सोलापूर येथे लक्षावधी भाविकांनी अनुभवला अक्षता सोहळा !
सोलापूर – येथील ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ नंदीध्वजांचा अनुपम अक्षता सोहळा १४ जानेवारी या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला लाखो भक्तांची मांदियाळी होती. ९०० वर्षांची परंपरा असलेला अक्षता सोहळा लाखो भाविकांनी अनुभवला. ‘ओम सिद्धरामा नम:’… दिड्ड्यम् दिड्ड्यम्… सत्यम् सत्यम्… नित्यम् नित्यम्’ या मंत्रोच्चारांसह मंगलाष्टक चालू झाले अन् लाखो भाविकांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला. या वेळी भक्तांनी अपूर्व उत्साहात ‘एकदा भक्तलिंग बोला… हर्र… बोला हर्र..’चा गजर आणि ‘सिद्धेश्वर महाराज की जय’, असा जयघोष केला.
या वेळी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या सातही मानाचे नंदीध्वज विविधरंगी फुलांनी सजवण्यात आले होते. पांढरे बाराबंदी (पोशाखाचा प्रकार), धोतर, डोक्यावर पांढरा फेटा, कपाळाला गंध अशा पोशाखात लाखो भाविकांमुळे सोहळ्यात उत्साह, भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडले. सुहास शेटे यांनी संमती वाचन केले, तर वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी कन्नड, इंग्रजी, मराठी अशा विविध भाषांतून सिद्धरामेश्वरांचा जयजयकार करत सूत्रसंचालन केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन !
अक्षता सोहळा पार पडल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर देवस्थान समितीच्या वतीने श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची प्रतिमा देऊन पालकमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. यात्रा समितीचे प्रमुख श्री. महादपा चकोते यांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन करत असलेल्या सहकार्याविषयी आभार व्यक्त केले. या वेळी भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचाही सत्कार करण्यात आला.