साधनेची आवड नसतांनाही केवळ परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यातील गुणांमुळे त्‍यांच्‍याकडे आकर्षित होऊन साधना करून ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठलेले अधिवक्‍ता रामदास केसरकर (वय ७० वर्षे) !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले
‘अधिवक्‍ता रामदास केसरकर यांच्‍या या लेखमालेचा सर्वांत अधिक लाभ मलाच झाला आहे. त्‍याचे कारण हे की, त्‍यांनी लिहिलेले माझ्‍या जीवनातील अनेक वर्षांतील अनेक प्रसंग मला आठवत नव्‍हते, ते या लेखमालेमुळे मला आठवले. त्‍यामुळे आता माझे जीवनचरित्र लिहिण्‍याची तळमळ असलेले साधक मला जेव्‍हा जीवनातील प्रसंग विचारतात, तेव्‍हा मला या लेखमालेमुळे अनेक प्रसंग सांगता येतील.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.१०.२०२२) 

१७.१.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात आपण ‘अधिवक्‍ता केसरकर यांनी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या समवेत केलेला प्रचारदौरा आणि दौर्‍यात त्‍यांना जाणवलेली सूत्रे’ पाहिली. आजच्‍या भागात ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यातील गुणांमुळे आणि त्‍यांनी सांगितल्‍याप्रमाणे नामजप केल्‍यावर अधिवक्‍ता केसरकर यांना अनुभूती आल्‍या आणि त्‍यानंतर ‘अधिवक्‍ता केसरकर परात्‍पर गुरु डॉ. आठवले जे सांगतील, ते सहजतेने कसे स्‍वीकारत गेले ?’, ते पहाणार आहोत.(भाग ३)

५. साधना चालू केलेली नसतांनाही परात्‍पर गुरु डॉ. आठवलेे यांच्‍या समवेत केलेला पहिला प्रचारदौरा !

अधिवक्ता रामदास केसरकर

५ ई. गोवा येथील अभ्‍यासवर्ग

५ ई १. पणजी येथे डॉ. आठवले यांच्‍या सासुरवाडीला मुक्‍काम : त्‍या अभ्‍यासवर्गाच्‍या समाप्‍तीनंतर लगेचच आमचा गोव्‍याकडे जाण्‍यासाठी प्रवास चालू झाला. त्‍या रात्री आम्‍ही पणजी येथे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या सासुरवाडीला मुक्‍काम केला. तिथे गोव्‍यातील साधक त्‍यांची वाटच पहात होते. रात्री जेवण झाल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे गोव्‍यातील साधकांशी गोव्‍यातील प्रचार आणि दुसर्‍या दिवशी फोंडा (गोवा) येथील नियोजित अभ्‍यासवर्ग यांच्‍या संदर्भातील बोलणे झाले. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी माझी तेथील साधकांशी ओळख करून दिली आणि ‘ते साधक कुठली सेवा करतात ?’, ते मला सांगितले.

५ ई २. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी रात्री पुष्‍कळ उशिरापर्यंत साधकांशी चर्चा करणे आणि पहाटे नेहमीप्रमाणे लवकर उठणे : परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची साधकांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा चालली होती. दुसर्‍या दिवशी (१०.२.१९९४) मी पहाटे ५ वाजता उठलो. तेव्‍हा पाहिले, तर रात्री ३ वाजता झोपूनही परात्‍पर गुरु डॉक्‍टर पहाटे ५ च्‍या आधी उठून स्नानासाठी स्नानगृहात गेले होते. त्‍यानंतर सिद्धता करून आम्‍ही सकाळी ९.४० वाजता फोंडा येथील अभ्‍यासवर्गाच्‍या ठिकाणी गेलो.

