शरद मोहोळ हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक !
पुणे – येथील शरद मोहोळ हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारणे उपाख्य वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलार यांसह इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलिसांनी पनवेलमधील एका ‘फार्म हाऊस’वर (शेतातील घर) कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. शरद मोहोळच्या हत्येनंतर हे सर्व आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री येथे धाड घातली. शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात रामदास मारणे आणि गुंड विठ्ठल शेलार यांची मुख्य भूमिका आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या सर्व आरोपींना उद्या न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे.
- आतापर्यंत १३ जणांना अटक !
- पनवेलच्या ‘फार्म हाऊस’वर धाडी घालत कारवाई !
५ जानेवारीला पुणे येथे शरद मोहोळ यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी मुन्ना पोळेकरला अटक केली होती; मात्र नंतर हत्येमागचा खरा सूत्रधार वेगळा कुणीतरी असावा, असा पोलिसांना संशय होता. शेवटी हत्येमागील मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.