महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधनकेंद्रात नामस्‍मरण करून नृत्‍य केल्‍यावर दादर (मुंबई) येथील कथ्‍थक नृत्‍यांगना विद्यावाचस्‍पती (सौ.) रूपाली देसाई यांना जाणवलेली सूत्रे

नर्तक ‘समे’त नृत्‍याचा आत्‍मा शोधतो, अध्‍यात्‍मात ‘सम’ शोधली, तर भगवंत भेटेल ! 

‘१२.९.२०२३ या दिवशी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत समन्‍वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी कथ्‍थक विद्यावाचस्‍पती (सौ.) रूपाली देसाई यांना ‘पॉवर पॉईंट’च्‍या (टीप १) माध्‍यमातून संगीतातील संशोधन दाखवले. तेव्‍हा उत्‍स्‍फूर्तपणे प्रतिक्रिया व्‍यक्‍त करतांना त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘आम्‍ही ‘सम’ (टीप २) मध्‍ये नृत्‍याचा आत्‍मा शोधतो. त्‍याच्‍याही पुढे जाऊन अध्‍यात्‍मात ‘सम’ शोधली, तर खरा भगवंत भेटेल !’’ (१२.९.२०२३)

टीप १ – ही एक संगणकीय प्रणाली असून यावर संबंधित विषयाची विविध वैशिष्‍ट्ये दाखवता येतात.

टीप २- ‘सम’ म्‍हणजे तालाची पहिली मात्रा.

११.१.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात विद्यावाचस्‍पती (सौ.) रूपाली देसाई यांनी नृत्‍यसाधनेविषयी व्‍यक्‍त केलेले मनोगत पाहिले. आजच्‍या लेखात नृत्‍यापूर्वी नामस्‍मरण केल्‍यावर त्‍यांना जाणवलेली सूत्रे पहाणार आहोत.

सौ. रूपाली देसाई

२. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयात संशोधनासाठी नृत्‍याचा प्रयोग करतांना जाणवलेली सूत्रे

२ अ. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधनकेंद्रामध्‍ये नृत्‍यप्रस्‍तुती करतांना ईश्‍वराचे दर्शन होणे : येथे (महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयामध्‍ये)  संशोधनासाठी माझ्‍या नृत्‍याचे ३ दिवस प्रयोग घेण्‍यात आले. तेव्‍हा आत्‍मप्रेरणा (कलेकडे साधना म्‍हणून पहाण्‍याचा दृष्‍टीकोन), आत्‍मसंशोधन (अंतर्मुखता) आणि आत्‍मानंद (त्‍यातून मिळणारा आनंद) यांचा अभ्‍यास करतांना, अनुभव घेतांना मला ईश्‍वराचे दर्शन झाले. कला प्रस्‍तुत करतांना कलाकाराला कधीतरी क्षणभरच ईश्‍वरदर्शनाची अनुभूती येते; पण प्रत्‍येक वेळी येत नाही.

२ आ. हे संशोधनकार्य बघितल्‍यावर ‘कलाकाराने अजून कुठले आणि कसे प्रयत्न करायला हवेत ?’, हे लक्षात येणे : महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयात केले जाणारे प्रयोग आणि संशोधनकार्य यांतून आम्‍हाला पुष्‍कळ नवीन गोष्‍टी शिकता आल्‍या. ‘आता आम्‍ही काय करत आहोत ?’, ‘अजून आम्‍हाला काय करायला हवे ?’ आणि ‘आम्‍ही काय केल्‍याने या संशोधनकार्याला आमचा हातभार लागेल ?’, हे आमच्‍या लक्षात येत आहेे. येथे येऊन आम्‍ही पुष्‍कळ काही शिकून जात आहोत.

