मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे येथे १ सहस्र ५ कर्मचार्‍यांची नियुक्ती !

पुणे – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीने मराठा समाजाचे मागासलेपण पडताळण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. पुणे शहरातील या कामासाठी महापालिकेने १ सहस्र ५ कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे; मात्र आयोगाकडून सर्वेक्षणाची संगणक प्रणाली उपलब्ध झाली नसल्याने सर्वेक्षण चालू झालेले नाही. जरांगे पाटील यांनी ‘मराठा म्हणजे कुणबी’ अशी भूमिका घेत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे; मात्र ओबीसी नेत्यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. मागासवर्गीय आयोगाच्या वतीने मराठा समाजाचे मागासलेपण पडताळण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. प्रत्येक १५ कर्मचार्‍यांच्या मागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती केली आहे. कर्मचार्‍यांकडून सर्वेक्षण करून घेणे, त्याचा अहवाल सादर करणे, याचे दायित्व उपायुक्त चेतना केरूरे यांच्याकडे दिले आहे. प्रत्येक कर्मचार्‍याला १०० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे ध्येय दिले असून हे काम १० दिवसांत करायचे आहे. त्यामुळे ‘शहरात १ लाख ५०० कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाईल’, असे अधिकार्‍यांनी सांगितले.