श्रीराममंदिराच्या उभारणीत नेतृत्व करत आहेत महाराष्ट्रातील ८ व्यक्ती !
सध्या देशभरातच नव्हे, तर जगभरात चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिरात प्रभु श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा ! २२ जानेवारी या दिवशी हा भव्य सोहळा पार पडणार आहे. त्याची अयोध्येसह देश-विदेशात जय्यत सिद्धता चालू आहे. या भव्य दिव्य मंदिराच्या उभारणीचे नेतृत्व महाराष्ट्रातील ८ व्यक्ती करत आहेत. त्यांच्याविषयीची माहिती या लेखाद्वारे येथे देत आहोत.
१. पुण्यातील आफळे कुटुंब श्रीरामाच्या सेवेत !
मंदिर उभारणीच्या कार्यासाठी ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या न्यासाच्या वतीने पुण्यातील श्री. जगदीश आफळे यांच्यासह त्यांची पत्नी सौ. माधुरी आफळे आणि मुलगी तेजस्विनी जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जगदीश आफळे हे निष्णात बांधकाम अभियंता आहेत. ते बांधकामात असलेली आस्थापने आणि अधिकारी यांच्याशी समन्वयाचे काम करत आहेत. त्यांच्या पत्नी सौ. माधुरी आफळे यांचा मूर्तीकला आणि शिल्पकला यांचा चांगला अभ्यास आहे. मंदिर उभारणीसाठी त्यांच्या ज्ञानाचा लाभ होत आहे, तसेच सौ. माधुरी आफळे या येथील देणगीकक्षही सांभाळतात. त्यांच्या कन्या तेजस्विनी जोशी या पुरातत्व शास्त्रज्ञ आहेत. ‘अयोध्येतील भूमी ही श्रीरामजन्मभूमीच आहे’, यासंबंधीचे पुरावे गोळा करण्यासाठी जे उत्खनन झाले, त्यात तेजस्विनी जोशी यांचे मोठे योगदान आहे.
२. बोरीवलीतील संतोष बोरे सांभाळत आहेत सुरक्षाव्यवस्था !
सध्या श्रीराममंदिराच्या उभारणीचे काम कडेकोट बंदोबस्तात होत आहे. या ठिकाणच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व बोरीवलीतील सुरक्षा व्यवस्थापक श्री. संतोष बोरे यांच्याकडे आहे. या भव्य दिव्य मंदिराच्या आजवरच्या बांधकामाच्या कालावधीत एकही दुर्घटना झालेली नाही. श्री. बोरे यांनी मंदिराच्या बांधकामासाठी राबणार्या प्रत्येक कामगाराला सुरिक्षत वातावरण दिले.
३. मोठमोठ्या यंत्रसामुग्रीचा वापर आणि विद्युत् यंत्रणेचे उत्तरदायित्व !
या भव्य दिव्य मंदिर परिसरात बांधकामासाठी मोठमोठ्या यंत्रसामुग्रीचा वापर होत आहे. त्याचे उत्तरदायित्व छत्रपती संभाजीनगरचे यांत्रिकी अभियंताश्री. जगन्नाथ गुळवे यांच्याकडे आहे. याचसमवेत या भागात वापर होत असलेल्या विद्युत् यंत्रणेचे दायित्व जळगावातील विद्युत् अभियंता श्री. सुभाष चौधरी पहात आहेत.
४. नागपूरचे संगमनेरकर सांभाळत आहेत स्थापत्य विभाग !
मंदिराची उभारणी करतांना मंदिराचे नियोजित रचनेनुसार बांधकाम व्हावे, हे फार महत्त्वाचे असते. त्याचे उत्तरदायित्व स्थापत्य विभागाचे असते. या विभागात नागपूरचे स्थापत्य अभियंता श्री. अविनाश संगमनेरकर कार्यरत आहेत.
५. सतीश चव्हाण आणि राधेय जोशी मंदिर उभारणीच्या कार्यात अविभाज्य अंग !
अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी ‘लार्सन अँड ट्रुब्रो’ हे आंतरराष्ट्रीय आस्थापन प्रारंभीपासून जोडले गेले आहे. या आस्थापनाचे बांधकाम व्यवस्थापक श्री. सतीश चव्हाण हे सध्या महत्त्वाचे योगदान देत आहेत. यासमवेत ‘टाटा कन्सल्टन्सी’चे प्रकल्प व्यवस्थापक श्री. राधेय जोशी हे मंदिर उभारणीच्या कार्याचे अविभाज्य अंग बनले आहेत.
(साभार : ‘हिंदुस्थान पोस्ट, मराठी’चे संकेतस्थळ)