत्व सिद्ध केल्यावर अग्नीने तिला रामाकडे सुपूर्द केले. दुसर्या दिवशी बिभीषणाने त्याच्या आदरातिथ्याचा स्वीकार करण्याची रामाला विनंती केली; परंतु रामाने शक्य तितक्या लवकर अयोध्येला परतण्याची इच्छा व्यक्त केली. लंकेत पोचण्यासाठी घेतलेल्या दीर्घ आणि खडतर मार्गाविषयी रामाने बिभीषणाजवळ सांगितले.
एतत् पश्य यथा क्षिप्रं प्रतिगच्छामि तां पुरीम् ।
अयोध्यां गच्छतो ह्येष पन्थाः परमदुर्गमः ।।
– वाल्मीकि रामायण, युद्धकांड, सर्ग १२१, श्लोक ७
अर्थ : तर आता आपण इकडे लक्ष द्यावे की, आम्ही लवकरात लवकर अयोध्यापुरीला कसे परत जाऊ शकू; कारण तेथपर्यंत पायी यात्रा करणार्यांसाठी हा मार्ग फारच दुर्गम आहे.
६ ऊ. बिभीषणाने सिद्ध केलेल्या पुष्पक विमानातून राम-लक्ष्मण यांनी घेतली महामुनी भरद्वाजांची भेट ! : बिभीषणाने श्रीरामाला आश्वासन दिले की, त्यांना पुष्पक विमान आकाशमार्गे एका दिवसात पोचवेल. बिभीषणाने पुष्पक विमान सज्ज केले. पुष्पक पाहून राम-लक्ष्मण आश्चर्यचकित झाले. मोठा आवाज करत पुष्पक आकाशमार्गे उडत होते. वाटेत ते किष्किंधा नगरी आणि ऋषि भरद्वाजांचा आश्रम यांच्याजवळ उतरले. त्यांनी भरद्वाज मुनींना अयोध्येविषयी, तसेच भरताविषयी विचारले. तेव्हा मुनी भरद्वाजांनी सांगितले, ‘रघुनंदन, भरत तुमच्या आज्ञेनुसार वर्तन करतो. तो जटा वाढवून तुमच्याच आगमनाची वाट पहात आहे. तुमच्या चरणपादुका समोर ठेवून तो सर्व कारभार चालवतो.’
६ ए. हनुमान आणि भरत यांची विलक्षण भेट ! : रामाने हनुमानाला राजा गुह आणि भरत यांना भेटण्यासाठी पाठवले. राम हनुमानाला म्हणाले, ‘‘भरताला माझ्या परत येण्याचे वृत्त सांग. हे सर्व ऐकून त्याच्या चेहर्यावर जे भाव उमटतील, मुखाची कांती, दृष्टी, तसेच संभाषण यांतून त्याचा मनोभाग जाणून घे. श्रीरामाच्या आज्ञेनुसार हनुमंत निषाद राजा गुहाला भेटून भरताला भेटायला गेला. अयोध्येपासून एक कोस दूर अंतरावर त्याला आश्रमवासी भरत दिसला. तो दुःखी आणि दुर्बल झाला होता. त्याचे अंतःकरण शुद्ध होते. तो ब्रह्मऋषींप्रमाणे तेजस्वी दिसत होता. हनुमानाने त्याची भेट घेऊन त्याला रामाच्या येण्याचे वृत्त सांगताच आनंदातिशयाने मूर्च्छित होऊन तो कोसळला. शुद्धीवर आल्यावर त्याने आनंदाश्रूंनी हनुमानाला आलिंगन देऊन न्हाऊ घातले.
६ ऐ. भरताच्या आज्ञेप्रमाणे शत्रुघ्नाकडून अयोध्यावासियांना श्रीरामाच्या स्वागताची आज्ञा ! : भरताने शत्रुघ्नाला हर्षपूर्वक आज्ञा दिल्या. अयोध्येतील सर्वांनाच श्रीरामचंद्राचे मुखदर्शन घेण्यासाठी नगराबाहेर येण्यास सांगितले. शत्रुघ्नाने आज्ञा दिली, ‘तुम्ही सारे उंचसखल भूमींचे खाचखळगे भरून तो समतल करा. अयोध्येपासून नंदिग्रामपर्यंतचा मार्ग स्वच्छ करा. संपूर्ण भूमीवर बर्फासारख्या थंड पाण्याचा शिडकावा करा. उद्या सूर्योदयापर्यंत लोकांनी नगरातील सर्व घरे सोनेरी पुष्पमालांनी, दाट फुलांच्या मोठ्या गजर्यांनी, कमलादी पुष्पांनी आणि पंचरंगी अलंकरांनी सजवावीत.’’
शोभयन्तु च वेश्मानि सूर्यस्योदयनं प्रति ।
स्रग्दाममुक्तपुष्पैश्च सुगन्धैः पञ्चवर्णकैः ।।
– वाल्मीकि रामायण, युद्धकांड, अध्याय १२७, श्लोक ९
अर्थ : उद्या सूर्योदयापर्यंत लोकांनी नगरांतील सर्व घरांना सोनेरी पुष्पमाला, दाट फुलांचे मोठे गजरे, सूताच्या बंधनाविरहित कमळ आदी पुष्पे, तसेच पंचरंगी अलंकारांनी सजवावे.
६ ओ. श्रीरामाच्या स्वागतासाठी भरताची वैशिष्ट्यपूर्ण भावपूर्ण सिद्धता ! : आठही मंत्री, पुष्कळ महावीर, हत्ती, घोडे, रथ यांच्यावर स्वार होऊन निघाले. दशरथाच्या सर्व राण्या नंदीग्रामात येऊन पोचल्या. धर्मात्मा आणि धर्मज्ञ भरत वडीलबंधूंच्या चरणपादुका शिरावर धरून शंख अन् भेरी या वाद्यांच्या गंभीर ध्वनीसह निघाला. श्वेतमालांनी सुशोभित शुभ्र रंगाचे छत्र आणि राजाच्या योग्यतेची, सोन्याने मढवलेली दोन श्वेत चवरेही (चवर्या म्हणजे माशा वगैरे हाकलण्यासाठी वनगायींच्या केसांच्या झुबक्याला मूठ बसवून सिद्ध केलेले साधन) त्याने आपल्यासमवेत घेतली होती.
पाण्डुरं छत्रमादाय शुक्लमाल्योपशोभितम् ।
शुक्ले च वालव्यजने राजार्हे हेमभूषिते ।।
– वाल्मीकि रामायण, युद्धकांड, अध्याय १२७, श्लोक १८
अर्थ : श्वेत माळांनी सुशोभित पांढर्या रंगाचे छत्र, तसेच राजांच्या योग्य सोन्यांनी मढवलेल्या दोन श्वेत चवर्याही त्यांनी आपल्या बरोबर घेऊन ठेवल्या होत्या.
६ औ. अयोध्यावासियांचा हर्षनाद स्वर्गलोकापर्यंत निनादला ! : हनुमानाने सांगितले, ‘‘हे पुष्पक विमान दुरून चंद्रासारखे दिसत आहे; पण याचा वेग मनासारखा आहे.’’ हनुमान असे सांगत असतानांच स्त्रिया, बालके, तरुण आणि वृद्ध सर्वच नगरवासीय यांच्या तोंडून ‘अहो, श्रीरामचंद्र येत आहेत. ते पहा श्रीराम !’ असे उद्गार ऐकू येऊ लागले. त्या नागरिकांचा हा हर्षनाद स्वर्गलोकापर्यंत निनादू लागला.
६ अं. श्रीराम-भरत भेट ! : श्रीरामचंद्रांनी सत्यपराक्रमी भरताला विमानावर आरूढ करून घेतले, तेव्हा त्याने रघुनाथांजवळ पोचल्यावर आनंदित होऊन त्यांना साष्टांग प्रणाम केला. त्याने श्रीरामांच्या पादुका त्यांच्या पायात घातल्या आणि म्हणाला, ‘माझ्या जवळ ‘ठेव’ म्हणून ठेवलेले तुमचे हे राज्य आज मी तुमच्या चरणी परत केले आहे. आज माझा जन्म सफल झाला.’ भरताचे उद्गार ऐकून सर्वांच्याच डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या.