३. नृत्‍याच्‍या एका संशोधनात्‍मक प्रयोगात नृत्‍याच्‍या पूर्वी नामजप करून नृत्‍य केल्‍यावर आलेली अनुभूती

३ अ. लहानपणी घरातील वडीलधार्‍या व्‍यक्‍तींनी ईश्‍वरस्‍मरण करून दिवसाचा आरंभ करण्‍यास शिकवल्‍याचे स्‍मरण होणे : लहानपणापासून घरातील वडीलधार्‍या व्‍यक्‍तींनी आम्‍हाला नामजपाचे महत्त्व सांगितले होते; मात्र तेव्‍हा ते मला कळले नव्‍हते. माझ्‍या घरातील वडीलधार्‍या व्‍यक्‍ती नामस्‍मरण करत आणि आम्‍हालाही त्‍याचे महत्त्व सांगत असत. दिनचर्येचा आरंभ सकाळी भगवंताचे नाम घेऊन केला जायचा आणि अजूनही केला जातो; पण तेव्‍हा ‘आम्‍ही नामस्‍मरण करत आहोत’, अशी आम्‍हाला जाणीव नव्‍हती. येथे (अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधनकेंद्रात) आल्‍यावर मला ‘नृत्‍याच्‍या प्रस्‍तुतीकरणापूर्वी नामजप करावा’, हे नवीन सूत्र शिकायला मिळाले. एरवी कार्यक्रमात नृत्‍याच्‍या प्रस्‍तुतीकरणासाठी समयमर्यादा असल्‍यामुळे नृत्‍याच्‍या प्रस्‍तुतीकरणाला एक मर्यादा येते. नृत्‍याच्‍या सिद्धतेलाही वेळेची मर्यादा असते. या वेळेच्‍या मर्यादा पाळतांना ‘नृत्‍य प्रस्‍तुतीकरणापूर्वी भगवंताचे स्‍मरण करायला हवे’, हे मी विसरूनच गेले होते.

३ आ. नृत्‍यापूर्वी इष्‍टदेवतेचा नामजप केल्‍यावर प्रारंभी अंधार दिसणे, नंतर तो फिकट होत जाऊन शांती जाणवून ‘डोळे उघडू नयेत, ती शांती अनुभवावी’, असे वाटणे : नामजप करून नृत्‍याचे प्रस्‍तुतीकरण करतांना ‘काय जाणवते ?’, याचा प्रयोग केल्‍यावर मला अद़्‍भुत आणि दैवी अनुभव आले. नामस्‍मरणासाठी मी सर्वप्रथम डोळे बंद केल्‍यावर मला ‘भीती वाटावी’, इतका गडद अंधार दिसला. त्‍यानंतर तो रंग थोडा निळसर किंवा राखाडी झाला, पुढे तो फिकट होत मला पांढरा स्‍वच्‍छ प्रकाश दिसला. मला या दैवी अनुभूतीचा अर्थ कळला नाही; पण तेव्‍हा मला ‘डोळे उघडायला नको’, असे वाटत होते. नामस्‍मरणानंतर नृत्‍याच्‍या प्रस्‍तुतीकरणासाठी मी उभी राहिल्‍यावर नृत्‍याच्‍या सर्व तांत्रिक कृती करत होते; मात्र मनाला आतून एक वेगळेच समाधान किंवा शांती जाणवत होती. ‘नृत्‍यातून सकारात्‍मक स्‍पंदने येत आहेत’, असे मला जाणवत होते. आजपर्यंत मला नृत्‍याच्‍या प्रस्‍तुतीकरणांमध्‍ये अशा प्रकारच्‍या दैवी अनुभूती कधी आल्‍या नाहीत.

३ इ. संशोधनाच्‍या वेळी नृत्‍य करतांना श्री गुरूंचे स्‍मरण आणि इष्‍टदेवतेचे नामस्‍मरण केल्‍याने नृत्‍याच्‍या नेहमीच्‍या हालचालींमध्‍येही काहीतरी वेगळेपण जाणवणे : मी संशोधनासाठी नृत्‍य करतांना श्री गुरूंचे स्‍मरण आणि इष्‍टदेवतेचे नामस्‍मरण करून श्री गुरूंनी शिकवल्‍याप्रमाणेच नृत्‍य करत होते; मात्र नृत्‍य करतांना मला आतून काहीतरी वेगळेच जाणवत होते. माझ्‍या नृत्‍याच्‍या हालचाली नेहमीप्रमाणेच होत होत्‍या; मात्र मला त्‍यात वेगळेपणा जाणवत होता.

३ ई. विद्यार्थिंनींना नृत्‍य करण्‍याआधी नामस्‍मरण करायला सांगणार असणे : आता मी माझ्‍या विद्यार्थिनींनाही सरावापूर्वी गुरुस्‍मरण करून नामजप करण्‍याचे महत्त्व पुढीलप्रमाणे सांगीन, ‘नामस्‍मरणासाठी वेळ काढा. दिनचर्या चालू करतांना तुमची जिथे श्रद्धा आहे, उदा. श्रीकृष्‍ण, शिव, एखादी देवता किंवा ईश्‍वरी शक्‍ती हिचे स्‍मरण करा आणि नामजप करून नृत्‍याचा सराव करा.’

३ उ. कलेतून मोक्षप्राप्‍ती करण्‍यासाठी आधी कला शिकणे, तिचा सराव, मनन-चिंतन करणे महत्त्वाचे असणे आणि त्‍यानंतर ईश्‍वरप्राप्‍ती हा टप्‍पा येणे : आजकाल ‘अनुभूती’, ‘मोक्षप्राप्‍ती’ इत्‍यादी शब्‍द मुलांच्‍या सहज बोलण्‍यात येतात; पण त्‍यासाठी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने गेले पाहिजे. त्‍यासाठी आधी कला शिका, सराव आणि मनन-चिंतन करा, मग त्‍यातून मिळणार्‍या आनंदाची प्राप्‍ती करा. त्‍यानंतर त्‍यातील समजलेल्‍या सूत्रांवर काम करा. त्‍यासाठी आपण आत्‍मप्रेरणा (कलेकडे साधना म्‍हणून पहाण्‍याचा दृष्‍टीकोन), आत्‍मानंद (त्‍यातून मिळणारा आनंद) आणि आत्‍मसंशोधन करणे (अंतर्मुख रहाणे) अत्‍यंत महत्त्वपूर्ण आहे. हे शिकल्‍यावर साधनेचा टप्‍पा येतो. त्‍यानंतर ईश्‍वरप्राप्‍ती हा टप्‍पा येईल. हे एका जन्‍मात साध्‍य होणे अशक्‍य आहे. ‘मी कुठेपर्यंत जाईन ?’, हे मलाही ठाऊक नाही; पण श्री गुरु आणि भगवंत यांचे आशीर्वाद माझ्‍या समवेत आहेत. त्‍यांनी जे शिकवले, ते घेऊन मला पुढे जायचे आहे. आता कुठेही थांबायचे नाही.

४. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाने दाखवलेल्‍या  या मार्गाविषयी पुष्‍कळ कृतज्ञता वाटणे

खरेतर, मला पुष्‍कळ बोलायचे आहे; मात्र माझे मन भरून आले आहे. माझी भावजागृती होत आहे. मला एकच महत्त्वाची गोष्‍ट सांगावीशी वाटते, ‘आपल्‍या या कार्यात मलाही सहभागी व्‍हायचे आहे. तुम्‍ही (महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय) मला बोलवाल, तेव्‍हा मी येईन. तुम्‍ही कलेला विज्ञान आणि अध्‍यात्‍म यांची जोड देण्‍याचा जो मार्ग दाखवला आहे, त्‍याचा मी स्‍वतः अभ्‍यास करीन आणि माझ्‍या विद्यार्थ्‍यांनाही तो समजावून सांगण्‍याचा प्रयत्न करीन. धन्‍यवाद आणि नमस्‍कार !’

– सौ. रूपाली देसाई (कथ्‍थक विद्यावाचस्‍पती), दादर (मुंबई) (१४.९.२०२३)

हे पण वाचा :सनातन प्रभात

दादर (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना विद्यावाचस्पती (सौ.) रूपाली देसाई यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्राला दिलेली सदिच्छा भेट !