Maldives Indian Military : (म्हणे) ‘भारताने १५ मार्चपर्यंत मालदीवमधून सैन्य हटवावे !’ – मालदीव
|
माले (मालदीव) – मालदीवचे राष्ट्रपती महंमद मोईज्जू यांनी मालदीवमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याला १५ मार्चपर्यंत माघारी बोलावण्यास भारताला सांगितले आहे. सध्या मालदीवमध्ये भारतीय सैन्याचे ८८ सैनिक आणि अधिकारी तैनात आहेत.
१. मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील सार्वजनिक धोरण सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, राष्ट्रपती मोइज्जू यांनी अधिकृतरित्या भारताला १५ मार्चपर्यंत सैनिकांना माघारी घेण्यास सांगितले आहे. मोईज्जू सरकारच्या धोरणानुसार भारतीय सैन्य मालदीवमध्ये राहू शकत नाही. मालदीवच्या जनतेने भारताला सैन्य हटवण्याची विनंती करण्यासाठी नव्या सरकारला भक्कम बहुमत दिले आहे. मालदीवचे नवे सरकार आता भारतासमवेत झालेल्या १०० हून अधिक द्विपक्षीय करारांचा आढावा घेत आहे.
२. सैन्याला माघारी बोलावण्याच्या सूत्रावर चर्चा करण्यासाठी मालदीव आणि भारत यांनी उच्चस्तरीय गट बनवला आहे. या संदर्भात १४ जानेवारीला माले येथील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मुख्यालयात या गटाची पहिली बैठक झाली. या बैठकीला भारतीय उच्चायुक्त मुनु महावर उपस्थित होते. नाझिम यांनी अशी बैठक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, १५ मार्चपर्यंत सैन्य मागे घेण्याची विनंती हा बैठकीचा मुख्य विषय होता.
संपादकीय भूमिकाभारताने मालदीवच्या अशा सूचनेला भीक न घालता मालदीव कह्यात घ्यावे, असे भारतियांना वाटत असेल, तर ते चुकीचे ठरू नये ! उद्या भारताने सैन्य काढून घेतल्यावर तेथे चीनचे सैनिक तैनात होऊन ते भारताला धोक्याचे ठरण्यापेक्षा भारताने मालदीवला कह्यात घेणे कधीही योग्य ठरेल ! |