संजय काकडे यांच्यासह १८ जणांना नोटीस बजावली !

भोसले बँकेतील आर्थिक अपव्यवहाराचे प्रकरण

पुणे – शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांच्यासह १८ जणांना नोटीस बजावली आहे. भोसले सहकारी बँकेमध्ये ठेवींचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या बँकेच्या रोख आणि शिल्लक रकमेच्या संदर्भात पडताळणी केली. त्या वेळी बँकेकडे ७१ कोटी ७८ लाख ८७ सहस्र रुपये रोख असल्याचे कागदोपत्री दाखवून फसवणूक केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा पुढील अन्वेषण करत आहे. या प्रकरणी भोसले सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल भोसले, माजी खासदार संजय काकडे यांच्यासह इतर १८ जणांवर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दावा प्रविष्ट केला; मात्र न्यायालयाने अर्जदाराची सी.आर्.पी.सी. १५६ (३) ची विनंती अमान्य केल्याने अर्जदाराने सत्र न्यायालयात अपील नोंदवले. त्यामुळे काकडे यांच्यासह १८ जणांना न्यायालयाने नोटीस दिल्याची माहिती याचिकाकर्ते विकास कुचेकर यांनी दिली.