सायबर गुन्हे, तक्रार करण्याची पद्धत आणि त्याविषयी घ्यावयाची काळजी !
‘मध्यंतरी एक विचित्र घटना माझ्या समोर आली. एक महिला ज्या ज्येष्ठ नागरिक होत्या, त्या धावत धावत आमच्या कार्यालयाकडे आल्या. त्यांनी विचारले, ‘ॲफिडेव्हिट (सत्यप्रतिज्ञापत्र) करायचे आहे.’ घामाघुम झालेल्या त्या आजींना आम्ही शांत करून जरा प्यायला पाणी दिले. त्या जरा अस्वस्थ होत्या. थोडा वेळ स्थिरस्थावर झाल्यावर विचारले, ‘‘आपण कोण ? कुठल्या ? आणि कसले ‘ॲफिडेव्हिट’ करायचे आहे ?’’ जरा काकुळतीच्या स्वरातच त्यांनी सांगायला आरंभ केला.
१. वृद्ध महिलेच्या घाबरलेल्या स्थितीचा अपलाभ घेऊन अनोळखी व्यक्तीने ‘डेबिट कार्ड्स’च्या माध्यमातून पैसे चोरणे
त्या मूळच्या गोव्याच्या! मे २०२३ च्या सुट्टीमध्ये मुलाकडे बेंगळुरूला गेल्या होत्या. निवृत्तीनंतरचे पैसे इत्यादी व्यवस्थित गाठीशी होते. त्यांची २ बचत खाती होती. दोन्ही अधिकोषांचे ‘डेबिट कार्ड्स’ (‘ए.टी.एम्.’ यंत्रातून पैसे काढण्यासाठीची सुविधा) त्यांच्याकडे होतेच. साधारणपणे ३ लाख रुपयांपर्यंतची रक्कम बचत खात्यामध्ये होती. बेंगळुरूला खरेदी करण्यासाठी त्या बाहेर पडल्या. त्या एका ‘ए.टी.एम्.’जवळ गेल्या. त्यांचा क्रमांक आल्यावर त्या आत गेल्या. एक डेबिट कार्ड घालून त्यातून काही रक्कम बाहेर काढली. त्याच वेळी दुसरा एक इसम धनादेश पेटीत घालण्याच्या उद्देशाने आतमध्ये आला. सदर व्यक्ती आत आल्याने त्या महिला जरा गांगरल्या आणि त्यामुळे त्यांनी चुकीचा ‘पासवर्ड’ (संकेतांक) टंकलिखित केला. कुणीतरी अनोळखी इसम आलेला असे लक्षात आल्याने त्या जरा बिचकल्याच. तो इसम मागेच घुटमळत होता. त्यात त्याने तोंडावर मुखपट्टी (मास्क) लावलेली होती. आजीबाईंनी दुसरे कार्ड काढले आणि ते वापरण्यासाठी ‘ए.टी.एम्.’ यंत्रात घातले. या कार्डच्या जोरजोरात हालचाली झाल्यामुळे यंत्र थोडे हळू चालू होते. त्या अजून गांगरल्या. त्यामुळे नाईलाजाने त्या आजींनी त्या इसमालाच साहाय्य करायला सांगितले. त्या इसमाने साहाय्य करतांनाच डाव साधला. वृद्ध महिलेने ‘ए.टी.एम्.’मधून पहिले ९ सहस्र ५०० रुपये काढण्याविषयी टंकलेखन केले. बटन दाबून आणि ‘पासवर्ड’ टाकून पैसे यायला जो ३० सेकंदाचा वेळ लागतो, तेवढ्यात या इसमाने ‘पासवर्ड’ नीट बघून घेतला. ‘ए.टी.एम्.’मधून पैसे आले आणि महिला पैसे काढून मोजत असतांना या इसमाने शिताफीने ‘ए.टी.एम्.’मध्ये असलेले महिलेचे ‘डेबिट कार्ड’ काढून तसेच दिसणारे दुसरे कार्ड आत घातले. या वेळी यंत्रामधून एक वेगळा आवाज येऊन ते चेतावणी देत होते. त्या इसमाने त्या वृद्ध महिलेचे ‘डेबिट कार्ड’ स्वतःच्या खिशात ठेवले. पैसे मोजण्याच्या नादात त्या वृद्ध महिलेने खोटे ‘डेबिट कार्ड’ यंत्रातून काढले आणि ती ते घेऊन निघून गेली.
घरी पोचेपर्यंत तिला त्या दिवशी आणि दुसर्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत ६ वेळा रक्कम काढल्याचे लघुसंदेश (मेसेज) भ्रमणभाषवर आले. दुसर्या दिवशी त्या महिलेने घाबरून तिच्या मुलाला हा विचित्र प्रकार सांगितला. तद्वतच त्याने ‘ऑनलाईन’ पद्धतीने ‘डेबिट कार्ड’ बंद (ब्लॉक) केले आणि पोलीस ठाणे गाठले. तेथे असे लक्षात आले की, या महिलेकडे खोटे; पण हुबेहुब तसेच दिसणारे ‘डेबिट कार्ड’ होते. तोपर्यंत ८० सहस्र रुपयांपर्यंतची रक्कम भुरट्याने काढलेली होती.
