आनेवाडी पथकर नाक्यावर पथकर मुक्तीसाठी उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन !

सातारा, १६ जानेवारी (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू महामार्गावर आनेवाडी आणि तासवडे येथे अन्यायकारक पथकर (टोल) वसुली चालू आहे. या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील वाहने पथकर मुक्त करावीत या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने अर्धा घंटा ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंना लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

पुणे-बेंगळुरू महामार्ग सातारा जिल्ह्यातून जातो. हे अंतर अनुमाने १२१ किलोमीटर आहे. सातारा जिल्ह्यात या महामार्गावर २ पथकर नाके येतात. जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात फिरायचे झाले, तरी दोन्ही पथकर नाके पार करावे लागतात. यामुळे अनेक वेळा पथकर नाका प्रशासन आणि नागरिक यांच्यात वाद होतात. त्यामुळे हे नाके सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी पथकरमुक्त करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. या वेळी पथकर नाक्यावर जोरदार घोषणा देण्यात आल्या. या वेळी भुईंज पोलिसांनी मध्यस्थी केली. करण्याचा प्रयत्न केला; मात्र मागण्या मान्य केल्याविना आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. पथकर आस्थापनाच्या प्रशासकीय अधिकर्‍यांनी आंदोलनस्थळी भेट देत पथकर मुक्तीविषयी बैठक घेऊन ८ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले; मात्र ८ दिवसांत यावर तोडगा निघाला नाही, तर ठाकरे गट नेहमी आंदोलन करते, त्याप्रमाणे आंदोलन करण्याची चेतावणी ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आली.