Goa LateNight Sound Pollution : मांद्रे आणि मोरजी समुद्रकिनार्यांवरील क्लबमध्ये कर्कश संगीत लावणार्या क्लबच्या व्यवस्थापकाला नागरिकांनी खडसावले !
पणजी, १४ जानेवारी (वार्ता.) : मांद्रे आणि मोरजी समुद्रकिनार्यांवरील एका क्लबमध्ये १४ जानेवारीला रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत लावले होते. यामुळे त्रस्त झालेल्या काही नागरिकांनी या क्लबच्या व्यवस्थापकाला चांगलेच खडसावले. या क्लबच्या व्यवस्थापकाला याविषयी विचारले असता ‘आम्ही १२ ते १२.३० या कालावधीत संगीत लावले होते’, असे त्याने सांगितले. त्या वेळी उपस्थितांपैकी एक नागरिकाने ‘तुम्हाला किती वाजेपर्यंत संगीत लावता येते, याची माहिती नाही का ? तुमच्याकडे १२.३० पर्यंत संगीत वाजवण्याची अनुमती आहे का ?’, असे प्रश्न केले. त्यावर त्या व्यवस्थापकाने याविषयी काहीतरी सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला ‘बंद जागेत आवाजाची मर्यादा किती डेसीबल्स असावी ?’, असा प्रश्न केल्यावरही त्याच्याकडे काही उत्तर नव्हते. तेव्हा उपस्थित नागरिकांनी त्याला ‘या सर्वांचा अभ्यास करा आणि मग क्लबचे व्यवस्थापन चालवा’, असा सल्ला दिला. या भागातील नागरिकांना याचा प्रतिदिन त्रास सहन करावा लागतो. ‘यापुढे रात्री १० वाजल्यानंतर संगीत वाजवणे बंद झाले पाहिजे, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही’, अशी चेतावणी नागरिकांनी दिली आहे.
संपादकीय भूमिकारात्रीच्या वेळी होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात प्रशासन काही करत नसल्याने नागरिकांना ते रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो ! |