नाशिकमध्ये पंतप्रधान येणार म्हणून केलेल्या कामांनंतर आता परिसरासह नदीपात्र पुन्हा अस्वच्छ !
नाशिक – येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने गोदावरीच्या काठावर कडक पोलीस बंदोबस्त होता, तसेच बॅरिकेडिंग लावण्यात आले होते. तसेच रामकुंडात पाणीही सोडण्यात आले होते. गोदावरीतील कचरा पाण्यासमवेत वाहून गेला. येथील फेरीवाले, छोटे दुकानदार यांनाही हटवण्यात आले होते. भिंती रंगवण्यात आल्या होत्या. पंतप्रधान येणार म्हणून निधीमुळे अडकलेली काही पूर्ण कामेही झाली होती. काळाराम मंदिराच्या परिसरातील पडके वाडे, जुनाट भिंती यांवर पडदे टाकण्यात आले होते.
पंतप्रधानांचा दौरा संपल्यावर गोदावरीत पुन्हा कपडे धुण्यासह प्लास्टिक टाकण्यास आरंभ झाला. २४ घंट्यांपूर्वीचे गोदावरीचे चांगले झालेले रूप पालटून ती पूर्ववत् बकाल होण्यास आरंभ झाला. पूर्वीप्रमाणेच येथे फेरीवाले, लहान दुकानदार, घाटाच्या पायर्यांवर संसार थाटणारी विस्थापित कुटुंबे, भाजीविक्रेते, टपर्या-हॉटेलचालक आदी परत आले आहेत. पाणी पूर्ववत् झाल्याने परत कचरा होण्याची शक्यता आहे. रंगवलेल्या भिंतींसमोर आता खिळे ठोकून पाले थाटण्यात आली आहेत. कुणी त्यात दुकाने थाटतील, तर कुणी रहातीलही. येथील भग्न वाड्यांवरील पडदे काढल्याने पुन्हा एकदा ते भकास वाडे रस्त्यांवर दृष्टीस पडतील.
संपादकीय भूमिकानाशिकप्रमाणे अन्य ठिकाणीही १ दिवसाची तोंडदेखली स्वच्छता केली जात असेल, तर ‘स्वच्छ भारत’ हे स्वप्न कधी साकार होणार ? दिखाव्यासाठी स्वच्छता आणि व्यवस्था करणारे प्रशासन ती कायमस्वरूपीच का करत नाही ? अशाने मोदी यांना अपेक्षित देशाचा विकास कसा होणार ? |