२. ज्येष्ठ नागरिकांनी सतर्क रहाण्याची आवश्यकता
यानंतर पोलिसांची धावाधाव, तक्रारी, ‘ए.टी.एम्.’ यंत्राची पडताळणी, ‘क्लोज सर्किट कॅमेर्या’तील चित्रीकरण पडताळणे आदी सर्व सोपस्कार पूर्ण झाले; परंतु व्यक्तीने तोंडावर मुखपट्टी घातलेली असल्यामुळे व्यक्तीचा चेहरा ओळखीचा वाटत नव्हता, तसेच वेगवेगळ्या ‘ए.टी.एम्.’वरून वेगवेगळ्या चेहेर्याच्या व्यक्तीने पैसे काढले होते. त्यामुळे वृद्धांनी हे लक्षात घ्यावे की, अशा काही टोळ्या कार्यरत आहेत की, ज्या ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालू शकतात. एखाद्या चित्रपटात शोभेल, असा प्रकार ऐकतांना मला आश्चर्य वाटत होते. अगदी अतिशयोक्ती वाटेपर्यंत ही वाक्ये न वाक्ये सत्य आहेत. असे आपल्या समवेतही होऊ शकते, हे लक्षात घेऊन विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी सतर्क होणे आवश्यक आहे.
३. सायबर कायदा, शिक्षा आणि त्याविषयीचा गुन्हे विभाग
भारतामध्ये वर्ष २००० मध्ये ‘सायबर क्राईम कायदा’ पारित झाला आणि त्यानंतर वर्ष २००८ मध्ये त्यात काही पालट केले गेले. यामध्ये मुख्यत्वे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स (व्यापार), संगणकविषयक गुन्हे, ‘डेटा’ (माहिती) चोरणे, ‘ऑनलाईन’ पैसे काढून घेणे, अश्लील माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणे, ‘डिजिटल सिग्नेचर’ (इलेक्ट्रॉनिक पद्धतीची स्वाक्षरी) चोरून वापरणे, सायबर जिहाद करणे, ‘सिस्टिम हॅक’ करणे, चोरीचे संगणक वापरणे, ‘ए.टी.एम्.’ यंत्रामधून शिताफीने पैसे चोरून आर्थिक गुन्हा करणे यांसारखे अनेक गुन्हे आणि त्याच्या शिक्षा नमूद केलेल्या आहेत. यात १ वर्षापासून आजन्म कारावास, तसेच १ लाख रुपये ते ५ लाख रुपयांपर्यंत दंड अशा शिक्षा नमूद केलेल्या आहेत.
गोव्यामध्ये जर असा गुन्हा घडला, तर पोलीस निरीक्षक राहुल परब हे या ‘सायबर सेल (कक्ष), गोवा’चे प्रमुख आहेत. (प्रत्येक राज्य आणि जिल्हा यांचे सायबर गुन्हे विभागाचे प्रमुख वेगळे असतात.) यांच्या निर्देशाप्रमाणे अन्वेषण केले जाते. गोव्यातील सर्व प्रमुख पोलीस ठाण्यामध्ये एक सायबर गुन्हे विभाग स्थापन केलेला असून तेथे आपल्याला तक्रार नोंदवता येते. ऑनलाईन तक्रार नोंदवायची असल्यास ‘citizen.goapolice.gov.in’ या संकेतस्थळावर जावे. तेथे ‘Register complaint’ (रजिस्टर कंप्लेंट – तक्रार नोंदवा) असा पर्याय आहे. त्यावरून वापरकर्त्याचे नाव (युजर नेम) आणि संकेतांक (पासवर्ड) सिद्ध करावा लागतो. यानंतर येणार्या ‘ओटीपी’प्रमाणे या संकेतस्थळावर स्वतःची तक्रार नोंदवता येते.
४. काळजी घेणे महत्त्वाचे !
वृद्धांनी ‘ए.टी.एम्.’ केंद्रावर काळजी घेणे आवश्यक आहे. ‘गुन्हा घडत आहे’, याची जराशी जरी कुणकुण लागली, तर ‘डेबिट कार्ड’ अथवा ‘क्रेडिट कार्ड’ बंद करावे. ज्याचे साहाय्य घ्यायचे आहे, त्याने मुखपट्टी लावली असेल, तर ती काढण्याचा हट्ट धरावा. शक्यतो अधिक पैसे बचत खात्यात ठेवू नयेत. शक्यतो कुणाला तरी समवेत घेऊन जावे. या टोळ्या कधी कुणाला हेरतील, हे सांगता येत नाही. या गुन्ह्यांचे अन्वेषण पुष्कळ अवघड असते. शक्यतो आपण काळजी घेतली आणि पोलिसांना वेळेत सतर्क केले, तर पुढील हानी टाळता येईल.’
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.