५ ई ३. आदल्‍या दिवशी रात्री पुष्‍कळ जागरण होऊनही दुसर्‍या दिवशी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत उत्‍साहाने कार्यरत असणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले ! : परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ‘अभ्‍यासवर्गाची सिद्धता कशी केली आहे ?’, ते पाहिले आणि सकाळी १० वाजता अभ्‍यासवर्ग चालू केला. दुपारी जेवणासाठी अर्धा घंटा थांबून पुन्‍हा वर्ग चालू करून तो दुपारी ४ वाजता थांबवला. त्‍यानंतर इंग्रजी भाषिकांसाठी इंग्रजीमध्‍ये १ घंटा वर्ग घेऊन त्‍या दिवशीच्‍या अभ्‍यासवर्गाची ५ वाजता सांगता केली. नंतर त्‍यांनी फोंडा येथील काही साधकांच्‍या घरी जाऊन साधकांच्‍या कुटुंबियांना भेटी दिल्‍या. या भेटीत परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांच्‍या कुटुंबियांशी संवाद साधला. त्‍यांनी साधकांच्‍या शंकांचे निरसन केले आणि ते रात्री उशिरा निवासासाठी पुन्‍हा पणजीला आले.

५ उ. परतीचा प्रवास : त्‍या रात्री पुन्‍हा उशिरा झोपूनही दुसर्‍या दिवशी ते नेहमीप्रमाणे पहाटे ४.३० वाजता उठले. सगळे आवरून सकाळी ८ वाजता आम्‍ही मुंबईकडे जाण्‍यासाठी निघालो. मुंबईच्‍या या परतीच्‍या प्रवासात साधक श्री. दिनेश शिंदे गाडी चालवण्‍याची सेवा करत होते. परात्‍पर गुरु डॉक्‍टर मध्‍ये मध्‍ये त्‍यांना ‘गाडीचा वेग वाढवणे, गाडीच्‍या ‘अ‍ॅव्‍हरेज’साठी झालेल्‍या प्रवासाची नोंद ठेवणे, गाडीत इंधन भरणे, गाडीतील वातानुकूलन यंत्र चालू किंवा बंद करणे’ इत्‍यादींविषयी सूचना देत होते.’

६. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘अध्‍यात्‍मात सर्व उलटे असते, म्‍हणजे झाडाची पाने, फळे, फुले भूमीत आणि मुळे भूमीवर असतात’, असे सांगणे अन् त्‍याचा अर्थबोध पुढे साधना केल्‍यानंतर होणे 

‘गोवा ते मुंबई या परतीच्‍या प्रवासात चिपळूणच्‍या जवळपास मार्गालगत झोलाईदेवीचे मंदिर आहे. त्‍या मंदिराजवळ परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी श्री. दिनेश शिंदे (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) यांना गाडी थांबवण्‍यास सांगितली. तिथे उतरून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांसह आम्‍ही सगळ्‍यांनी झोलाईदेवीचे दर्शन घेतले. गाडीकडे परत जात असतांना मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या समवेत होतो. तेव्‍हा ते मला म्‍हणाले, ‘‘केसरकर, आमच्‍या अध्‍यात्‍मात सगळे उलटे असते, म्‍हणजे झाडाच्‍या फांद्या, पाने, फुले, फळे खाली भूमीत आणि पाळेमुळे भूमीच्‍या वर असतात.’’ त्‍यांच्‍या या वाक्‍याचा मला काही अर्थबोध झाला नाही आणि मला तो समजून घेण्‍याची इच्‍छाही झाली नाही; परंतु पुढे काही वर्षे त्‍यांच्‍या मार्गदर्शनानुसार साधना केल्‍यानंतर मला त्‍या वाक्‍याचा अर्थबोध झाला. गीतेत या अर्थाचा पुढील श्‍लोक आहे,

ऊर्ध्‍वमूलमधःशाखमश्‍वत्‍थं प्राहुरव्‍ययम् ।
छन्‍दांसि यस्‍य पर्णानि यस्‍तं वेद स वेदवित् ॥ – श्रीमद़्‍भगवद़्‍गीता
(अध्‍याय १५, श्‍लोक १)

अर्थ : भगवान श्रीकृष्‍ण म्‍हणाले, ‘आदिपुरुष परमेश्‍वररूपी मूळ असलेल्‍या, ब्रह्मदेवरूप मुख्‍य फांदी असलेल्‍या, ज्‍या संसाररूप अश्‍वत्‍थवृक्षाला अविनाशी म्‍हणतात, तसेच वेद ही ज्‍याची पाने म्‍हटली आहेत, त्‍या संसाररूपी वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्त्वतः जाणतो, तो वेदांचे तात्‍पर्य जाणणारा आहे.’

