गोंदिया येथील सर्व मंदिरे, मठ आणि संस्था यांनी हिंदु जनजागृती समितीसमवेत एकत्र येऊन कार्य करावे ! – पू. रामज्ञानीदास महाराज, संस्थापक, तीरखेडी आश्रम
गोंदिया येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साही वातावरणात पार पडली !
नागपूर, १६ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती हिंदूंना संघटित करण्याचे कार्य करत आहे. उपस्थितांनी केवळ आजच्या सभेला उपस्थित राहून काही होणार नाही, तर गोंदिया येथील सर्व मंदिरे, मठ आणि संस्था यांनी हिंदु जनजागृती समितीसमवेत एकत्र येऊन कार्य करायला हवे. आज संघटित होऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन तीरखेडी आश्रमाचे संस्थापक पू. रामज्ञानीदास महाराज यांनी गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.
गोंदिया येथील पिंडकेपार गौरक्षण येथे नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साही वातावरणात पार पडली. या सभेचा गोंदिया येथील जिज्ञासूंनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. सभेला अमरावती येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत खत्री आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या नागपूर येथील अधिवक्त्या सौ. वैशाली परांजपे उपस्थित होत्या. सभेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत पोलके यांनी केले.
वैशिष्ट्यपूर्ण…
१. सभेनंतर झालेल्या बैठकीत तरुणांनी त्यांच्या संपर्कातील मंदिरात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
२. ‘हिंदु धर्मावर आघात’ या विषयांवर स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्याची सिद्धता उपस्थितांनी दर्शवली.
३. ‘अशा सभा शहरातील अनेक भागांत व्हाव्यात’, असे उपस्थितांनी सांगितले.
४. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये येथे विविध निवेदने देण्यास सिद्ध असल्याचे उपस्थितांनी या वेळी सांगितले.