देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
१. श्रीराम आणि श्रीकृष्ण एकच असल्याची अनुभूती
१ अ. पहाटे देवाच्या अनुसंधानात असतांना अंथरुणापासून २ इंच उंचीवर अधांतरी वाटाण्याच्या आकाराचा कृष्णतत्त्व असलेला निळ्या रंगाचा तेजस्वी गोळा दिसणे : ‘२२.८.२०२२ या दिवशी पहाटे जाग आल्यानंतर मी पलंगावर बसले होते. त्या वेळी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या अनुसंधानात होते. काही सेकंदांनी माझ्या उजव्या अंगाला अंथरुणापासून २ इंच उंच अंतरावर अधांतरी वाटाण्याच्या आकाराचा निळ्या प्रकाशाचा दिव्य गोळा असल्याचे मला दिसले. त्या गोळ्यात मला कृष्णाचे तत्त्व जाणवले. त्याच्याकडे पाहून मला चांगले वाटले. गोळ्याच्या रूपात स्वतः श्रीकृष्णच माझ्याकडे आला होता.
१ आ. साधिका श्रीरामाचा जप करत असली, तरी देवाने श्रीकृष्ण रूपात सूक्ष्मातून दर्शन देऊन दोन्ही रूपे एकच असल्याचे सांगणे : श्रीकृष्ण सूक्ष्मातून मला म्हणाला, ‘तू प्रभु श्रीरामाचा जप करतेस. (प्रत्यक्षातही माझ्याकडून प्रभु श्रीरामाचा जप होत असतो.) श्रीराम हे माझेच एक रूप आहे आणि श्रीकृष्ण हे माझे दुसरे रूप आहे.’ तेव्हा श्रीकृष्णाच्या चेहर्यावर आनंद जाणवला. तो पुढे म्हणाला, ‘तुला वाटते की, श्रीराम आणि श्रीकृष्ण वेगवेगळे आहेत. तू श्रीरामाचा जप करतेस, तरीही मला आनंदच आहे. तू माझ्या कोणत्याही रूपाचा जप केलास, तरी मी तुझ्या पाठीशी आहे.’
‘श्रीकृष्णाचे माझ्याकडे लक्ष आहे, म्हणजे त्याची माझ्यावर कृपादृष्टी आहे’, हे जाणवून श्रीकृष्णाच्या प्रती मला कृतज्ञता वाटली आणि मी त्याला नमस्कार केला.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रती कृतज्ञता कशी व्यक्त करायची ?’, हे सूक्ष्मातून शिकवणे
२३.८.२०२२ या दिवशी दुपारी ३ ते ४ या वेळेत मी डोळे मिटून आणि हात जोडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत होते. त्या वेळी ‘माझ्या देहातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळच सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहेत’, असे मला जाणवले. त्या एवढ्या भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करत होत्या की, ते मला शब्दांत सांगता येत नाही. ‘कृतज्ञता कशी व्यक्त करावी ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणी त्यांचा असलेला भाव त्यांच्या चेहर्यावरून ओसंडून वहात होता. कृतज्ञता व्यक्त करून झाल्यावर मी डोळे उघडले असता मला माझ्यात देवीतत्त्व जाणवले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या प्रती श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा पराकोटीचा भाव आणि कृतज्ञता आहे. त्यांच्याच कृपेने मला हे शिकायला मिळाले; म्हणून मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्रीरामाची दासी,
सुश्री (कु.) महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.८.२०२२)