हे संसारवृक्षाचे वर्णन आहे. त्‍याचे मूळ म्‍हणजे परमात्‍मा ! तो वर आहे आणि फांद्या म्‍हणजे संसाराचा पसारा खाली पसरला आहे. हे जाणणे म्‍हणजेच ज्ञान होणे. अध्‍यात्‍मात हेच जाणणे महत्त्वाचे असते. साधना केल्‍यावर हा अर्थ माझ्‍या लक्षात आला.

७. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा त्‍वरित निर्णय  घेण्‍याचा आणि गतीने कामे करण्‍याचा वैशिष्‍ट्यपूर्ण गुण !

७ अ. अधिवक्‍ता केसरकर यांनी स्‍वतःला ठाण्‍याला सोडायला सांगितल्‍यावर परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी त्‍वरित तसे साधक चालक श्री. दिनेश शिंदे यांना सांगणे : त्‍यानंतर आमचा मुंबईकडील पुढील प्रवास चालू झाला. रात्री १२.३० वाजता आमची गाडी पनवेलच्‍या जवळ आल्‍याचे पाहून ‘गाडी वाशी पुलावरून थेट मुंबईला जाणार’, हे लक्षात येऊन मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना म्‍हणालो, ‘‘मला आधी ठाण्‍याला सोडा.’’ हे ऐकल्‍यावर त्‍यांनी क्षणाचाही विलंब न करता चालक साधक श्री. दिनेश शिंदे यांना सांगितले, ‘‘आधी केसरकरांना ठाण्‍याला सोडून मग आपण मुंबईला जाऊ.’’ त्‍याप्रमाणे त्‍यांनी मला रात्री १.३० वाजता ठाणे येथील माझ्‍या घरी सोडले आणि त्‍यांची गाडी ठाण्‍याहून मुंबईकडे रवाना झाली. त्‍यानंतर मी लगेच झोपी गेलो.

७ आ. रात्री परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या गाडीचा ‘पाटा’ तुटल्‍यामुळे साधक गाडी मागण्‍यासाठी अधिवक्‍ता केसरकर यांच्‍याकडे येणे : रात्री २ वाजता माझ्‍या सदनिकेच्‍या दारावर ‘टक्, टक्’, असा आवाज झाला; म्‍हणून मी दार उघडले. पहातो तर साधक श्री. दिनेश शिंदे आणि श्री. आठलेकर बाहेर उभे असलेले दिसले. मी त्‍यांना विचारले, ‘‘काय झाले ?’’ तेव्‍हा श्री. दिनेश शिंदे मला म्‍हणाले, ‘‘आमच्‍या गाडीचा ‘पाटा’ (गाडीच्‍या खालील बाजूला स्‍प्रिंगचे काम करणारी लोखंडी पट्टी) तुटला आहे. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी तुमची गाडी मागितली आहे.’’ मी त्‍यांना म्‍हणालो, ‘‘ठीक आहे; पण माझ्‍या गाडीत पुरेसे इंधन नसेल. मी तुमच्‍या समवेत येतो. आपण इंधन भरूया. मग आपण माझी गाडी घेऊन जा.’’ त्‍याप्रमाणे गाडीत इंधन भरून आम्‍ही परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या गाडीकडे गेलो.

