सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’च्या आधी नृत्यसेवेचा सराव करतांना आणि नृत्यसेवा सादर करतांना साधिकेने अनुभवलेला गोपीभाव !
१. ‘अडचणींमुळे नृत्याचा सराव करायला जमणार नाही’, असे वाटून रडू येणे
‘मला ब्रह्मोत्सवात नृत्य करायचे आहे’, असे समजले. तेव्हा ‘माझ्याकडे असलेली सेवा आणि आमच्या गावातील देवीचा उत्सव यांमुळे मला नृत्याचा सराव करायला जमणार नाही’, असे वाटले अन् मला रडू आले.
२. ‘देव नृत्यसेवेतील अडचणी दूर करणारच’,अशी श्रद्धा ठेवून सेवेला आरंभ करणे
प्रत्येक वेळी मला गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवात सेवा मिळते. त्या वेळी ‘मला काहीतरी अडचणी येतात आणि ही सेवा करता येणार नाही’, या विचाराने रडू येते. नंतर ‘त्या अडचणी दूर होतात आणि सेवेतील आनंद मिळतो’, असे अनुभवता येते. ‘देव अडचणी दूर करणारच’, अशी श्रद्धा ठेवून मी सेवेला आरंभ केला. ‘सेवेच्या संधीचे सोने करायचे आहे आणि साक्षात् श्रीमन्नारायणस्वरूप गुरुमाऊलींच्या समोर नृत्यसेवा सादर करायची आहे, तर अडथळ्यांचा विचार करायचा नाही’, असे मी ठरवले.
३. आईने नृत्यसेवेला प्राधान्य देण्यास सांगणे आणि नृत्याचे कपडे शिवून देऊन साहाय्य करणे
ब्रह्मोत्सवाच्या दिवशी आमच्या जवळच्या एका नातेवाइकाचे लग्न होते. त्यांना देण्यासाठी भेटवस्तू विकत आणायची होती आणि नृत्याच्या सरावासाठीही वेळ द्यावा लागणार होता; म्हणून मला ताण येऊन रडू येत असे. मी गुरुमाऊलींना प्रार्थना केली, ‘माझ्या सेवेतील अडथळे दूर होऊ देत.’ तेव्हा आईने (सौ. सुहासिनी पवार यांनी) मला नृत्यसेवेला प्राधान्य देण्यास सांगून साहाय्य केले. माझ्या आईलाही ब्रह्मोत्सवामध्ये सेवा होती, तरीही तिने मला नृत्याचे कपडे शिवून दिले. तिने मला लग्नासाठी लागणार्या शंभर करंजा करून देण्यास साहाय्य केले. यामुळे मला गुरुमाऊलींप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
४. सहसाधिकेने अल्प वेळेत सुंदर घागरा शिवून देणे
‘मी घागरा कोणत्या रंगाचा घालायचा ?’, यात सतत पालट होत होते. कार्यक्रमाला केवळ २ – ३ दिवस शेष होते. तेव्हा माझ्याकडे असलेल्या एका साडीचा घागरा शिवायचे ठरले. कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) वयाने लहान असूनही तिने हाताने केवळ २ घंट्यांत साडीचा अतिशय सुंदर घागरा शिवला. घागरा एवढा सुंदर शिवला होता की, ते पाहून सर्वांची भावजागृती होत होती.
५. नृत्याच्या सरावासाठी आश्रमात रहायला येणे
ब्रह्मोत्सवात करायच्या नृत्याचा सराव करण्यासाठी आम्हाला २ – ३ दिवस आश्रमात रहाण्यासाठी येण्यास सांगितले होते; मात्र मला ठरलेल्या नियोजनात पालट करणे कठीण होते. तेव्हा ‘गोपी आहे त्या स्थितीत सर्व सोडून कृष्णाकडे आल्या होत्या. त्याप्रमाणेच ‘मलाही जायचे आहे’, असा भाव ठेवून मी सर्व सिद्धता केली. त्यामुळे माझ्या मनाचा संघर्ष थांबून मला आनंद मिळाला.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी गोपीभावात रहाण्यास सांगणे
मी सराव करतांना शरणागतभावाने सतत प्रार्थना करत होते. ‘या सेवेतील सर्वांची मने जुळली आहेत’, असे मला जाणवत होते. त्यामुळे एकमेकांना चुका सांगून सेवा परिपूर्ण होण्यासाठी सर्व जण प्रयत्न करत होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आम्हाला गोपीभावात रहाण्यासाठी सांगितले होते. त्यांच्या संकल्पामुळे मला गोपीभाव अनुभवता येत होता.
७. गुरुकृपेने नृत्यसेवा आनंदाने आणि भावपूर्ण करता येणे
नृत्य चालू होण्याच्या १ घंटा आधी माझ्या मनात ‘मला नृत्यातील एक पदन्यास (स्टेप) करता येणार नाही’, असा तीव्र नकारात्मक विचार येत होता. मी सतत प्रार्थना करत होते. मी स्वयंसूचना सत्रेही करत होते. मी नकारात्मक विचाराकडे दुर्लक्ष करून शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव यांमध्ये रहाण्याचा प्रयत्न केला. गुरुकृपेने मला नृत्यसेवा आनंदाने आणि भावपूर्ण करता आली.
हे गुरुमाऊली, ‘माझी काहीच पात्रता नसतांना तुम्हीच माझ्याकडून नृत्यसेवा करून घेतली आणि माझ्या जीवनाचे सार्थक केले’, याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– अधिवक्त्या (सौ.) अदिती अमित हडकोणकर, शिरदोन, गोवा.(२९.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |