DHIRIO Bull Game Goa : ‘धिर्यो’ खेळतांना मृत्यू झाल्याचा गुन्हा नोंदवून आयोजकांवर कारवाई करा !
|
मडगाव, १६ जानेवारी (वार्ता.) : बाणावली येथे ‘धिर्यो’चा खेळ चालू असतांना बैलाने शिंग खुपसल्याने १५ जानेवारी या दिवशी सायंकाळी वार्का, फात्राडे येथील जेनिटो वाझ (वय ३९ वर्षे) या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेविषयी ‘धिर्यो’ खेळतांना मृत्यू झाला’, असा प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवून दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार ‘गोवंश रक्षा अभियान’चे श्री. हनुमंत परब यांनी कोलवा पोलीस ठाण्यात प्रविष्ट (दाखल) केली आहे.
बाणावली समुद्रकिनार्याजवळील एका शेतात बाणावली आणि कोलवा येथील २ बैलांचा ‘धिर्यो’ चालू होता. ‘धिर्यो’च्या वेळी बैलाच्या मागच्या बाजूला थांबून बैलाचे शेपूट हातात धरून जेनिटो वाझ बैलाला ‘धिर्यो’साठी प्रोत्साहित करत असतांना बैलाने शिंग खुपसले. शिंग खुपसल्याने जेनिटो वाझ गंभीररित्या घायाळ झाला. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आणि तेथे उपचार चालू असतांना त्याचे निधन झाले.
श्री. हनुमंत परब यांनी पुढे म्हटले आहे की, ‘धिर्यो’त एकाचा बळी गेल्याने कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘धिर्यो’ चालू असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. ‘धिर्यो’च्या आयोजनावर न्यायालयाची बंदी असतांनाही ‘धिर्यो’चे आयोजन केले जात असल्याने हा न्यायालयाचा अवमान आहे. नॉर्मा आल्वारीस यांनी ‘धिर्यो’च्या आयोजनावर बंदी घालण्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट केलेली आहे. या याचिकेवर सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ‘धिर्यो’वर बंदी घालण्यासाठी पोलिसांना अधिकार दिलेले आहेत; मात्र पोलीस ‘धिर्योे’ रोखू शकलेले नाहीत.
‘धिर्यो’वर राज्यात बंदी असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रकार
मयताला खासगी रुग्णालयात भरती केल्याने उपस्थित केले जात आहे प्रश्नचिन्ह !
शिंग खुपसल्याने बळी गेलेल्या व्यक्तीला घायाळ अवस्थेत सरकारी रुग्णालयात न नेता त्याला मडगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्यासाठी जेनिटो वाझ याला खासगी रुग्णालयात भरती केल्याची चर्चा बाणावली परिसरात चालू आहे.
पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने राज्यात ‘धिर्यो’ वर बंदी घातलेली आहे. ‘धिर्यो’मुळे मृत्यू झाल्याची नोंद झाल्यास पोलीस अडचणीत येऊ शकतात; म्हणून हे प्रकरण दडपले जात असल्याची चर्चा सध्या चालू आहे.
पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केल्याने १६ जानेवारी या दिवशी प्रारंभी संबंधित आधुनिक वैद्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दर्शवला आणि घटना कुठे घडली ? याविषयी सविस्तर माहिती द्यावी, अशी पोलिसांकडे मागणी केल्याचे वृत्त आहे.
गोठ्यात शिंग खुपसले गेल्याची मृताच्या कटुंबियांची साक्ष
मृत जेनिटो याच्या कुटुंबियांनी जेनिटो हा गोठ्यात चारा भरवतांना शिंग लागल्याने घायाळ झाल्याची साक्ष पोलिसांना दिली आहे. यावर गोवंश रक्षा अभियानचे हनुमंत परब यांनी ‘मृत व्यक्ती गोठ्यात बैलाचे शिंग लागून घायाळ झाली असेल, तर त्याला उपचारार्थ सरकारी रुग्णालयात का नेण्यात आले नाही ?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे.