मुंबई येथे धारधार मांज्यामुळे एकाचा मृत्यू, तर ८०० पक्षी घायाळ !
मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा ! – मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई – मकरसंक्रांतीच्या निमित्ताने मुंबई येथे १४ आणि १५ जानेवारी या दिवशी मोठ्या प्रमाणावर पतंग उडवण्यात आले. पतंग उडवण्यासाठी धारदार मांजाचा वापर झाल्यामुळे बोरिवली येथील कोरा केंद्र उड्डाण पुलावरून दुचाकीवरून जाणार्या एकाचा मृत्यू झाला आहे, तर चर्चगेटपासून विरारपर्यंत ८०० पक्षी घायाळ झाले आहेत.
दहिसर, कांदिवली, मालाड, बोरीवली या पट्ट्यांत अधिक पक्षी घायाळ झाले आहेत. धारदार मांजामुळे घायाळ झालेल्या पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी १४ आणि १५ जानेवारी या दिवशी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोअर परळमधील बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट रुग्णालय येथेे अनेक घायाळ पक्षांना भरती करण्यात आले आहे.
‘कुणी नायलॉन मांजाचा मांजाचा उपयोग करत असेल, तर थेट पोलिसांना कळवा’, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस विभागाने तक्रारीसाठी भ्रमणभाष क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे.
मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा ! – मुंबई उच्च न्यायालय‘मांजा जिवावर बेतत असल्याने नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा’, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिले आहेत. राज्याचे शालेय शिक्षण आणि उच्च अन् तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना असे निर्देश देण्यात आले आहेत. समवेतच ‘नायलॉन मांजाविषयी विद्यार्थ्यांना साक्षर करण्यासाठी ३ आठवड्यांत काय पावले उचलली आहेत ?’, याविषयी प्रधान सचिवांनी माहिती द्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. |
संपादकीय भूमिकाचिनी बनावटीच्या धोकादायक मांज्यांच्या विक्रीवर बंदी असूनही त्याचा वापर होत असतांना प्रशासन झोपा काढत आहे का ? |