संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची ‘सी.आय.डी.’ चौकशी करा !
गारगोटी (जिल्हा कोल्हापूर) येथील धरणे आंदोलनात संत बाळूमामा देवस्थानाच्या संभाव्य मंदिर सरकारीकरणाला हिंदुत्वनिष्ठांचा तीव्र विरोध !
गारगोटी (जिल्हा कोल्हापूर) – ‘सद्गुरु बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिती’ आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ यांच्या वतीने येथील क्रांती चौकात १७ जानेवारी या दिवशी ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक आंदोलन’ उत्साही वातावरणात पार पडले. या आंदोलनात देवस्थानातील अपव्यवहारांच्या प्रकरणांची ‘सी.आय.डी.’द्वारे चौकशी करावी, तसेच देवस्थानाचे सरकारीकरण करू नये, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यासह लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणारे दोषी विश्वस्त, प्रशासक, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सरकार जोपर्यंत कठोेर कारवाई करत नाही, तोपर्यंत महासंघाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि भक्त यांनी केला.
आंदोलन चालू असतांना हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांच्या वतीने तहसीलदार श्रीमती अश्विनी वरूटे यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्या वेळी सौ. वरूटे म्हणाल्या की, याविषयी विश्वस्तांची बैठक घेऊन मागण्यांविषयी चर्चा करण्यात येईल, तसेच जिल्हाधिकार्यांना त्वरित निवेदन पाठवण्यात येईल.
या आंदोलनात ‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था, अखिल भारतीय हिंदु खाटीक समाज, मुळे मामा देवस्थान भक्त मंडळ, मुळे मामा देवस्थान विश्वस्त, उजळाईवाडी येथील संत बाळूमामा देवस्थानाचे सदस्य, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसह विविध संघटना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भाजप यांसह १५० हून अधिक भाविक सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. ऋषिकेश गुर्जर आणि श्री. बाबासाहेब भोपळे यांनी सूत्रसंचालन केले.
मान्यवरांचे मनोगत
१. श्री. सुनील सामंत, शिवशाही फाऊंडेशन आणि कोल्हापूर शहर संघटक, मनसे – देवस्थानातील भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक वेळा दैनिकांतून वृत्ते येऊनही दोषींवर कारवाई झालेली नाही. भ्रष्टाचार करणार्या म्हणजे सेक्युलर विचारसरणी आणि नास्तिकवादी लोकांच्या हातात देवस्थान न जाण्यासाठी प्रयत्न करणे हे हिंदूंचे कर्तव्य आहे. निष्ठावंत भक्तांच्या हातातच देवस्थानाचा कारभार दिला पाहिजे.
२. श्री. निखिल मोहिते, अध्यक्ष, बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था – या आंदोलनातून भ्रष्टाचार करणार्यांच्या गोष्टी झाकल्या जाऊ शकत नाहीत, हे विरोधकांना समजले असेल. आंदोलनाचा प्रारंभ झाला, तरी आमच्या मागण्या पूर्णत्वास जाईपर्यंत पुष्कळ वेळ लागेल; मात्र देवस्थानातील भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रत्येक गावात ठिणगी पडेल, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.
३. श्री. सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ – संत बाळूमामा देवस्थानातील गैरप्रकार उघड झाल्यामुळे सर्व भक्तांनी वैध मार्गाने याला विरोध केला पाहिजे. देवस्थानातील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी संत बाळूमामांनी आपल्याला माध्यम म्हणून निवडले आहे. आम्ही देवस्थानातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार रोखण्यासाठी हे आंदोलन करत आहोत; मात्र देवस्थानाची कोणतीही अपर्कीती करण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही केवळ संत बाळूमामा नव्हे, तर राज्यातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील भ्रष्टाचाराच्या विरोधात न्यायिक पद्धतीने आंदोलन करत आहोत, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. एकाही निरपराध्याला शिक्षा होऊ नये आणि एकही दोषी सुटता कामा नये, अशी आमची मागणी आहे. संत बाळूमामा देवस्थातील भ्रष्टाचाराची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे (‘सीआयडी’द्वारे) चौकशी झालीच पाहिजे. श्री विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण होऊन ३८ वर्षे झाली, तरी ३१४ हून अधिक प्राचीन मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांचे मूल्यांकन अन् नोंदी झालेल्या नाहीत. तेथे प्रसादाचे लाडू, शौचालय, भक्तनिवास, ग्रंथालय आदी सर्वांत घोटाळे झाले आहेत. अशा स्थितीत भविष्यात संत बाळूमामा देवस्थानाचे सरकारीकरण झाल्यावर येथेही अशाच प्रकारे अनागोंदी कारभार होणार नाही, याची हमी कोण देणार ?
४. श्री. राजू यादव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट – आतापर्यंत महाराष्ट्र मंदिर महासंघाने राज्यातील मंदिरांतील भ्रष्टाचार उघडकीस आणून भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचार आणि सरकारीकरणाच्या विरोधात भक्तांनी संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे.
५. श्री. संभाजीराव भोकरे, उपजिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट – संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराच्या विरोधात भक्तांनी संघटित झाले पाहिजे. भाविकांनी अर्पण केलेल्या ज्या धनाचा अपहार झाला आहे, त्यातील ‘पै अन् पै’ वसूल होईपर्यंत हे आंदोलन चालू राहील.
६. श्री. बाबासाहेब भोपळे, समन्वयक, सद्गुरु बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिती – संत बाळूमामा देवस्थानासह राज्यातील सर्व मंदिरांचे सरकारीकरण न होण्यासाठी आणि भक्तांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी हे आंदोलन करत आहोत. भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शिक्षा व्हावी, ही आमची मागणी आहे.
७. डॉ. मानसिंग शिंदे, सनातन संस्था – सरकारीकरणामुळे मंदिरात धार्मिक विधी केल्यामुळे निर्माण झालेले चैतन्य नष्ट होते. यासाठी मंदिरे प्रामाणिक भक्तांच्या हातात दिली पाहिजे.
भ्रष्टाचार करणार्यांना शिक्षा केल्यावर देवस्थानात भाविकांची संख्या वाढेल !
‘या आंदोलनातून अडचणी निर्माण होऊन संत बाळूमामा देवस्थानाचे महत्त्व अल्प होऊन भाविकांची संख्या अल्प होईल’, असे काही जणांना वाटत असेल, तर ते पूर्ण चुकीचे आहे, कारण आंदोलन केल्यामुळे असे कधीही होत नाही. याच्या उलट भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शिक्षा झाल्यानंतर भाविकांची संख्या आणखी वाढेल. सरकारच्या कह्यात मंदिरे दिल्यानंतर त्यांना ती चालवता येत नाहीत. त्यामुळे मंदिर सरकारीकरण करण्याला आमचा विरोध आहे’, असे श्री. सुनील घनवट यांनी स्पष्ट केले.
उपस्थित मान्यवर…
सकल मराठा समाजाचे गारगोटी तालुका समन्वयक श्री. तुकाराम देसाई, अध्यक्ष श्री.नंदू शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सचिन देसाई, मनसे कागल तालुकाप्रमुख श्री. अशोक पाटील, कागल तालुका महिला अध्यक्ष सौ. सीमा गोरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, मुळे महाराज देवस्थानाचे पुजारी श्री. गंगाराम चव्हाण, अखिल भारतीय हिंदु खाटिक समाजाचे अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे, माचुर्लीकर, सद्गुरु मुळे महाराज देवस्थानाचे श्री. नामदेव शिंदे, सर्वश्री सुजित माळी, आप्पासाहेब कुराडे, सदा बेळगावकर, संत बाळूमामा यांची प्रत्यक्ष सेवा केलेल्या भक्त चंदूलाल शहा-शेठजी यांचे पणतू परेश शहा-शेठजी आदी.
या वेळी करण्यात आलेल्या काही मागण्या !
१. राज्यभरातून येणार्या भाविकांना वाहनतळ, स्वच्छतागृह, पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य, तसेच अन्य सुविधा पुरेशा प्रमाणात मिळाव्यात. जे भाविक पुष्कळ दुरून येतात, त्यांच्यासाठी चांगला भक्तनिवास उभारावा.
२. मुरगुड ते मुदाळतिट्टा या मार्गावर येणार्या भाविकांना नि:शुल्क सुलभ शौचालय आणि स्नानगृह उपलब्ध करून द्यावे.
३. बग्याचे (बकर्यांची पालखी) व्यवस्थापन, बकर्यांच्या आरोग्याची होणारी हेळसांड, आजारी आणि नरबकरी यांची विक्री याकडे प्रशासकांनी विशेष लक्ष द्यावे, तसेच कारभारी यांची वेतनवाढ करावी.
४. आजपर्यंत ज्या भक्तांनी दान म्हणून संत बाळूमामा देवस्थानाला भूमी दिल्या आहेत, त्या सर्व नोंदी अधिकृतरित्या करून, त्या भूमीचा खंड सध्याच्या बाजारभावाप्रमाणे योग्य प्रमाणात घेऊन त्या धनाचा उपयोग धर्मकार्यासाठी करण्यात यावा.
५. उत्सव काळात भाविकांची आंबील व्यवस्था आणि अन्नछत्र यांची होणारी गैरसोय थांबवावी. अन्नछत्र रात्री ९ वाजेपर्यंत न थांबवता ते अखंडपणे चालू रहावे.
क्षणचित्रे…
१. संत बाळूमामा यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
२. आंदोलन चालू झाल्यानंतर प्रत्येक नागरिक आंदोलनाचा विषय उत्स्फूर्तपणे विचारून घेत होते, तसेच रस्त्यावरील आणि जवळच्या उपाहारगृहातील नागरिक भाषणे लक्षपूर्वक ऐकत होते.
३. हिंदुत्वनिष्ठ आणि भक्त यांनी दिलेल्या घोषणांमुळे आंदोलनस्थळी संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते.
आंदोलनातील घोषणा…
१. नाही होऊ देणार, नाही होऊ देणार बाळूमामा देवस्थानाचे सरकारीकरण ! नाही होऊ देणार !
२. एकच ध्यास एकच विचार बाळूमामाचे मंदिर केवळ भक्तांच्या नियंत्रणात !
३. प्रशासक नेमणे म्हणजे मंदिर सरकारीकरण करण्याची पहिली पायरी.
४. मशीद आणि मदरसा यांच्यासाठी वक्फ बोर्ड, चर्चसाठी ‘डायोसेशन सोसायटी’, तर मग बाळूमामांच्या मंदिराचेच सरकारीकरण का ?
५. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे; पण मंदिराचे सरकारीकरण नको !
६. बाळूमामांच्या भक्तांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे !
७. सर्व प्रकरणांची ‘सीआयडी’ चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे !
८. नको शासक, नको प्रशासक, भक्तांना हवेत बाळूमामांचे प्रामाणिक सेवक !
९. बग्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणार्या प्रशासकाचा धिक्कार असो धिक्कार असो !
१०. उत्सव काळात आणि अमावास्येला पूर्णवेळ अन्नक्षेत्र चालू राहिलेच पाहिजे !
११. बाळूमामाच्या भक्तांची एकच हाक ‘नको शासक नको प्रशासक !’