‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने फेरअन्वेषण करावे ! – मिलिंद एकबोटे
पुणे येथील हिंदूश्री शरद मोहोळ यांच्यावर झालेल्या आक्रमणाचे प्रकरण
पुणे, १५ जानेवारी (वार्ता.) – हिंदूश्री शरद मोहोळ यांची हत्या ही स्थानिक गुन्हा किंवा टोळीयुद्ध (गँगवार) नाही. ते गोरक्षा, गड-दुर्ग संवर्धन आणि हिंदु धर्म यांचे कार्य करत होते. त्यांच्यावरील आक्रमण आतंकवादी किंवा धर्मांध यांनी केलेले आक्रमण आहे. पकडलेले गुन्हेगार केवळ बाहुले असून मुख्य सूत्रधार शोधला पाहिजे. हा आंतरराष्ट्रीय कटही असू शकतो. म्हणून या संपूर्ण प्रकरणाचे अन्वेषण हे ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने (एन्.आय.ए.ने) करावे, अशी मागणी ‘समस्त हिंदू आघाडी’चे नेते मिलिंद एकबोटे यांनी १५ जानेवारी या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली. या वेळी ‘विश्व हिंदू परिषदे’चे धनंजय गायकवाड, ‘समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्थे’चे रवींद्र पडवळ, ‘पुण्येश्वर कृती समिती’चे लोकेश कोंढरे, पतित पावन संघटना आणि विश्व हिंदू मराठा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. मिलिंद एकबोटे पुढे म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची कुख्यात गुन्हेगार अथवा गुंड म्हणून बाजू दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. या हत्येची दुसरी बाजू प्रकाशात यायला हवी. हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीच्या आक्रमणाचा निषेध म्हणून २८ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता ‘जनमोर्चा’ आयोजित केला आहे. हा मोर्चा कोथरूड भागातील ‘हॉटेल किनारा ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारका’पर्यंत काढण्यात येणार आहे.