७ इ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिवक्‍ता केसरकर यांच्‍या ‘फियाट’ गाडीच्‍या लहान डिकीत त्‍यांच्‍या ‘अ‍ॅम्‍बॅसिडर’ गाडीच्‍या मोठ्या डिकीतील सर्व साहित्‍य व्‍यवस्‍थित भरणे : ठाण्‍याच्‍या कोपरी पुलाजवळ परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची गाडी उभी होती. गोव्‍याहून परत येतांना ‘गाडीची डिकी सामानाने पूर्ण भरली होती’, हे मला ठाऊक होते. ‘त्‍यांच्‍या गाडीच्‍या डिकीतील सामान काढून माझ्‍या गाडीच्‍या डिकीत भरायला सोयीचे व्‍हावे’, यासाठी मी ‘त्‍यांच्‍या गाडीच्‍या डिकीला माझ्‍या गाडीची डिकी लागेल’, अशा पद्धतीने माझी गाडी उभी केली आणि माझ्‍या गाडीची डिकी उघडली. लगेचच परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी श्री. दिनेश शिंदे यांच्‍या साहाय्‍याने त्‍यांच्‍या गाडीतील सगळे साहित्‍य ५ ते ७ मिनिटांत माझ्‍या गाडीच्‍या डिकीत अगदी व्‍यवस्‍थित भरले. ते पाहून मी आश्‍चर्यचकित झालो; कारण त्‍यांच्‍या ‘अँबॅसिडर’ गाडीची डिकी माझ्‍या ‘फियाट’ गाडीच्‍या तुलनेत फार मोठी होती. मला ते सर्व साहित्‍य लहान डिकीत ठेवणे शक्‍य झाले नसते; पण त्‍यांनी ते त्‍वरित आणि व्‍यवस्‍थित भरले.

७ ई. त्‍वरित योग्‍य निर्णय घेऊन तशी कृती करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले ! : एवढे झाल्‍यावर त्‍यांनी मला सांगितले, ‘‘केसरकर, माझी गाडी मार्गाच्‍या बाजूला आहे. ती इथेच राहू दे. दिनेश आज रात्री तुमच्‍या घरी झोपेल आणि उद्या तो ठाण्‍यातच गाडी दुरुस्‍त करून घेईल.’’ मी म्‍हणालो, ‘‘ठीक आहे.’’ लगेच त्‍यांनी माझ्‍याकडून माझ्‍या गाडीची किल्ली घेतली आणि स्‍वतः गाडी चालवत मुंबईला निघून गेले. दुसर्‍या दिवशी आम्‍ही (मी आणि श्री. दिनेश शिंदे यांनी) त्‍यांची गाडी दुरुस्‍त करून घेतली आणि सायंकाळी श्री. दिनेश शिंदे ती गाडी मुंबईला घेऊन गेले.

८. कधी कुणालाही देत नसलेली स्‍वतःची गाडी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना वापरण्‍यासाठी दिल्‍यावर अधिवक्‍ता केसरकर यांना आश्‍चर्य वाटणे 

त्‍यानंतर २ दिवसांनी श्री. दिनेश शिंदे यांचा मला दूरभाष आला आणि ते मला म्‍हणाले, ‘‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा तुम्‍हाला निरोप आहे, ‘त्‍यांचे गुरु प.पू. भक्‍तराज महाराज मुंबईला आले आहेत. त्‍यांच्‍यासाठी आम्‍ही तुमची गाडी ठेवून घेतली, तर चालेल का ?’ त्‍यांनी तुम्‍हाला महाराजांच्‍या दर्शनासाठीही बोलावले आहे.’’ मी म्‍हणालो, ‘‘ठीक आहे.’’ त्‍याप्रमाणे मी प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या दर्शनासाठी गेलो आणि परत येतांना माझी गाडी ठाण्‍याला घेऊन आलो. तेव्‍हा मला प्रश्‍न पडला, ‘मी आजपर्यंत माझी गाडी कुणालाही, अगदी माझ्‍या सख्‍ख्‍या भावालाही कधी दिली नाही. मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना गाडी कशी काय दिली ?’

– अधिवक्‍ता रामदास केसरकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ७० वर्षे), (सनातन संस्‍थेचे कायदेविषयक मानद सल्लागार), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)
(क्रमशः)

हे पण वाचा :सनातन प्रभात

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

https://sanatanprabhat.org/marathi/755443.html (भाग १)

https://sanatanprabhat.org/marathi/755775.html (भाग २)