पाथर्डी (जिल्हा अहिल्यानगर) तालुक्यातील २०० प्राथमिक शिक्षकांचे विमा हप्ते भरले नाहीत !
अहिल्यानगर – पाथर्डी तालुक्यातील २०० प्राथमिक शिक्षकांचे विम्याचे १० हप्ते शिक्षण विभागाने भरलेले नाहीत. त्यामुळे या शिक्षकांची ‘विमा पत्रे’ (विमा पॉलिसी) बंद पडली आहेत. ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी शिक्षकांना ‘दंड’ भरण्याची वेळी आली आहे. पाथर्डी तालुक्यामध्ये ९०० प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांतील २१० शिक्षकांनी त्यांच्या वेतनातून विमा हप्ते भरले जावेत, असे सांगितले होते. त्यामुळे हे हप्ते शिक्षण विभाग विमा आस्थापनाकडे भरत होते; मात्र गेली १० मास हे हप्ते शिक्षण विभागाने भरलेले नाहीत.
‘तुम्हीच जाऊन दंडासह हप्ते भरा, त्याची पोचपावती आम्हाला सादर करा, भरलेल्या रकमेचा धनादेश घेऊन जा’, असे तोंडी उत्तर शिक्षण विभागाने या शिक्षकांना दिले आहे.
गटशिक्षणाधिकारी अनिल भवर म्हणाले, ‘‘प्राथमिक शिक्षकांचे विमा हप्ते भरण्याचे दायित्व ज्या कर्मचार्यावर होते, तो कर्मचारी ऑगस्ट २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाला. शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त असून प्रत्येक ठिकाणी मला लक्ष देणे शक्य होत नाही.’’ (असे निलाजरे वक्तव्य करणे म्हणजे आपले दायित्व झटकण्याचा प्रकार आहे. अशा अधिकार्यांवर शिक्षण आयुक्तांनी कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाशिक्षण विभागाचा भोंगळ कारभार ! |