मिरज येथे श्रीराममंदिराची साकारली जात आहे भव्य प्रतिकृती !
मिरज, १५ जानेवारी (वार्ता.) – अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या प्रतिकृतीचे बांधकाम मिरज येथे प्रगतीपथावर आहे. २० सहस्र चौरस फूट क्षेत्र, ६३ फूट उंची, २२ शिखरे, १ कळस, १५० कमानी आणि १६७ खांब असणारी भव्य प्रतिकृती साकारण्याचे काम येथील तालुका क्रीडा संकुल मैदान येथे चालू आहे. या मंदिर प्रतिकृतीमध्ये ६ फूट उंचीची श्रीरामाची मूर्ती बसवण्यात येणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत सर्व भाविक मंदिर प्रतिकृतीचे दर्शन घेऊ शकतात, असे आयोजकांनी सांगितले आहे. कोल्हापूर येथील ‘व्हाईट लोटस क्रिएटिव्ह स्टुडिओ’ यांच्या वतीने ही प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करून या कामाला प्रारंभ करण्यात आला. या मंदिर प्रतिकृतीच्या कामासाठी १५० हून अधिक कारागीर अहोरात्र कार्यरत आहेत. हत्ती, गरूड, श्री हनुमान, जय-विजय अशा मूर्तींच्या प्रतिकृतीही या मंदिरात असणार आहेत. ‘फायबर कास्टिंग’, ‘फिनिशिंग’ आणि रंगकाम करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.