वाढेफाटा ते आनेवाडी पथकर नाका या महामार्गावरील पोलीस गस्त चालू करा ! – श्रीरंग काटेकर, सामाजिक कार्यकर्ते

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग काटेकर

सातारा, १७ जानेवारी (वार्ता.) – सातारा-पुणे महामार्गावरील वाढेफाटा ते आनेवाडी पथकर नाका या अंतरामधील पोलीस गस्त दीड वर्षांपासून बंद आहे. ही पोलीस गस्त तात्काळ चालू करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग काटेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस गस्त बंद असल्यामुळे महाविद्यालयीन युवतींची छेड काढणे आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सातारा-पुणे महामार्ग देशातील अत्यंत वर्दळीचा महामार्ग आहे. हा रस्ता महामार्ग प्राधिकरणांतर्गत येत असल्याने महामार्गाच्या समस्या आणि सुरक्षितता हे प्राधिकरणाचे उत्तरदायित्व आहे; मात्र प्राधिकरणाने हे उत्तरदायित्व झटकले आहे कि काय ? असा प्रश्न अनेकदा घडलेल्या गंभीर अपघातांच्या नोंदीवरून स्पष्ट जाणवतो. अनेक ठिकाणी अनावश्यक गतिरोधक असणे, गतिरोधकांना पांढरा रंग नसणे, रस्त्यावर सुरक्षा चिन्हे नसणे, रस्त्यांना पडलेले खड्डे वेळेत न बुजवणे, महामार्गावरील उपाहारगृहांची सोय म्हणून अनधिकृतपणे रस्ता दुभाजक निर्माण करणे, अशी स्थिती महामार्गावर पहायला मिळत आहे. दीड वर्षांपूर्वी महामार्ग पोलिसांकडून या सर्व गोष्टींवर उपाययोजना म्हणून गस्त घालण्यात येत होती; मात्र आता ती बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या ३५ वे रस्ता सुरक्षा अभियान चालू असून महामार्ग पोलिसांनी महाविद्यालयीन युवती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा एकदा वाहन गस्त चालू करावी.