भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
|
चिपळूण, १५ जानेवारी (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात काही जणांचा एक समान प्रश्न असतो, ‘भारत हे हिंदु राष्ट्र आहेच; मग वेगळे घोषित करण्याची काय आवश्यकता आहे ?’ खरोखर हे त्रिकालाबाधित सत्य आहे की, भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र आहे. असे असले, तरी विद्यमान राज्यघटनेच्या व्यवस्थेत त्याला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून दर्जा कुठे आहे ? एखाद्याने ‘डॉक्टर’ची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तो स्वाभाविक ‘डॉक्टर’ असतो; परंतु प्रमाणपत्र घेतल्याविना त्याला ‘डॉक्टर’ म्हणून काम करता येत नाही. त्याचप्रमाणे राज्यघटनेद्वारे भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केल्याविना आजच्या स्थितीत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणता येणार नाही. त्यामुळे भावनात्मक विचार करण्यापेक्षा राज्यघटनेद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात १४ जानेवारी या दिवशी झालेल्या एक दिवसाच्या जिल्हास्तरीय हिंदु-राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. या अधिवेशनाला १२० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. दिव्या घाग आणि श्री. महेश लाड यांनी केले. अधिवेशनाचा उद्देश समितीचे श्री. विनोद गादीकर यांनी मांडला. अधिवेशनाला साहाय्य करणार्या सर्वांचे या वेळी आभार मानण्यात आले.
या वेळी उपस्थितांपैकी श्री महाकाली देवस्थान आडिवरेचे विश्वस्त श्री. स्वप्निल भिडे, चिपळूण मनसे शहराध्यक्ष श्री. अभिनव भुरण, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे श्री. गणेश गायकवाड, अधिवक्ता सचिन रेमणे, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, राजापूरचे श्री. महेश मयेकर, अधिवक्ता मिलिंद तांबे, ह.भ.प. (डॉ.) धर्मश्री शेवाळे, श्री भवानी वाघजाई देवस्थान, टेरवचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कदम, श्री. विवेक गुरव, श्री देव देवस्थान पेढे परशुरामचे अध्यक्ष श्री. गजानन भोसले आदींनी धर्मावरील आघात रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अनुभव कथन केले.
धर्मशिक्षणासाठी मंदिर विश्वस्तांनी पुढाकार घेणे आवश्यक ! – ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, संस्थान श्री देव भार्गवराम परशुरामचे विश्वस्त
मंदिरांचे पावित्र्य रक्षण होऊन सात्त्विकता टिकावी आणि देवतेकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा लाभ भाविकांना मिळावा, यासाठी समाजात धर्माचरण वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्मशिक्षण महत्त्वाचे असून हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी मंदिर विश्वस्तांनी पुढाकार घेतला पाहिजे. हिंदु जनजागृती समितीने विविध घटकांतील हिंदु विरांना संघटित करून त्यांना धर्मासाठी एकत्रित करण्याची संकल्पना अनेक वर्षांपासून राबवली. त्यामुळे आता हिंदू धर्मरक्षणासाठी संघटित होत आहेत. ही संकल्पना आपण सर्वांनी मिळून तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम करूया.
धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यात साधना म्हणून योगदान देणे महत्त्वाचे ! – सद्गुरु सत्यवान कदम, सनातनचे धर्मप्रचारक
भगवंत भक्ताचे रक्षण करतो. त्यासाठी धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यात साधना म्हणून योगदान दिले पाहिजे. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र ही संकल्पना आध्यात्मिक संकल्पना आहे. विश्वकल्याणासाठी जे कार्यरत आहेत त्यांचे हे राष्ट्र. ही प्रक्रिया केवळ स्थूलातील नसून सूक्ष्म स्तरावरीलही आहे. त्यासाठी साधनेचे महत्त्व लक्षात घेऊन धर्माचरण करणे आवश्यक आहे. या दैवीकार्यातील सहभागासाठी नि:स्वार्थी, त्यागी वृत्ती, प्रसिद्धीचा हव्यास नसणे आदी गुण आवश्यक असतात.
क्षणचित्र
पाली (ता. रत्नागिरी) येथील श्री. प्रवीण सावंत यांनी वर्ष १९९० आणि १९९२ मध्ये कारसेवेत प्रत्यक्ष सहभागी असतांनाचे अनुभवकथन केले. ‘अनेकांनी केलेला संघर्ष आणि त्याग यातूनच अयोध्येत भव्य श्रीराममंदिराची उभारणी होऊन २२ जानेवारीला श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे’, असे त्यांनी सांगितले. या निमित्ताने श्री. सावंत यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.