संपादकीय : कृत्रिमतेच्या मर्यादा !
‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ (‘एआय’ म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’) हे नाव एव्हाना सर्वांच्याच परिचयाचे झाले असेल ! ही बुद्धीमत्ता जरी कृत्रिम असली, तरी तिच्यामुळे बरेच लाभही होत आहेत; पण नुकतेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जीवा यांनी केलेले विधान पहाता या बुद्धीमत्तेविषयी सर्वांच्याच मनात धसका बसू शकतो. जॉर्जीवा म्हणाल्या, ‘‘कृत्रिम बुद्धीमत्त्ोमुळे जगातील ४० टक्के नोकर्या धोक्यात येतील.’’ हे विधान चिंताजनक आहे. या बुद्धीमत्तेमुळे देशांची उत्पादन क्षमता वाढणार असून लोकांच्या उत्पन्नांतही वाढ होईल. याचा परिणाम साहजिकच नोकर्यांवर होईल. यातून दिवसेंदिवस मनुष्यबळाचे प्रमाण न्यून होऊ शकते. युवकांच्या नोकर्या गेल्या तर, देशासमोर भयावह संकट निर्माण होईल; कारण नागरिक बेरोजगार होतील, घरी बसतील. नोकरीधंदा आहे; म्हणून मनुष्य क्रियाशील तरी असतो; पण ‘ना काम ना धंदा’ अशा बिकट स्थितीत तो अधिकच निष्क्रीयतेकडे झुकेल. स्वयंचलित यंत्रांचे प्रमाण वाढल्याने मानवाला आरोग्याच्या समस्या भेडसावतील, त्या वेगळ्याच ! नोकर्या ठप्प झाल्या, म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होईल. ते महाकठीण होऊन बसेल. विकसित राष्ट्रे या बुद्धीमत्तेचा अधिक प्रमाणात वापर करतील; पण त्या तुलनेत विकसनशील राष्ट्रांतील तिचा वापर काही प्रमाणात मर्यादित असेल. यातून सामाजिक आणि आर्थिक असमानता निर्माण होईल. ही विषमतेची निर्माण झालेली दरी हटवणे सर्वांसाठीच कठीण ठरेल. भविष्यात संपूर्ण विश्वात टिकून रहाण्यासाठी आणि विश्वावर राज्य करण्यासाठी ‘एआय’चे तंत्रज्ञान वापरणे क्रमप्राप्त ठरणार आहे. जो ‘एआय’च्या दिशेने जाणार नाही, त्याचे मूल्य आपसूकच न्यून होईल, हे निश्चित ! ‘एआय’च्या माध्यमातून प्रगती आणि विकास यांचे सर्वांत मोठे दालन उघडले जात आहे अन् जाईलही. विकासाच्या पायर्या चढतांना जरी नोकर्यांवर विपरीत परिणाम होणार असला, तरी हा धोका वेळीच लक्षात आल्याने त्या दृष्टीने योग्य पावले उचलता येऊ शकतात. नोकर्या अबाधित ठेवून या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नव्या तंत्रज्ञानाचे हातात हात घालून स्वागत करतांना त्यातून भविष्यातील परिणामांच्या अनुषंगानेही विचारप्रक्रिया व्हायला हवी. यासाठी प्रत्येकाची दूरदृष्टी आवश्यक आहे.
‘मानव’ आणि ‘यंत्र’ संघर्ष अटळ !
‘एआय’चा सुयोग्य वापर मानवासाठी लाभदायी आहे. त्यातून विविध क्षेत्रांत मिळणार्या संधीचे सोने करता येईल. विश्वात खरी क्रांती होईल; पण हा वापर अयोग्य प्रकारे केला गेल्यास ‘मानव’ आणि ‘यंत्र’ यात मोठ्या प्रमाणात संघर्षही निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती मानवाला, पर्यायाने संपूर्ण जगालाच विनाशाकडे लोटू शकते. ‘एआय’चे तंत्रज्ञान मानसिक आजारांवर मात करण्यासाठी साहाय्यभूत ठरेल, अशा दृष्टीनेही संशोधन चालू आहे. येत्या काळात या माध्यमातून मृत्यूचे भाकीत करता येणार आहे. कुणीही याद्वारे शस्त्रास्त्रे सिद्ध करू शकतो. यांसारख्या अनेक गोष्टी या प्रणालीद्वारे साध्य करता येतील. हे सर्व जरी लाभदायी वाटले, तरी ते तितके सोपे नाही; कारण या लाभांचा अपलाभही घेतला जाऊ शकतो. एखाद्याला स्वतःचा मृत्यू कधी ओढवणार आहे, हे जर समजले आणि तो मानसिकदृष्ट्या सक्षम नसेल, तर तो किंवा त्याचे कुटुंबीय यांच्यावर किती मोठे वादळ येईल, याची कल्पनाच न केलेली बरी ! ज्याला त्याला स्वत:च्या मृत्यूचे भाकीत समजले, तर देश-विदेशांत किती मोठी अनागोंदी माजेल. त्यावर कुणीही नियंत्रण आणू शकणार नाही. जो तो शस्त्रे बनवू लागला, तर त्यावर कोण नियंत्रण आणणार ? शस्त्रास्त्रांचा अपवापर झाल्यास त्याला उत्तरदायी कुणाला धरायचे ? ‘एआय’च्या माध्यमातून शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात चीनही मोठी गुंतवणूक करत आहे. अर्थात् भारत त्यात काही मागे रहाणार नाही; पण ‘एआय’ने ही शस्त्रे सहजपणे पुरवली, तर अमेरिकेत उदयास आलेली आणि विनाश घडवणारी ‘गन’ (बंदूक) संस्कृती सर्वत्र फोफावण्यास वेळ लागणार नाही ! एखाद्या क्षेत्रातील खरे विश्व सोडून आभासी विश्व निर्माण करणे, कधीही कुणाचीही भूमिका साकारणे, हे जरी ‘एआय’ने साध्य केले, तरी त्यातून फसवणूकही होऊ शकते. थोडक्यात काय, तर ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’मुळे भविष्यात सत्य-असत्य यांतील सीमारेषा पुसट होण्याची शक्यता आणि भीती आहे. याचाही विचार करायला हवा.
जे कृत्रिम, ते तितकेच तकलादू, नाजूक, तात्कालिक आणि मर्यादित असते. जे नैसर्गिक आहे, ते अधिक भक्कम, सक्षम, व्यापक ठरते. या तत्त्वानुसार कृत्रिम बुद्धीमत्तेलाही मर्यादा आहेत; पण मानवी बुद्धीमत्तेला दैवी झालर लाभलेली आहे. ही बुद्धीमत्ता म्हणजे निसर्गदत्त देणगी आहे. तिच्या अफाट क्षमतेची प्रचीती आपण युगानुयुगे घेत आहोत. भारतीय ऋषिमुनींनी प्राचीन काळी मोठमोठे शोध लावले आहेत. तंत्रज्ञान किंवा विज्ञान क्षेत्र मोठ्या प्रमाणात कार्यरत नसतांनाही त्यांनी लावलेले हे शोध म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेसाठी चपराकच ठरतील ! भारताने जगाला अध्यात्म, संस्कृती, तत्त्वज्ञान, अवकाश विज्ञान, ज्योतिषशास्त्र, दर्शनशास्त्र, गणित अशा असंख्य क्षेत्रांत अमूल्य असे योगदान दिले. हे योगदान कुणाच्या बळावर ? तर मानवी म्हणूनच दैवी ठरणार्या बुद्धीमत्तेच्या बळावर ! यासाठीच तर भारत देश हा विश्वसंस्कृतीचे उगमस्थान समजला जातो. अखिल विश्वात भारताने उमटवलेल्या स्वतःच्या अद्वितीय ठशाचे श्रेय मानवी बुद्धीमत्तेलाच जाते !
तंत्रज्ञानाच्या मेंदूला चौकट हवी !
‘एआय’ जगभरात जरी क्रांती घडवत असले, तरी त्याचा वापर करतांना सूज्ञपणे विचार करायला हवा. तारतम्य बाळगायला हवे. दायित्व, तसेच नैतिकता यांचे भान जोपासावे. तसे न झाल्यास हानी ओढवेल, हे निश्चित ! ‘एआय’ला आज सर्वत्र लोकप्रियता मिळत असल्याने उद्याची भावी पिढी ठरणारी आजची लहान मुलेही त्याचा अवलंब करतील. असे असले, तरी ‘एआय’च्या माध्यमातून सिद्ध होणार्या माहितीची शहानिशा, सत्य-असत्य पडताळून पहावेच लागणार आहे. त्यामुळे आपल्यासह सर्वांनीच सतर्क रहायला हवे.
तंत्रज्ञानाचा मेंदू एका ठराविक टप्प्यापर्यंतच जाऊ शकतो. त्यामुळे त्याला नैतिकता, संस्कृती, तसेच कायदेशीर यांच्या चौकटीत बसवायला हवे, तर लोकांची सुरक्षितता आणि अधिकार यांची कोणतीही हानी होणार नाही. ‘एआय’चा विचार करता प्रत्येकच भारतियाने, तसेच विश्वातील प्रत्येक मानवाने अखिल मानवजातीच्या हितासाठी सतर्क राहून आपापल्या देशाचे उत्तरदायी नागरिक व्हावे !
तंत्रज्ञान किंवा आधुनिक विज्ञान कार्यरत नसतांनाही भारतीय ऋषिमुनींनी लावलेले शोध म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेसाठी चपराकच ! |