६ क. श्रीरामाचा राज्याभिषेक ! : श्रीरामांनी अयोध्यापुरीत प्रवेश केला. महात्मा वसिष्ठांनी अन्य ऋत्विज ब्राह्मणांसह मुकुट आणि अनेक आभूषणांनी रामाला विभूषित केले. शत्रुघ्नाने त्यांच्यावर सुंदर श्वेतरंगाचे छत्र धरले. सुग्रीवाने एकीकडे श्वेतचवरी हातात घेतली, तर दुसरीकडे राक्षसराज बिभीषणाने चंद्राप्रमाणे चमकदार चवरी घेतली. बुद्धीमान श्रीरामांच्या राज्याभिषेककाळी देव-गंधर्व गाऊ लागले आणि अप्सरा नृत्य करू लागल्या. ‘भगवान श्रीराम’ या सन्मानाला सर्वथा योग्य होते.
अभिषेके तदर्हस्य तदा रामस्य धीमतः ।
भूमिः सस्यवती चैव फलवन्तश्च पादपाः ।।
गन्धवन्ति च पुष्पाणि बभूवू राघवोत्सवे ।
– वाल्मीकि रामायण, युद्धकांड, अध्याय १२८, श्लोक ७१ आणि ७२
अर्थ : बुद्धीमान राघवांच्या राज्याभिषेक समयी पृथ्वी पिकांनी हिरवीगार होऊन गेली, वृक्षांना फळे लागली आणि फुलात सुंगध भरून राहिला.
रामाचा राज्याभिषेक झाला, तो दिवस होता सर्वमान्य कालखंड पूर्व १३ जानेवारी १२२०८ !
(समाप्त)
– श्रीमती अलका गोडबोले, मुंबई (१२.१.२०२४)
(श्री. नीलेश ओक यांच्या ‘ऐतिहासिक राम’ या पुस्तकातून साभार)
राम-रावण युद्धाचा पहिला दिवस, युद्ध समाप्तीचा दिवस, राम अयोध्येला परतण्याचा दिवस या सर्व घटनांची कालनिश्चिती करण्याचे काम श्री. नीलेश ओक यांनी आपल्या ‘The Historic Rama’ या इंग्रजी पुस्तकात ग्रंथित केले आहे. मराठी वाचकांसाठी त्याचा अनुवाद श्रीमती अलका गोडबोले यांनी ‘ऐतिहासिक राम’ या नावाने केला असून ते पुस्तक ‘परममित्र प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे. – श्रीमती अलका गोडबोले, मुंबई (१२.१.२०२४) |
सध्या अनेक पुरो(अधो)गामी, निधर्मी काँग्रेसी नेते आणि काही बुद्धीप्रामाण्यवादी हे ‘प्रभु श्रीराम अस्तित्वात नव्हते’, ‘रामसेतू प्रभु श्रीरामांनी वानरांकडून बांधून घेतलेला नाही’, अशा प्रकारची टीका करण्यात धन्यता मानतात.श्री. नीलेश ओक यांनी ‘प्रभु श्रीरामाचा जन्म, प्रभु श्रीरामांना झालेला वनवास, सेतूबंधन, राम-रावण युद्ध आणि प्रभु श्रीरामाचा राज्याभिषेक’, आदी संशोधन खगोलशास्त्राच्या आधारे केले आहे. श्री. ओक यांनी आधुनिक विज्ञानाच्या आधारेच केलेल्या लिखाणातून टीका करणार्यांना चपराकच दिली आहे. एवढे करूनही पुरो(अधो)गामी, निधर्मी काँग्रेसी नेते आणि काही बुद्धीप्रामाण्यवादी यांनी ‘पडलो तरी पाय वर’ या उक्तीनुसार प्रभु श्रीरामाचे अस्तित्व नाकारले, तरी आश्चर्य ते काय ? – संपादक |