श्रीराममंदिराच्या पार्श्वभूमीवर ७५ सहस्र पुणेकरांनी केले रामरक्षास्तोत्र पठण !
पुणे – अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने १४ जानेवारी या दिवशी ७५ सहस्र पुणेकर भाविकांनी अत्यंत भक्तीमय वातावरणात स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर रामरक्षास्तोत्र पठण केले. भक्तिसुधा फाऊंडेशन, समर्थ व्यासपीठ, शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दगडूशेठ हलवाई गणपति मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने कार्यक्रमाचे निमंत्रक होते. श्रीरामासाठी नमन, देशासाठी समृद्धी आणि सैनिकांसाठी बल अशा संकल्पांसाठी ३ वेळा पठण करण्यात आले. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांच्या आश्रमातील शिष्यांनी रामरक्षा पठणाचे नेतृत्व केले. लक्ष्मणाचार्य रचित ‘रघुपती राघव राजाराम’ या मूळ पदाचे प्रथमच सादरीकरण केले. आशिष केसकर यांचे संगीत आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी गायन केले, तसेच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी श्री रामजन्मभूमीचा इतिहास सांगितला. पुरातत्व आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक गो.बं.देगलूरकर यांनी, ‘अयोध्येत उभारण्यात आलेले श्रीराममंदिर हे शास्त्रीयदृष्ट्या कसे योग्य आहे, हे सांगितले. या कार्यक्रमातून मिळालेल्या ऊर्जेचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी व्हावा’, अशी अपेक्षा हेमंत रासने यांनी व्यक्त केली.
सनातन संस्थेच्या कक्षाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !
अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीनेही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत पुणे जिल्ह्यात १ जानेवारीपासून सनातन-निर्मित श्रीराम नामपट्टी आणि श्रीरामाचे सात्त्विक चित्र वितरण, मंदिर स्वच्छता, श्रीरामसंकीर्तन सप्ताह तसेच ग्रंथप्रदर्शन कक्ष असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. रामरक्षास्तोत्र पठण या कार्यक्रमाचे औचित्य साधून सकाळी ५.३० ते ११.३० या वेळेत सनातन संस्थेच्या वतीने विविध आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा कक्ष लावण्यात आला होता. याला समाजातून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.