राजगडावरील (पुणे) विनाअनुमती खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई !
पुणे – राजगडावर खाद्यपदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. गडाच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये विनाअनुमती खाद्यपदार्थ शिजवून त्याची विक्री करणार्या १० विक्रेत्यांवर पुरातत्व विभाग आणि वेल्हे पोलीस यांनी १४ जानेवारी या दिवशी कारवाई केली. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात विक्रेत्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. राजगडावरील पद्मावती माचीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजसदर, अंबरखाना, तसेच गडांवर राजरोसपणे खाद्यपदार्थांची विक्री चालू होती. त्यातून निर्माण होणारा कचरा आणि खाद्यपदार्थांच्या राडारोड्यांमुळे गडांचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने विक्रेत्यांना वारंवार सूचनाही दिल्या होत्या; मात्र त्या सूचनांकडे दुर्लक्ष करत खाद्यपदार्थांची विक्री चालू होती, असे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले.