छत्रपती संभाजीनगर येथे महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी शासकीय ठेकेदारावर गुन्हा नोंद !
छत्रपती संभाजीनगर – ‘डेटिंग ॲप’वर ओळख झालेला शासकीय ठेकेदार अमोल पाटील याने पतीपासून विभक्त झालेल्या २६ वर्षीय महिलेवर कार्यालयातच बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडको भागातील भोज उपाहारगृहाच्या बाजूला असलेल्या एका कार्यालयात हा सर्व प्रकार घडला. विशेष म्हणजे या वेळी ठेकेदाराने संबंधित महिलेचे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे काढून पुढे ते प्रसारित करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी एम्.आय.डी.सी. सिडको पोलीस ठाण्यात अमोल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२२ या दिवशी तिने एका मुसलमान मुलासमवेत विवाह केला होता; परंतु काही दिवसांतच त्यांच्यात वाद झाल्याने एप्रिल २०२२ पासून ती त्याच्यापासून विभक्त एकटीच शहरात रहात आहे. एका खासगी शिकवणीवर्गात शिक्षिका म्हणून ती काम करते. या काळात तिने ‘डेटिंग ॲप’वर खाते उघडले होते. त्या वेळी तिची अमोल पाटील याच्याशी ओळख झाली होती.