काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश !
मुंबई – काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी १४ जानेवारी या दिवशी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे. ‘माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षासमवेत असलेले ५५ वर्षांचे नाते मी संपवत आहे’, अशी पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर केली आहे. त्यागपत्राची घोषणा केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला सपत्नीक भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर उपस्थित होते.
मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश पार पडला. शिंदे म्हणाले, “मिलिंद देवरा यांच्यासह व्यापारी वर्ग, माजी नगरसेवक, जैन मारवाडी, गुजराती या समाजातील व्यापारी वर्ग पक्षात आल्यामुळे आनंद वाटतो. सर्व लक्ष्मीपुत्र पक्षात आले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी लोक पक्षात येण्याची शक्यता आहे.’’