हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्रीराममंदिर विशेषांका’ची श्रीरामाच्या कृपेने झालेली छपाई आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची अनुभवलेली सूक्ष्मातील कळण्याची अफाट क्षमता !
‘२.१.२०२४ या दिवशी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चा ‘श्रीराममंदिर विशेषांक’ छपाई करतांना पुष्कळ अडचणी आल्या. त्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय केल्यामुळे अडचणी सुटल्या आणि श्रीरामकृपेने छपाई चांगली झाली. यांविषयी आम्हाला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. ‘श्रीराममंदिर विशेषांक’ छपाईचे नियोजन करण्यासाठी छापखान्यातील कर्मचार्यांचा पुष्कळ वेळा पाठपुरावा करावा लागणे, छपाईसाठी ते निरुत्साही असणे
‘हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चा १६ पानांचा रंगीत ‘श्रीराममंदिर विशेषांक’ काढायचा’, असे ठरले. ‘त्या अंकाची छपाई नेहमीच्या छापखान्यात न करता दुसर्या एका चांगल्या छापखान्यात करायची’, असे ठरले; पण छपाईचे नियोजन करण्यासाठी तेथील कर्मचार्यांचा वेळ उपलब्ध होण्यासाठी आम्हाला त्यांचा पुष्कळ वेळा पाठपुरावा करावा लागला. ज्या दिवशी सकाळी ११.३० वाजता छपाई चालू होणार होती, त्या दिवशी सकाळी १०.३० वाजता आम्ही त्यांच्या छापखान्यात पोचलो; परंतु तेथील कर्मचार्यांनी छपाईची काहीच सिद्धता केली नव्हती. ते छपाई करण्यासाठी निरुत्साही आणि नकारात्मक वाटत होते.
२. अनुभूती
२ अ. अंकांच्या छपाईच्या वेळी छपाईयंत्र चालू न होणे, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी छापखान्यातील कर्मचारी, साधक आणि छपाईयंत्र यांवरचे आवरण काढून छपाईयंत्राच्या डाव्या बाजूला थांबून नामजप करण्यास सांगणे, तसे केल्यावर यंत्र चालू होणे : अंकाच्या छपाईसाठी छपाईयंत्र चालू केल्यावर ते चालू होत नव्हते. त्यामुळे तेथील सर्व कर्मचारी आणि छापखान्याचे प्रमुख यंत्रातील अडचण सोडवायचा प्रयत्न करत होते; पण ती अडचण सुटत नव्हती. ‘ही अडचण आध्यात्मिक असणार’, असे वाटून आम्ही प्रार्थना आणि नामजप करत होतो. आश्चर्य, म्हणजे त्याच वेळी रामनाथी आश्रमातून मला भ्रमणभाष आला. त्यांनी सांगितले, ‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्यांना जाणवलेल्या त्रासासंबंधी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले आणि यंत्राच्या डाव्या बाजूला तांत्रिक अडचण आहे. तो भाग दुरुस्त करण्यास सांगता येईल.’ प्रत्यक्षातही यंत्रात डाव्या बाजूलाच अडचण होती. आम्ही यंत्राच्या डाव्या बाजूला थांबून काही वेळ नामजप केल्यावर छपाईयंत्र चालू झाले. तेव्हा आमच्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
२ आ. देवाचे ‘श्रीराममंदिर विशेषांका’कडे असलेले लक्ष आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची अनुभवलेली सूक्ष्मातील कळण्याची अफाट क्षमता ! : वरील प्रसंगावरून ‘देवाचे ‘श्रीराममंदिर विशेषांका’कडे किती लक्ष आहे’, ते आमच्या लक्षात आले. खरेतर आम्ही छपाईसाठी आलेल्या अडचणी गोवा येथे सद्गुरु गाडगीळकाकांना केवळ कळवल्या होत्या, तरी सूक्ष्मातून सद्गुरु गाडगीळकाकांना छपाईमध्ये आलेल्या नेमकी अडचण जाणवली आणि त्यांनी त्वरित नामजपादी आध्यात्मिक उपाय कळवायला सांगितले. तेव्हा आम्हाला ‘सद्गुरु गाडगीळकाका यांची सूक्ष्मातील कळण्याची क्षमता किती अफाट आहे’, याची अनुभूतीच आली.
२ इ. छपाई चांगली न आल्यामुळे पुष्कळ कागद वाया जाणे, तेव्हा देवाच्या कृपेने छापखान्याने त्यांचा कागद देऊन त्यावर उत्तम छपाई करून देणे : आम्ही छपाईसाठी लागणारा कागद घेऊन गेलो होतो; परंतु त्या कागदावर छपाई चांगली होत नव्हती. काही विज्ञापनांमधील लिखाण २ वेळा छापले जाणे, कागद फाटणे, पुष्कळ गडद छपाई होणे, ‘रजिस्ट्रेशन’ (टीप) न जुळणे इत्यादी कारणांमुळे छपाईचा पुष्कळ कागद वाया गेला. शेवटी या अडचणी न थांबल्याने आम्ही छपाई थांबवली. ‘अंकाची छपाई तर झाली पाहिजे, आता काय करायचे ?’, अशा विवंचनेत आम्ही असतांनाच छापखान्याने आम्हाला त्यांचा कागद देऊ केला आणि ‘आपण या कागदावर अंक छपाई करूया’, असे आम्हाला सांगितले. आम्हाला पुष्कळ आश्चर्य वाटले; कारण ते त्यांचा कागद कुणालाही देत नाहीत. तेव्हा ‘प्रभु श्रीरामानेच त्यांच्या मनात विचार घातला’, असे आम्हाला वाटले.
टीप – ‘छपाईच्या वेळी संबंधित रंगांची अक्षरे किंवा छायाचित्रे व्यवस्थितपणे छापली जाण्यासाठी ४ रंगांची जुळवणी करतात’, त्याला ‘रजिस्ट्रेशन’ म्हणतात. ती रंगांची जुळवणी व्यवस्थित झाली नाही, तर अक्षरे अस्पष्ट दिसतात.
२ ई. छापखान्याचा कागद पातळ असूनही त्यावर उत्तम छपाई होणे : अंकाची सर्व पाने रंगीत असतील, तर आपण ५२ ते ५४ ‘जीएस्एम्’ (कागदाची जाडी) चा कागद वापरतो; परंतु त्यांचा कागद ४० ‘जीएस्एम्’चा असूनही त्यावर देवाला अपेक्षित अशी छपाई झाली. एरव्ही अंकाची सर्व पाने रंगीत असतील, तेव्हा एका पानावरील छायाचित्र त्या पानाच्या मागच्या बाजूने दिसते; पण या वेळी छापखान्याचा पातळ कागद वापरूनही या अंकाला तशी अडचण आली नाही.
३. कृतज्ञता
‘सद्गुरु गाडगीळकाका यांना काही न कळवताही त्यांनी सर्वांवरील त्रासदायक आवरण काढून छपाईयंत्राची अडचण दूर करण्यासाठी नामजप सांगितला आणि प्रभु श्रीरामाच्या कृपेमुळे छपाईसाठी छापखान्याने त्यांचा कागद दिला. त्यामुळे अंकांची छपाई निर्विघ्नपणे पार पडली’, यांसाठी सद्गुरु गाडगीळकाका आणि प्रभु श्रीराम यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. संदीप सकपाळ (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि श्री. राजेंद्र दिवेकर , सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |