श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करून तिच्या अपव्यवहाराची ‘एस्.आय.टी.’च्या वतीने चौकशी करा ! – ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज
सासवड (पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !
पुणे, १६ जानेवारी (वार्ता.) – कोट्यवधी विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात, मंदिर समितीच्या आर्थिक बेशिस्तीमुळे आर्थिक अपव्यवहार होत आहे. त्यामुळे अशी अपव्यवहार करणारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तात्काळ बरखास्त करावी. तसेच झालेल्या अपव्यवहाराची विशेष तपासणी पथकाद्वारे (एस्.आय.टी.) चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तुकाराम महाराज पालखी सोहळा चिंतामणी प्रासादिक दिंडीचे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांनी केले. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या देवधनाची जी लूट चालवली आहे, त्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संस्था यांच्या वतीने सासवड नगरपालिकेसमोर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री दत्तगड संस्थान भोगवली, भोर येथील ह.भ.प. बाळासाहेब जाधव महाराज, हिवरे येथील जय हनुमान मंदिर समितीचे श्री. ऋषिकेश दळवी, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’चे श्री. दयानंद बंडगर आदी उपस्थित होते.
जोपर्यंत भगवा आहे तोपर्यंत हिंदु धर्म आणि माणुसकी टिकून आहे ! – ह.भ.प. स्वप्नील महाराज काळाणे
जोपर्यंत भगवा आहे, तोपर्यंत हिंदु धर्म आणि माणुसकी टिकून आहे. जर हिंदु धर्म नाश पावत चालला, तर आपल्या सर्वांचे अस्तित्व टिकणार नाही. आपल्या धर्मावर, देवतांवर टीका होत असताना शांत बसणार्यांना हिंदू म्हणवून घेण्याचा कोणताही अधिकार नाही. सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे, असे मत ‘माऊली वारकरी शिक्षण संस्थे’चे ह.भ.प. स्वप्नील महाराज काळाणे यांनी व्यक्त केले.
हिंदु राष्ट्र साकारण्यासाठी आपण प्रत्येकाने सिद्ध व्हायला हवे ! – प्रसाद दळवीगुरुजी, वीर देवस्थान
आजच्या परिस्थितीला कारणीभूत भारतामध्ये रहाणारा प्रत्येक माणूस आहे. कारण आज माणसांमध्ये अहंकार, ‘मी’पणा पुष्कळ ठासून भरला आहे. हिंदु राष्ट्र साकारण्यासाठी आपण प्रत्येकाने सिद्ध व्हायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज, संत, महंत, तसेच हिंदु बांधवांचे हिंदु राष्ट्र साकारण्याचे जे स्वप्न आहे, या स्वप्नपूर्तीसाठी आपण सर्वांनी सिद्ध व्हायला हवे, असे मत वीर देवस्थानचे प्रसाद दळवीगुरुजी यांनी व्यक्त केले.
या वेळी पुढील मागण्या करण्यात आल्या१. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील अनागोंदी कारभारामुळे मंदिराची परिस्थिती बिकट झाली आहे. या सर्व अपव्यवहाराची सरकारने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. ही भ्रष्ट मंदिर समिती तात्काळ बरखास्त करून प्रामाणिक भक्तांकडे मंदिराचे व्यवस्थापन सोपवून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावे. २. प्रभु श्रीरामाशी संबंधित गोष्टींवर होणारी टीका थांबवण्यासाठी ‘श्रीरामनिंदा विरोधी कायदा’ संमत करावा, अशा मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. |