ठाणे येथे पालिका अधिकार्यांची खोटी स्वाक्षरी करून ठेकेदाराने पैसे काढले !
ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकण्याची मागणी
ठाणे – ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन अधिकार्यांची खोटी स्वाक्षरी करून महापालिकेच्या लेखा विभागाकडून ५ लाख १० सहस्र २५१ रुपये सुरक्षा अनामत रक्कम काढून घेतल्याचा आरोप भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन तिघांविरोधात फौजदारी गुन्हा नोंद करून संबंधित ठेकेदार आस्थापनाला काळ्या सूचीत टाकण्याची मागणी केली आहे.
१. विविध शौचालयांच्या दुरुस्तीच्या कामासाठी १ कोटी ७७ लाख ५२ सहस्र रुपयांचा ठेका ‘जान्हवी कन्स्ट्रक्शन’चे मालक संजय घोसाळकर यांना वर्ष २०१७ मध्ये देण्यात आला होता. त्यासाठी आस्थापनाने महापालिकेत ५ लाख १० सहस्र २५१ रुपयांची अनामत रक्कम जमा केली होती.
२. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सुधीर सोनवणे, उप अभियंता शैलेंद्र चारी आणि कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे यांच्या खोट्या स्वाक्षर्या करून अनामत रक्कम काढून घेण्यात आली आहे.
३. भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पालिकेने केलेल्या चौकशीत अजित सिंह, अभिषेक सिंह आणि संतोष पवार यांनी खोट्या स्वाक्षर्या केल्याचे उघड झाले आहे, असे वाघुले यांचे म्हणणे आहे.
४. ‘जान्हवी कन्स्ट्रक्शन’चे मालक संजय घोसाळकर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. तसेच लेखा आणि वित्त विभागाने १७ ऑगस्ट या दिवशी बनावट स्वाक्षर्याप्रकरणी संबंधित अधिकार्यांना कायदेशीर तक्रार प्रविष्ट करण्याचे सुचवले आहे; पण ५ मास उलटूनही कारवाई कारवाई झालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
संपादकीय भूमिका :असे प्रकार करून फसवणूक करणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |